23 October 2018

News Flash

मिथक-वास्तवाची सरमिसळ

कादंबरीच्या पहिल्या भागाचा सारांश सांगायचा तर सेमच्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या घटना या काळात घडतात

‘द रेड-हेअर्ड वुमन’

आधुनिक-पारंपरिक, पश्चिम-पूर्व.. अशा विचारसूत्रांद्वारे तुर्की जीवनाविषयी भाष्य करणारी ओरहान पामुक यांची ही नवी कादंबरी..

‘द रेड-हेअर्ड वुमन’ हा नोबेल पुरस्कारप्राप्त विश्वविख्यात लेखक ओरहान पामुक यांच्या मूळ तुर्की भाषेतल्या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद आहे. ही कादंबरी अत्यंत वाचनीय आहे हे आधीच सांगतो. कादंबरीत तीन भाग आहेत. पहिल्या-दुसऱ्या भागांना शीर्षके नाहीत. तिसऱ्या भागाचे शीर्षक ‘द रेड-हेअर्ड वुमन’ हे आहे. पहिल्या दोन भागांत सेम सेलिकचे निवेदन आहे. तिसऱ्या भागातले निवेदन रेड-हेअर्ड वुमनने केलेले आहे. तीनही भागांत आत्मनिवेदनात्मक, स्वकथनात्मक पद्धती वापरली आहे. तिसऱ्या भागात आपल्याला समजते, की पहिले दोन भाग हे एन्वरने लिहिलेल्या कादंबरीतले आहेत. त्या कादंबरीत त्याने प्रथमपुरुषी निवेदनपद्धतीचा उपयोग केलेला आहे. त्याने कथन जेथे सोडलेले आहे, तेथून पुढला भाग जोडून घेण्यासाठी रेड-हेअर्ड वुमनने तिसऱ्या भागातले हे आत्मकथन केलेले आहे. आतापर्यंत तिचे नाव ‘गुलसिहान’ आहे हे आपल्याला समजलेले असते. एन्वर हा तिचा मुलगा आहे आणि सेम हा त्याचा बाप आहे हेही कळलेले असते. ही कादंबरी सेमची आहे, सेम आणि गुलसिहान यांची आहे, आणि मुख्यत सेम आणि एन्वर यांची आहे. मुलगा बापाची कहाणी- बापाच्या मुखातून- सांगतो आहे. बाप आणि मुलगा यांच्यातले संबंधांचे गूढ हे या कादंबरीचे मध्यवर्ती आशयसूत्र आहे.

दुसरेही एक आशयसूत्र आहे, ते कादंबरीत हळूहळू प्रभावी होत जाते. पितृहत्या आणि पुत्रहत्या. राजा ईडिपस याच्याकडून झालेली पितृहत्या, आणि रुस्तमकडून झालेली सोहराब या त्याच्या पुत्राची हत्या. एक पश्चिमेकडली कथा आहे, दुसरी पूर्वेकडली. पहिली कथा सोफोक्लीस या ग्रीक नाटककाराने शोकात्मिका लिहून अजरामर केली, दुसरी फिरदौसीच्या ‘शाहनामा’ या महाकाव्यात आलेली आहे. ईडिपसला लेअस हा आपला बाप आहे हे माहीत नसते आणि रुस्तमला सोहराब हा आपला मुलगा आहे, सोहराबला रुस्तम हा आपला बाप आहे हे ठाऊक नसते. बाप आणि मुलगा यांच्यातील संबंध गूढ आहेत हे या प्राचीन मिथकांमधून आपल्या ध्यानात येते. देशोदेशीच्या साहित्यांत अशा अनेक कथा असू शकतील. याच कादंबरीत रेड-हेअर्ड वुमनच्या कथनात म्हटले आहे- ‘द थिंग्ज यू हिअर इन ओल्ड मिथ्स अ‍ॅण्ड फोकटेल्स आल्वेज एंड अप हॅपनिंग इन रिअल लाइफ.’ अर्थात, दैनंदिन जीवनात क्वचित घडणाऱ्या अशा घटनांकडे मिथकीय दृष्टिकोनातून पाहिले जाते असे नाही. याच कादंबरीतील कथानकाकडे पाहिल्यास, आईने आपल्या मुलाकरवी, एकदाच शरीरसंबंध आलेल्या व त्यातून आपल्या मुलाचा बाप झालेल्या व्यक्तीची त्याची संपत्ती हडपण्यासाठी हत्या घडवून आणली, असेही म्हटले जाऊ शकते. तिसरे एक सूत्र आहे. तेही अत्यंत महत्त्वाचे आहे. ते आपल्याकडून घडलेल्या पापाचे, अपराधाचे, चुकीचे हे आहे. पाप, अपराध, चूक हे तीन शब्द एकाकार होऊन जातात. त्यांची खंत बराच काळ राहते. अशी खंत बाळगत राहणे हे चूकच आहे, असे वाटूनही एक माणूस म्हणून याचा त्रासदायक विचार पोखरत राहतो.

