कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रशिक्षण, स्वयंचलन आणि यंत्रमानव यांच्यामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रांत होत असलेले बदल आणि त्याचे सामाजिक-आर्थिक परिणाम यांचा भविष्यवेध घेणारं हे पुस्तक.. तंत्रज्ञानाच्या सकारात्मक शक्यतांविषयी ते माहिती देतंच, शिवाय त्याच्या संभाव्य दुष्परिणामांचेही सूचन करतं..

मार्टिन फोर्ड हे लेखक एक प्रकारे भविष्यवेत्ते आहेत.  कृत्रिम बुद्धिमत्ते (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मुळे सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात काय परिणाम होतील हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘द राइज ऑफ द रोबोट्स’ या पुस्तकात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रशिक्षण (मशीन लर्निग), स्वयंचलन (ऑटोमेशन) आणि यंत्रमानव (रोबोट) यांमुळे होत असलेले बदल, त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रांतले उपयोग आणि त्याचे सामाजिक व आर्थिक परिणाम चर्चिले आहेत.

पहिल्या प्रकरणात फोर्ड यांनी यांत्रिकीकरणाची बरीच उदाहरणे दिली आहेत. त्यांत मायक्रोसॉफ्टचा त्रिमितीत पाहू शकणारा ‘किनेक्ट’ हा खेळ, ‘रूम्बा’ नावाचा हुशार व्हॅक्युम क्लीनर, एका कंपनीने तयार केलेल्या ‘रीमोट प्रेझेन्स’च्या तंत्रज्ञानाविषयी माहिती आली आहे. एक फ्लॅट स्क्रीन आणि कॅमेरा यांच्या साहाय्याने एखादी व्यक्ती एखाद्या समारंभाचा तिथे प्रत्यक्ष न जाताही गेल्याचा आनंद घेऊ शकते आणि तिथल्या लोकांशी संवाद साधू शकते. हे सगळे दुरून कसे हाताळले जाते हे लेखक सांगतो. अ‍ॅमेझॉनच्या कोठारात चोवीस तास काम करणाऱ्या रोबोटमुळे कामामध्ये काय फरक पडला? नोकऱ्यांवर काय परिणाम झाला? रोबोट जर क्लाऊड (आंतरजालावर आधारित आभासी संगणन)द्वारे एकमेकांशी संवाद साधू शकले तर? अशा अनेक प्रश्नांची चर्चा या प्रकरणात फोर्ड यांनी केली आहे.

दुसऱ्या प्रकरणात यापूर्वी झालेल्या विविध औद्योगिक क्रांतींचा आढावा घेतला आहे. तर तिसऱ्या प्रकरणात तंत्रज्ञानाच्या क्रांतिकारक परिणामांवर भाष्य केले आहे. विजेच्या शोधाच्या किती तरी पटीने अधिक काळ तंत्रज्ञानाचा परिणाम आहे. गणितीय आणि संदेशवहनाचा वेग इतका वाढला, की ज्या कामांना कित्येक वष्रे लागतील असे वाटायचे, ती गणिते आता काही मिनिटांत सोडवून होतात. हा वाढलेला वेग संशोधनाची नवी दालने उघडतो आहे. उदा. जनुकीय विश्लेषण आणि नोंद (ह्य़ुमन जीनोम मॅपिंग).

चौथ्या प्रकरणात यांत्रिकीकरणाच्या कक्षा आणि त्याच्या सर्वागीण परिणामावर भाष्य केले आहे. केवळ माहितीआधारित कामांचेच यांत्रिकीकरण होईल का? असा प्रश्न उपस्थित करून लेखकाने ‘स्टॅट्स मन्की’ नावाच्या अनुप्रयोगाचे (अ‍ॅप्लिकेशन) उदाहरण दिले आहे. मोठय़ा प्रमाणात निर्माण होणाऱ्या माहितीच्या विश्लेषणाने काय काय साध्य होऊ शकेल, याचे दाखले लेखक देतो. जसे, विक्रेते ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांना आवडतील अशाच वस्तू सुचवतील. पोलीस कदाचित होऊ घातलेल्या गुन्ह्याची वेळ आणि जागा वर्तवू शकतील आणि तो रोखण्यासाठी सुसज्ज राहू शकतील. याच संदर्भात फोर्ड यांनी यांत्रिकी बुद्धिमत्ता विरुद्ध गुप्तता या मुद्दय़ाचीही चर्चा केली आहे.

