स्टीव्हन किंग हे सध्या सत्तरीच्या उंबरठय़ावर आहेत आणि त्यांना केवळ ‘भयकथाकार’ म्हणून किंवा केवळ ‘विज्ञानरंजनकार’ म्हणून सोडून देता येणार नाही, अशी इंग्रजी-वाचत्या जगाची केव्हाच खात्री पटली आहे. गेल्या सुमारे ३५ वर्षांत किंग यांच्या ५० हून अधिक कादंबऱ्या, डझनभर कथासंग्रह आणि आठ ललितेतर लिखाणाची पुस्तकं यांच्या एकंदर ३५ कोटी प्रती खपल्या आहेत. पण बातमी अर्थातच ही नाही.. पहिली बातमी अशी की, किंग यांचा नवा कथासंग्रह बाजारात दाखल होऊन आता भारतातही आला आहे आणि त्याहीपेक्षा मोठी बातमी ही की, ज्यांच्या अनेक कादंबऱ्यांवर चित्रपट बनले, ते खुद्द स्टीव्हन किंग, ‘चित्रपट-कथेत पटकथाकारापेक्षा कथालेखकाला महत्त्व दिलं पाहिजे’ असं म्हणत असल्याचं आता उघड होतं आहे!
‘डेडलाइन.कॉम’ या संकेतस्थळावर किंग यांची ‘काही वर्षांपूर्वी घेतलेली मुलाखत’ गेल्या बुधवारी प्रकाशित झाली. त्यात त्यांनी स्वतच्या ‘कूजो’, ‘स्टँड बाय मी’ आणि ‘शॉशँक रिडिम्शन’ या कादंबऱ्यांवर आधारित चित्रपटांबद्दल समाधान व्यक्त केलं, पण ‘द शायनिंग’ आणि ‘द ग्रेव्हयार्ड शिफ्ट’ या कादंबऱ्यांचं चित्रपटरूप पार हुकलेलं आहे, असं मतही ठासून आणि खुलासेवार मांडलं. म्हणजे किंग हे चित्रपट-रूपांतराच्या बाजूने की विरुद्ध? त्यांना चित्रपट-दिग्दर्शकाचं स्वातंत्र्य मान्य आहे की नाही? – या अगदी सरळ प्रश्नांवर किंग फार सावध आणि साळसूद उत्तरं देतात- ‘स्वातंत्र्य तर मान्य आहेच’ वगैरे. पण, मूळ कथालेखकाला जे म्हणायचं आहे तेच पटकथाकार आणि दिग्दर्शकानं सांगावं, हा त्यांचा आग्रह अजिबात लपत नाही.
स्टीव्हन किंग आणि हॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक स्टॅन्ले क्युब्रिक यांचं पटत नव्हतं, ते या आग्रहामुळेच. क्युब्रिकनं १९८० साली ‘द शायनिंग’ या किंग यांच्या कादंबरीवर बनवलेल्या चित्रपटात फाजील स्वातंत्र्य घेतलं आहे आणि ते मूळ कादंबरीत जो काही अर्थ आहे त्यालाच मारक आहे, असं किंग यांचं म्हणणं होतं. क्युब्रिक यांच्या त्या चित्रपटाला झोडपण्याची संधी किंग सहसा सोडत नसत. क्युब्रिकच्या ‘शायनिंग’बद्दल नापसंतीचा भाग मुलाखतकारानं अगदी खोदून काढला; तेव्हा मात्र किंग यांचे शब्द जरा निराळे होते. ‘भुतं मूलत: वाईट नसतात, असं क्युब्रिकचं म्हणणं होतं.. तिथंच त्याचा पाय घसरला. मेल्यानंतर माणूस भूत होतो हे फार आशादायी आहे असं त्याचं (क्युब्रिकचं) म्हणणं.. पण बाबारे, मेल्यानंतर नरक हीदेखील कल्पना आहे की नाही? असलं काही आशादायी वगैरे नसतं..’ अशा शब्दांत त्यांनी स्वतकडे मोठेपणा घेत, जणू स्टॅन्ले क्युब्रिक हे चुकलेलं कोकरूच अशी बतावणी आता किंग करताहेत.
कथाकाराचं म्हणणं दिग्दर्शकानं मांडावं, हा आग्रह साक्षात् किंग यांनी मांडलेला असल्यामुळे तो पोरकट म्हणून सोडून देता येत नाही. किंग यांचा ‘साक्षात्कार’ असा की, अमेझॉन या इंटरनेट विक्रीस्थळानं ई-पुस्तकं वाचण्याच्या ‘किंडल’चं सुधारित रूप बाजारात आणलं तेव्हा ते लोकांनी घ्यावं म्हणून ‘स्टीव्हन किंग यांची ‘युअर’ ही लघुकादंबरी केवळ याच किंडलवर, अशी मेख मारायचा बेत आखला होता. म्हणजे किंग यांची एक मोठीशी गोष्ट वाचण्यासाठी लोकांनी नवं वाचनयंत्रच विकत घ्यावं, एवढी त्यांच्या नावाची महती. एखाद्या साक्षात्कारी बाबाला शरण जाण्यासारखंच हे.
किंग यांच्या ‘बझार ऑफ बॅड ड्रीम्स’ या नव्या कथासंग्रहात ही ५७ पानी ‘युअर’ लघुकादंबरी छापील स्वरूपात आहे. अन्य १९ कथा, त्यामुळे हे पुस्तक जाडजूड आहे. एरवी ‘लेखक वेगळा- त्याचं लिखाण वेगळं’ असा कलावादी दृष्टिकोन बाळगणाऱ्या किंग यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेखेरीज प्रत्येक कथेला छोटेखानी लेखकीय प्रास्ताविक लिहिलं आहे.. त्यापैकी ‘अंडर द वेदर’ या कथेच्या प्रास्ताविकात ‘बझार ऑफ बॅड ड्रीम्स’ या शीर्षकाचा खुलासा होतो. किंग लिहितात : कथा या स्वप्नासारख्या असतात.. स्वप्न जेव्हा सुरू असतं, तेव्हा प्रत्येक बाब जणू स्पष्ट असते.. पण ते संपतं तेव्हा- किंवा कथा संपुष्टात येते तेव्हा बऱ्याच विरत जाणाऱ्या खुणा दिसू लागतात!’
या विरत जाणाऱ्या खुणा चित्रपटानंही जपाव्यात, असा किंग यांचा आग्रह नक्कीच नसणार. पण ‘कथालेखकाचं श्रेष्ठत्व मान्य करा’ या त्यांच्या म्हणण्याचे पडसाद उमटून हॉलीवूडपर्यंत गेले, तर बरंच होईल- आधीच्या अनेक लेखकांची अपेशी धुसफुस किंग यांच्या रेटय़ामुळे कदाचित कारणी लागेल!