या कादंबरीतला काळ १९८० च्या दशकापासून आतापर्यंतचा आहे. ऐंशीच्या दशकात इस्तानबुलची लोकसंख्या पन्नास लाख होती, तीस वर्षांनंतर ती एक कोटी पन्नास लाख झालेली आहे. त्या वेळी ते महानगर होते, तीस वर्षांनंतर ते प्रचंड विस्तारलेले महत्तम, बृहत् नगर झालेले आहे. तीस वर्षांत आणखीही बरेच बदल झालेले आहेत. ते सारेच बदल या कादंबरीत पाश्र्वभूमीसारखे येतात. या बदलांचा माणसांवर काय परिणाम झालेला आहे, ती कशी घडत गेलेली आहेत यावर या कादंबरीत विशेष भर आहे. पश्चिम आणि पूर्व, आधुनिकता आणि परंपरा, धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिष्ठता, स्मृतिभ्रंश आणि स्मृती, जागतिकीकरण आणि एतद्देशीयता अशी विचारसूत्रे कथन-निवेदनातून येत असतात.

कादंबरीच्या पहिल्या भागाचा सारांश सांगायचा तर सेमच्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या घटना या काळात घडतात. या घटना त्याच्या पुढच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या असतात.

सेमचा बाप अकिन हा डाव्या विचारसरणीचा असतो. त्याला पकडण्यात येते. यापूर्वीही असे झाले होते. राजकीय कारणासाठी तो बाहेर असायचा, तसाच व्यक्तिगत कारणासाठीही. सेमच्या वाटय़ाला त्याचे वडील फारसे येत नाहीत. वडिलांचा हा अभाव त्याला सतत जाणवत असतो. एका सुटीत तो मास्टर माहमुत यांच्याबरोबर, त्यांचा सहायक म्हणून विहीर खणायच्या कामावर जातो. इस्तानबुलच्या बाहेर ऑनगोरेन नावाच्या लहानशा गावाजवळच्या मोकळ्या जागेवर हे काम सुरू होते. या अतिशय कष्टाच्या कामावर असताना माहमुत आणि सेम यांच्यात बाप-मुलाचे नाते तयार होते. माहमुतमध्ये सेमला बाप दिसतो. माहमुत त्याला सर्वप्रकारे जपत असतो, तरीदेखील त्याचे सत्ता गाजवणे, आज्ञा देणे हे मनातून सेमला आवडत नसते. हे काम लवकर संपवावे, चार पैसे गाठीला बांधावे आणि विद्यापीठात प्रवेश घ्यावा हा त्याच्या मनातला कार्यक्रम असतो. विहीर खणायचे काम कष्टाचे, मेहनतीचे, रूक्ष आणि कंटाळवाणे असते. संध्याकाळी शेजारच्या ऑनगोरेन गावी जाणे हा एकमेव विरंगुळा असतो. एका संध्याकाळी लाल केसांच्या स्त्रीशी त्याची पहिली दृष्टादृष्ट होते. ती आपल्याला आधीपासूनच ओळखते असा भाव तिच्या नजरेत त्याला जाणवतो. तिची त्याला ओढ लागते. काही दिवसांतच त्याला कळते, की गावोगाव फिरणारी एक नाटकमंडळी आहे, आणि लाल केसांची स्त्री तिथे काम करते. दरम्यान त्याची-तिची भेट होते. एकेदिवशी तो नाटक पाहायला जातो. नाटकाच्या शेवटच्या दृश्यात दोन योद्धे लढतात, तरुण योद्धा मारला जातो. त्यानंतर वयस्क योद्धय़ाला तरुण योद्धय़ाच्या मनगटावरचे कडे दिसते आणि तो उन्मळतो. शेवटी लाल केसांच्या स्त्रीचा विलाप.