माहितीआधारित व्यवसायांचे भविष्यातील स्वरूप कसे असेल याविषयीही फोर्ड यांनी यात लिहिले आहे. गेल्या काही वर्षांच्या उपलब्ध माहितीचे योग्य विश्लेषण हे काही वर्षांच्या अनुभवाला टक्कर देऊ शकते. यांत्रिक विश्लेषणाच्या कक्षा जितक्या वाढतील तितकी विश्लेषकांची (माणसांची) गरज कमी होईल, असे फोर्ड यांचे म्हणणे आहे. माहितीच्या यांत्रिकी विश्लेषणाचा वाढता आवाका पाहता, पुढील काळात केवळ एक अधिकारी आणि प्रभावी गणनविधि (अल्गोरिदम) यांच्या आधारावर एखाद्या कंपनीचे संपूर्ण काम होऊ शकेल. त्यामुळे मधल्या फळीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार नाही. या सर्वाचा परिणाम स्वाभाविकपणे नोकऱ्यांवर होईल. हे स्पष्ट करण्यासाठी फोर्ड यांनी काही उदाहरणे दिली आहेत. ‘फेसबुक’च्या ‘सायबोर्ग व्हच्र्युअल असिस्टंट’ आणि ‘गुगल’च्या ‘डेटा सेंटर’चे उदाहरण दिले आहे. १०० एकर परिसरात पसरलेले गुगलचे डेटा सेंटर केवळ सुमारे ५० माणसेच सांभाळू शकतात. कारण बरेचसे दोष, अडचणी संगणक स्वत:च शोधून, त्यावर उपाय करून त्यांत सुधारणा करेल. किंवा जितके काम करायला पूर्वी ३० हजार मनुष्यबळ लागायचे, तेच काम आता अ‍ॅमेझॉन क्लाऊडवर केवळ सुमारे १८० माणसांच्या साहाय्याने करता येईल.

कॉल सेंटरमधील नोकऱ्या आवाजाच्या/संभाषणाच्या यांत्रिकीकरणाचे (व्हॉइस ऑटोमेशन)तंत्रज्ञान गिळंकृत करेल. मानवी मज्जासंस्थेशी साधम्र्य असणाऱ्या ‘डीप लर्निग’ तंत्रज्ञानामुळे तत्परतेने भाषांतर करणे शक्य होईल. त्यामुळे चीनसारखे देश भाषेचा अडथळा सहज पार करू शकतील. आजही गुगलमध्ये इंग्रजी आणि पोर्तुगीज भाषेत आवाजी भाषांतराची सोय उपलब्ध आहे. भरपूर पुस्तके चाळून, जुने निवाडे बघून स्वयंचलित तंत्रज्ञानाने साधारण गुन्ह्यांसाठी न्याय देण्याचे कामसुद्धा संगणक करू शकतील. त्यामुळे सर्वसाधारण कामापेक्षा वेगळे प्रावीण्य असणाऱ्यांनाच पुढील काळात नोकऱ्यांची संधी असेल, असे भाकीतही फोर्ड यांनी वर्तवले आहे.

