इस्रायलचे एटगर केरेट हे लेखक आजच्या मोजक्या लोकप्रिय इंग्रजीअनुवादित कथाकारांपैकी एक. हारुकी मुराकामी, रॉबर्तो बोलानो यांच्याइतकीच जगभरात मोठी वाचकसंख्या असूनही आजतागायत या लेखकाविषयी त्याच्या कथेपलीकडे फारशी माहिती नव्हती. २४ कॅरेट शुद्ध सोन्याशी तुलना करता येऊ शकेल अशी लेखनवैशिष्टय़े असलेल्या कथाकाराच्या ‘सेव्हन गुड इयर्स’ या पुस्तकाने मात्र ती अडचण दूर केली आहे. म्हणूनच या लेखकासह त्याच्या ताज्या पुस्तकाविषयी..
एटगर केरेट या लेखकाचा १९९२ साली प्रकाशित झालेला हिब्रू भाषेतील पहिला कथासंग्रह इस्रायलमध्येही फारशी प्रसिद्धी मिळवू शकला नाही. मात्र तत्कालीन देशी साहित्यप्रवाहाशी फटकून वागणाऱ्या या कथा इंग्रजीत अनुवादित होऊ लागल्या आणि जगभरातून वाखाणल्या जाऊ लागल्या, तेव्हा त्यांचे महत्त्व इस्रायली वाचकांनाही पटू लागले. पुढे इस्रायलमध्ये पुस्तकालयांमधून सर्वाधिक वाचल्या आणि चोरल्या जाणाऱ्या ग्रंथांमध्ये एटगर केरेट यांचा समावेश झाला अन् देशातील वाढत्या लोकप्रियतेसोबत त्याच्या कथा जगभरातील भाषा व्यापू लागल्या.
एका बैठकीत तीन-चार सहज वाचून होतील इतक्या छोटय़ा आकाराच्या कथा लिहिणाऱ्या केरेट यांचा वाचकवर्ग हा जपानच्या हारुकी मुराकामी आणि चिलीच्या रॉबर्तो बोलानो यांच्याइतकाच प्रचंड आहे. (पैकी बोलानोला मिळालेल्या मरणोत्तर प्रसिद्धीनंतर अद्यापही त्याच्या साहित्याची रूपांतरे सुरूच आहेत.) त्यात त्याच्या कथांसोबत अकथनात्मक साहित्याचा म्हणजेच निबंधांचाही भाग आहे. ‘बिटविन द पॅरण्टनेस’मधून बोलानोच्या लेखन आणि भवतालाचा संदर्भ प्राप्त होऊ शकतो. हारुकी मुराकामी यांच्या ‘व्हॉट वी टॉक अबाऊट, व्हेन वी टॉक अबाऊट रनिंग’ या आत्मलेखांच्या संग्रहातूनही लेखक आणि माणूस म्हणून जडणघडणीचा संदर्भ लागतो. केरेट यांच्याबाबतीत अगदी अलीकडेपर्यंत ही सुविधा विकिपीडित माहिती आणि मायाजालावरील कथापंडितांच्या इंग्रजी निबंधांपुरतीच मर्यादित होती. केरेट यांच्या साहित्यावरील सिनेमे (रिस्टकटर्स: ए लव्ह स्टोरी, नाइन पॉइण्ट नाइण्टीनाइन डॉलर आणि जेलीफिश) आणि त्यांचे विविध भाषांमध्ये वेगात होणारी रूपांतरे यामुळे या लेखकावर गेल्या काही वर्षांत कुतूहलाचे वलय दाटले. या कुतूहलाचे शमन करता येणे ‘सेव्हन गुड इयर्स’ या नुकत्याच आलेल्या आत्मलेखांच्या पुस्तकाद्वारे सुकर होणार आहे.
जागतिक कथाभूमीत फ्रान्झ काफ्का आणि रेमण्ड काव्‍‌र्हर यांचा उत्तराधिकारी म्हणून केरेट यांची गणना केली जाते. ‘बस ड्रायव्हर हू वॉण्टेड टू बी गॉड’, ‘गर्ल ऑन द फ्रीज’, ‘मिसिंग किसिंजर’, ‘सडनली ए नॉक ऑन द डोअर’ हे कथासंग्रह आणि ‘नेलर्स हॅपी कॅम्पर्स’ ही लघुकादंबरी असा फार मोठा साहित्य प्रवास नसला, तरी त्यातला ऐवज वाचकांना झपाटून टाकणारा अन् २४ कॅरटी शुद्ध सोन्यासारखा आहे.
कथालेखनाची वैशिष्टय़े, इथेही..