नाटय़प्रयोगानंतर सेम लाल केसांच्या स्त्रीबरोबर फिरायला जातो. त्यापूर्वी त्यांचे बोलणे होते. एकमेकांना आपली नावे सांगितली जातात. सेम आपल्या वडिलांविषयी बोलतो. ती त्याला त्यांचे नाव विचारते. त्याने वडिलांचे नाव सांगितल्यावर ती काही काळ स्तब्ध होते. त्या स्तब्धतेचा अर्थ सेमला कळत नाही. फिरत असताना तो आपल्या वडिलांविषयी अधिक माहिती देतो. नंतर तो आपल्याला नाटक लिहायचे आहे असेही सांगतो. पण त्यापूर्वी राजा ईडिपससारखी नाटके वाचली पाहिजेत असेही म्हणतो. राजा ईडिपसची कथा त्याच्या मनात रुतलेली आहे. फिरताफिरता ती दोघे तिच्या घरासमोर येतात, ती त्याला आत बोलावते. त्या वेळचे तिचे वाक्य आहे, ‘घाबरू नकोस, मी तुझी आई शोभेन एवढी मोठी आहे.’ त्या रात्री सेम त्या लाल केसांच्या स्त्रीबरोबर आयुष्यातला पहिला संभोग करतो.

सेमचा बाप अकिन सेलिक हा त्या लाल केसांच्या स्त्रीचा- गुलसिहानचा पहिला प्रियकर असतो. त्या वेळी तिच्या मनात ईडिपस – योकास्ता हे मिथक असेल का, की ती म्हणते त्याप्रमाणे : द थिंग्ज यू हिअर इन ओल्ड मिथ्स अ‍ॅण्ड फोकटेल्स आल्वेज एंड अप हॅपनिंग इन रिअल लाइफ?

सेमच्या आयुष्यातली दुसरी महत्त्वाची घटना या काळात घडते. विहिरीत खोल तळाशी मास्टर माहमुत काम करत असतो. माती-दगडगोटय़ांनी भरलेली बादली सेम वर ओढत असतो, रिकामी करून परत खाली सोडत असतो. एका क्षणी बादली निसटून खाली पडते. क्षणभर सेम गोठून जातो. तो हाका मारू लागतो. खोल तळातून आतून वेदनेने फोडलेला हंबरडा ऐकू येतो. मग सारे शांत होते. सेमला काय करावे ते सुचत नाही. तो ऑनगोरेनकडे धाव घेतो. गुलसिहानच्या घरासमोर येतो, पण ते लोक निघून गेले असल्याचे त्याला कळते. माहमुत मरण पावला असेल तर आपण अडकून पडू, मग आपले उच्च शिक्षण, आपले भवितव्य या सगळ्यांचे काय होणार हा विचार त्याला भेडसावतो. नकळत तो आपल्या साऱ्या वस्तू गोळा करतो आणि इस्तानबुलकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसतो. तेव्हा अपराधाच्या तीक्ष्ण जाणिवेने त्याचे मन पोखरलेले असते..

बापाच्या भावनेने ज्या माहमुतकडे पाहिले त्याचीच नकळत हत्या घडावी यांतही ईडिपस मिथक अनुस्यूत आहे का? अर्थात, माहमुत मृत्यू पावलेला आहे की अजूनही वेदनांनी कळवळत तो विहिरीच्या तळाशी पडलेला आहे, याची सेमला (आणि वाचकालाही) कल्पना नाही. माहमुतला असहाय अवस्थेत टाकून देऊन आपण पळ काढलेला आहे, हे त्याला उमजलेले असते. त्यामुळे पाप आणि गुन्हा या दोहोंचेही भाव त्यात मिसळून गेलेले आहेत.