पाचव्या प्रकरणात नवीन तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा ऊहापोह केला आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिका यंत्राच्या साहाय्याने तपासता येतातच, पण निबंधासारख्या वर्णनात्मक आणि भाषाप्रधान प्रांतातसुद्धा यंत्राच्या साहाय्याने अनुमापन करता येते. मोठय़ा प्रमाणातील मुक्त ऑनलाइन अभ्यासक्रम – प्रशिक्षणामुळे  येत्या काळात शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडून येतील. विद्यापीठाकडून ऑनलाइन प्रशिक्षण उपलब्ध असेल तर विद्यापीठांचा डोलारा कशासाठी, हा प्रश्न उपस्थित होईल. यंत्राधारित शिक्षणामुळे उच्च शिक्षणाच्या आवश्यकतेवरही शंका उपस्थित होईल.

सहाव्या प्रकरणात फोर्ड यांनी आरोग्य क्षेत्रातल्या आव्हानांबाबत लिहिले आहे. वयस्क होत जाणारी अधिकाधिक जनता आणि डॉक्टरांची कमतरता यामुळे आरोग्य क्षेत्रातही यांत्रिकीकरण होईल. त्यामुळे साधी कामे यंत्रांमार्फत होतील आणि या क्षेत्रातील नोकऱ्या कमी होतील. उदाहरणार्थ, रेडिओलॉजिस्टचे काम सहज यंत्र / संगणकाद्वारे करता येईल. हळूहळू यंत्राचा / संगणकाचा वापर सेकंड ओपिनियनसाठीही केला जाईल. आज गोळ्या-बिस्किटे देणारी यंत्रे आहेत, तशीच उद्या औषधे देणारी यंत्रेही असतील. सर्जिकल रोबोटद्वारे साध्या शस्त्रक्रिया करता येतील, मात्र गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी निष्णात डॉक्टरच लागतील.

सातव्या प्रकरणात तंत्रज्ञानाच्या नोकऱ्यांवरील परिणामांची उदाहरणे दिली आहेत. जसजसे तंत्रज्ञान प्रगत होते तसतसे कंपन्या कमी कामगार ठेवून जास्त नफा घेऊ शकतील. अर्थात, नवनवे प्रयोग नवीन नोकऱ्या निर्माण करतील, पण कमी. येथे फोर्ड यांनी ‘३-डी प्रिटिंग’ या तंत्रज्ञानाचे उदाहरण दिले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे प्लास्टिक, धातू, रब्बर किंवा अन्नद्रव्ये यांचे एकावर एक थर देऊन एखादी वस्तू निर्माण करता येते. यामुळे अधिक क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे घाटदार भाग असलेल्या वस्तू तयार करता येऊ शकतील. यामुळे उत्पादन करताना प्रत्येक वस्तू त्या त्या ग्राहकाच्या सूचनेप्रमाणे वेगळी निर्माण करता येईल. मात्र यासाठी वेगळा कच्चा माल लागेल, वेगळी रचना लागेल; यासाठी नोकऱ्याही निर्माण होतील, पण कमी आणि विशिष्ट कौशल्याची आवश्यकता असणाऱ्याच.

आठव्या प्रकरणात बाजारातील मागणीचा नोकऱ्या आणि पगारांवर होणारा परिणाम याचे विवेचन आले आहे. कामगार एक उपभोक्तासुद्धा आहे. त्यांच्याकडे खर्च करायला पैसा असेल तरच ते उपभोक्त म्हणून आपली भूमिका पार पाडू शकतात. मोटरींच्या उद्योगामुळे एक मध्यमवर्ग निर्माण झाला, मिळकत वाढली, परिणामी उपभोक्ते वाढले, मागणी वाढली आणि त्यामुळे अधिक आणि अन्य उद्योग निर्माण झाले. श्रीमंत आणि गरीब वर्गाच्या मिळकत आणि खर्चाच्या प्रमाणाची तुलना करताना फोर्ड ध्यानात आणून देतात, की मुख्यत: मध्यमवर्गाने केलेल्या खर्चामुळेच उद्योगांची भरभराट होते. केवळ उत्पादन करून उद्योग वाढत नाही; शेवटी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा कोणी तरी घेतल्या तरच प्रगती होते.