बाह्य़त: सेमने कोणतेही पाप, गुन्हा वा चूक केलेली नव्हती. परंतु एखाद्याला जखमी (वा मृतप्राय) अवस्थेत सोडून पळून जाणे हे काय आहे? चूक, पाप, गुन्हा? पुढे तीस वर्षांनंतर एन्वर सेमला विचारतो, ‘‘तुझी देवावर श्रद्धा आहे आणि कुराण वाचलेले आहेस, तर मास्टर माहमुतला विहिरीच्या तळाशी सोडून का निघून आलास? तू कसं काय हे करू धजलास? खऱ्या श्रद्धावानांमध्ये सदसद्विवेकबुद्धी असते.’’ यावर ‘‘त्या वेळी मी लहान होतो’’ असे उत्तर सेम देतो. ‘‘नो, यू वेरन्ट. यू वेअर ओल्ड इनफ टू स्लीप अराउंड अ‍ॅण्ड गेट विमेन प्रेग्नंट’’- हे एन्वरचे प्रत्युत्तर आहे.

कादंबरीच्या दुसऱ्या भागात मनात अपराधभाव घेऊनच सेम वावरत असतो. आपल्या हातून काहीच घडलेले नाही असे तो मनाला समजावत असतो. तो लेखक होण्याच्या ऐवजी जिऑलॉजिकल इंजिनीअर होतो. अयसेशी त्याचे लग्न होते. काही काळ अन्य ठिकाणी नोकरी केल्यानंतर तो स्वतची कन्स्ट्रक्शन कंपनी काढतो. तिचे नाव ‘सोहराब’ ठेवतो. कादंबरीच्या पहिल्या भागात सेमला ईडिपसचे कथानक माहीत असते, सोफोक्लीसचे नाटक तो नंतर वाचतो. ऑनगोरेनच्या तंबूतल्या एका दृश्यात दोन योद्धे लढतात हे त्याने पाहिलेले असते. ते कोण होते हे त्याला इराणच्या भेटीत कळते. मुरात नावाच्या आपल्या मित्राबरोबर तो तेहरानला गेलेला असताना एका घरी तो एक चित्र पाहतो. घरातली स्त्री सांगते, ‘‘हे चित्र ‘शाहनामा’तील एक दृश्य आहे आणि रुस्तम आपणच ज्याची हत्या केलेली आहे त्या आपल्या सोहराबसाठी विलाप करतो आहे.’’ ‘शाहनामा’ हे फिरदौसीने लिहिलेले महाकाव्य आहे. नंतर तो ‘शाहनामा’ मिळवतो आणि त्यातली एक कथा पुन्हा पुन्हा वाचतो. अर्थातच, ती रुस्तम आणि सोहराब यांची आहे. ती कथा अशी –

पर्शियाचा वीरनायक रुस्तम शिकारीसाठी गेलेला असताना वाट चुकून तुराण या शत्रुप्रदेशात शिरतो. तिथला शाह त्याचे आदरातिथ्य करतो. रात्री शाहची मुलगी ताहमिना त्याच्याकडे येते आणि त्याच्याकडून अपत्याची मागणी करते. सकाळी रुस्तम अजून जन्माला न आलेल्या बाळासाठी एक कडे ठेवतो आणि निघून जातो. पुढे झालेल्या बाळाचे नाव सोहराब ठेवले जाते. पुढे सोहराबला आपल्या बापाला भेटावे, त्याला इराणचा शहा करावे, आपण तुराणचा शहा व्हावे आणि याप्रकारे पूर्व आणि पश्चिम यांत समन्वय घडवून आणावा असे वाटत असते. मात्र तसे होत नाही. त्या दोघांना आपले काही नाते आहे किंवा काय हे समजत नाही. सोहराबची हत्या झाल्यानंतरच ते कळते. रुस्तमने सोहराबला, सोहराबने रुस्तमला कधीही पाहिलेले नसल्याने हे घडते. ताहमिनाने सोहराबविषयी रुस्तमला काही सांगितले नाही, रुस्तमने आपल्यापासून झालेल्या मुलाची चौकशी केली नाही..

पितृहत्या आणि पुत्रहत्या या दोन अजरामर कथांनी कादंबरीचा नायक सेम झपाटलेला असतो. ईडिपस स्वतच स्वतला शिक्षा करून घेतो. पण रुस्तमने अशी काही शिक्षा करून घेतली नाही, किंवा त्याला झाली नाही. सेमला प्रश्न पडतो, ‘पूर्वेकडच्या बापाला शिक्षा भोगायला लावणारे कुणीच नाही का?’ या विधानात राजकीय छटा आहे. गुलसिहानशी बोलताना सेमने म्हटलेले असते, आपला बाप आपल्याला सोडून गेलेला आहे. यावर गुलसिहान सांगते, ‘नवा बाप शोध, या देशात आपल्या सगळ्यांसाठी खूप बाप आहेत.’ तिच्या उत्तरात पितृभूमी आणि ईश्वराचा उल्लेख आहे, तसाच लष्कराचा आणि माफियाचाही आहे.

पुढला भाग थोडक्यात सांगायचा तर मास्टर माहमुतला आपण खोल विहिरीच्या तळाशी सोडून आलो ही गोष्ट सेमच्या मनातून जात नाही. आपल्या हातून खरोखरच काही गुन्हा घडला होता की नाही हे शोधण्यासाठी तो पुढे ऑनगोरेनला जातो. तिथे त्याची गुलसिहानशी भेट होते, एन्वरशी भेट होते. कादंबरीच्या दुसऱ्या भागाची शेवटची प्रकरणे सेम आणि एन्वर यांच्यातल्या भेटीची आहेत. तीस वर्षांपूर्वीची ‘ती’ विहीर सेमला पाहायची असते. सेरहत नावाचा मुलगा सेमला तिकडे घेऊन जातो. विहिरीजवळ आल्यानंतर तो मुलगा आपण सेरहत नसून एन्वर असल्याचे सांगतो. एन्वरच्या मनात आधुनिकता, व्यक्तिवाद, पाश्चात्त्यीकरण यांविषयी राग आहे, बापाच्या अभावाबद्दल खंत आहे. ते सगळे तो बोलतो. अप्रत्यक्षपणे तो सेमविषयीचा राग व्यक्त करतो. त्यांच्या संभाषणात ताण तयार होतो. ‘‘तुम्ही घाबरला आहात का?’’ असे एन्वर विचारतो. ‘‘मी घशाला घाबरू?’’ असे सेम म्हणतो. ‘‘मी तुम्हाला या विहिरीत ढकलेन म्हणून.’’ यावर सेम म्हणतो, ‘‘तू का म्हणून असे करशील?’’ यावर एन्वरचे उत्तर आहे, ‘‘मास्टर माहमुतचा बदला घेण्यासाठी, मला वाऱ्यावर सोडल्याबद्दल, माझ्या विवाहित आईशी संग केल्याबद्दल.. आणि तुमची संपत्ती मला मिळावी म्हणून.’’ संभाषणाला भलतेच वळण लागल्यानंतर सेम नकळतपणे आपले पिस्तूल काढतो. ते त्याच्या हातून घेण्यासाठी झालेल्या झटापटीत पिस्तुलातील गोळी उडते आणि सेम ठार होतो. नंतर तिसऱ्या भागात आपल्याला समजते, की एन्वरने सेमला विहिरीत ढकलून दिलेले असते. असे त्याने का करावे? खरेच सेमची हत्या अपघाताने झालेली होती की एन्वरने त्याची हत्या केली होती?

ईडिपसला आपल्या बापाविषयी ठाऊक नव्हते. रुस्तमला सोहराब हा मुलगा आहे हे माहीत नव्हते. सेम आणि एन्वर यांना तीस वर्षांनंतर का होईना त्यांच्यातले बाप-मुलाचे नाते समजलेले होते. न्यायाधीशाने ही कादंबरी वाचल्यानंतर एन्वर हा निर्दोष आहे असे स्पष्ट होईल? सेम हाच खरा दोषी आहे, तो बापासारख्या माहमुतचा असहाय व जखमी अवस्थेत त्याग करतो, तारुण्याच्या आवेगात तो एका स्त्रीशी संबंध करतो आणि नंतर तिला पूर्णपणे विसरून जातो. सेमचा बाप राजकीय व खासगी कारणासाठी सेमला सोडून जातो, सेमला तर आपल्याला मुलगा आहे हेही ठाऊक नसते.

बाप आणि मुलगा यांच्यातील द्वंद्वात्मक संबंध चित्रित करणारी ही कादंबरी मिथक आणि वास्तव या गोष्टी कशा सरमिसळून गेलेल्या असतात हे दाखवते.

‘द रेड-हेअर्ड वुमन’

लेखक : ओरहान पामुक

 प्रकाशक : पेंग्विन रॅण्डम हाऊस

 पृष्ठे : २७२, किंमत : ५९९ रुपये.

वसंत आबाजी डहाके – vasantdahake@gmail.com

First Published on January 6, 2018 3:04 am

Web Title: the red haired woman by orhan pamuk