फोर्ड यांच्या मते, एका नवीन सरंजामशाहीची निर्मिती होते आहे, ज्यात पाच टक्के व्यावसायिक नोकरदारवर्ग आहे आणि उर्वरित ९५ टक्के लोक अकुशल आहेत. जसजसे यांत्रिकीकरण वाढत जाईल तसतसे अधिक लोक अकुशल ठरत जातील. साधारणपणे कुठल्याही देशात आधी उत्पादन क्षेत्र प्रगत होते व त्यानंतर सेवा क्षेत्र. पण यांत्रिकीकरणामुळे अविकसित राष्ट्रांमध्ये उत्पादन क्षेत्र प्रगत व्हायला संधीच मिळणार नाही. त्यामुळे ती राष्ट्रे कशी प्रगती करतील हा प्रश्नच आहे.

नवव्या प्रकरणात लेखक मानवाची आणि येऊ घातलेल्या हुशार यंत्रांची तुलना करतो. ठं११६ अक हा शब्दप्रयोग एका विशिष्ट कौशल्यामध्ये तरबेज केलेल्या संगणकासाठी वापरला आहे. ‘एकच’ कसब शिकलेले संगणक / यंत्र तुम्ही दररोज करत असलेले काम अधिक अचूक आणि अधिक वेगाने करू शकेल. ‘सिंग्युलॅरिटी’ हा आणखी एक शब्द यात आला आहे. यंत्रांमधील अत्युच्च प्रगतीची अवस्था सांगण्यासाठी हा शब्द वापरला जातो. त्याचेही विवेचन या प्रकरणात आले आहे.

दहाव्या प्रकरणांत देशाच्या पातळीवर काय परिणाम होतील आणि राज्यकर्त्यांना कशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल, कशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतील याची चर्चा आली आहे. बाजाराकडे निर्मितीचा स्रोत या दृष्टीने पाहणेच योग्य होईल, असे फोर्ड सांगतात. एका उद्योगात काही वस्तू निर्माण होतात. त्यांची विक्री होऊन कर्मचाऱ्यांना वेतन मिळते. या मिळकतीतून कर्मचारी स्वत:साठी काही वस्तू खरेदी करतात, असे चक्र आहे. मात्र उद्योगांत येत्या काळात यांत्रिकीकरण मोठय़ा प्रमाणात झाले तर वस्तू – उत्पादन मोठय़ा प्रमाणात निर्माण होईल, मात्र यांत्रिकीकरणामुळे फारच कमी कर्मचाऱ्यांना रोजगार मिळेल. परिणामी तेवढय़ाच कामगारांना  वेतन मिळेल व तेवढेच कामगार स्वत:साठी आणखी वस्तूंची खरेदी करू शकतील. त्यामुळे यांत्रिकीकरणामुळे मोठय़ा प्रमाणात उत्पादननिर्मिती होऊनही उपयोग होणार नाही. याचे कारण खरेदी करायला नोकऱ्यांअभावी लोकांकडे पुरेशी मिळकत नसणार. त्यामुळे राज्यकर्त्यांना नजीकच्या काळात पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवून नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील. करप्रणालीमध्येही बदल करून करांचा रोख श्रमिकांकडून भांडवलदारांकडे/उद्योगांकडे वळवावा लागेल, असे विवेचन फोर्ड यांनी केले आहे.

एकूणच भविष्यात येऊ घातलेले तंत्रज्ञान, त्यातील बदल समजून घेण्यासाठी, त्याचे विविध क्षेत्रांवर होणारे परिणाम, तसेच येत्या काळात कोणत्या तंत्रज्ञानाची / कौशल्याची भविष्यात मागणी राहील, हे जाणून घेण्यासाठी तंत्रज्ञानबदलाचा भविष्यवेध घेणारे हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे.

‘द राइज ऑफ द रोबोट्स’

लेखक : मार्टिन फोर्ड

प्रकाशक : बेसिक बुक्स

पृष्ठे : ३६८, किंमत : ३५४ रुपये

पराग जोशी paragmjoshi@gmail.com