प्रेयसीला भेटण्यास जाण्यासाठी बस पकडण्यास इच्छुक असलेल्या निवेदकाला बसचालकाचा वेळ पाळण्याचा शिरस्ता माहिती असूनही अनेक व्यवधानांमुळे त्याला होणारा उशीर आणि बसचालकाची अनपेक्षित कृती (बस ड्रायव्हर हू वॉण्टेड टू बी गॉड), एक नवी वस्तू घेण्यासाठी पैसे साठवण्याचा डबा मोडण्याच्या कल्पनेने कासावीस झालेल्या लहान मुलाने निवडलेला मार्ग (ब्रेकिंग द पिग बँक), पाइप्समध्ये अडकून कंटाळा आलेला मुलगा (पाइप्स), कथा लिहिण्याची अशक्य परिस्थिती निर्माण झालेला कथालेखक (सडनली ए नॉक ऑन द डोअर), फसलेल्या करामतींनी हैराण झालेला जादूगार (हॅट ट्रिक) आदी विविध संग्रहांतील कथा किंवा आत्महत्या करून स्वर्ग आणि नरक यांच्या अधल्यामधल्या अवस्थेतील जगात अडकलेल्यांच्या (नेलर्स हॅपी कंपास) कहाण्या इतके निवडक साहित्यही त्याच्या कथांचे चाहते होण्यास पुरेसे आहे. लघुकथांची आकर्षक सुरुवातीपासून चमत्कृतीपूर्ण शेवटापर्यंतची सारी वैशिष्टय़े विविध प्रयोगांनी केरेटने बऱ्याच कथांमध्ये उतरविली आहेत; पण या नियमांची आवश्यक तितकी पायमल्ली करणाऱ्या कथाही त्याने घडविल्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी त्याच्या कथांमध्ये अमेरिकी, ब्रिटिश, पारंपरिक, उत्तरआधुनिक, अभिजात अशा जगभरातील कलाकृतींचा, कलावृत्तींचा प्रभाव ठळकपणे दिसतो. गंमत म्हणजे ‘सेव्हन गुड इयर्स’मधील आत्मलेखांमध्येही केरेट यांच्या कथालेखनाची सारी वैशिष्टय़े लागू होतात. ते निव्वळ माहिती देत नाहीत, तर आकर्षकरीत्या इस्रायली माणसांच्या अतिसामान्य व्यवहारांशी वाचकाला परिचित करून देतात.
केरेट राहत असलेल्या शहरावर झालेल्या पॅलेस्टिनी दहशती हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर केरेट यांच्या मुलाचा जन्म झाला. त्या दिवसापासून सुरू झालेल्या या आत्मकथनात सात ‘चांगल्या’ वर्षांचा काळ आलेला आहे तो नावालाच. प्रत्यक्षात एक लेखक म्हणून, एक माणूस म्हणून, एक इस्रायली नागरिक म्हणून आणि अंतिमत: एक पिता म्हणून आपल्या जगण्याच्या विविध स्तरांना केरेट यांनी समोर आणले आहे. राजकीय धोरणांमुळे शेजारी राष्ट्रांशी ओढवून घेतलेल्या वैरामुळे इस्राइलमधील सामान्य माणूस कोणत्या दहशतपूर्ण वातावरणात जगतो आणि त्याच्या दैनंदिन व्यवहारांत कसा फरक पडतो, याचे त्यांनी सुंदर विवेचन केले आहे. नाझींकडून झालेल्या संहारात वाचलेल्या आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतल्याने भवतालाकडे लहानपणापासून कोणत्या दृष्टीने पाहायचे, हे त्यांच्या लेखनातून स्पष्ट होते. मात्र ते कुठेही सहानुभूतीची अपेक्षा ठेवत नाही. उलट सगळ्याच गोष्टींकडे खोडकरपणे पाहत, मिश्कीलपणे टिप्पणी करत वाचकाला पकडून ठेवते.
देशप्रेम आणि खिल्लीसुद्धा..
पहिल्याच प्रकरणामध्ये ही पकड लक्षात येते. पॅलेस्टिनींच्या हल्ल्यामुळे शहरातील डॉक्टरांचा ताफा आपत्कालीन विभागात मदतीस गेला असताना लेखक आपल्या पत्नीला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होतो. तेथे एक पत्रकार त्याला ओळखून दहशतवादी हल्ल्याचा अनुभव कथन करायला सांगतो. प्रत्यक्षात जेव्हा त्याला लेखक हल्लापीडित नसल्याचे समजते तेव्हा पत्रकार हिरमुसून निघून जातो. मात्र त्यांच्यात थोडा काळ चालणारा संवाद दहशतवादाविषयी लेखकाच्या मनातील बरेच काही सांगून जातो.
अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यानंतर एखाद आठवडय़ाभरातच तिथल्या विमानतळावरील अनुभवांवर त्रयस्थाच्या नजरेतून केलेली टिप्पणी असो किंवा जर्मनीमधल्या एका प्रवासात गैरसमजामुळे आलेला कटू अनुभव असो, तुमची नजर ज्या पद्धतीने जग बघू इच्छिते तसे ते दिसते, हे यातले काही निबंध सुचवितात.
थायलंडमध्ये राहत असलेला आपला लोकविलक्षण भाऊ, कट्टरपंथीयांच्या धर्मभूमीत राहत असल्याने आपली एकही कथा वाचता न येऊ शकलेली बहीण, अफलातून करामती करून आयुष्यभर आपले ओझे न लादू देणारे वडील, नाझी संहारातून बचाव झाला तरी पोलंडमध्ये मन हरवलेली आई, वेळप्रसंगी लेखकाला ताळ्यावर आणणारी पत्नी, सुपरस्मार्ट तंत्रज्ञानी आयुधांच्या जगात निपजलेला मुलगा यांच्यावरील तीन ते पाच पानांचे लघुनिबंध हे केरेट यांच्या सशक्त कथनशैलीचे आविष्कार आहेत.
याशिवाय वेळोवेळी पुस्तक प्रसिद्धीच्या दौऱ्यांत, साहित्यिक सभांत आलेल्या अनुभवांचा दाखला आहे. लष्करी तळावर पहारा देताना आलेल्या कंटाळ्यातून लिहिल्या गेलेल्या पहिल्या कथांसाठी वाचक मिळविण्यासाठीचा आटापिटा व उडविल्या गेलेल्या खिल्लीमुळे कथालेखकच होण्याचा केलेला निर्धार एका निबंधात व्यक्त होतो, तर एका निबंधात बाली येथील बेटावर ऐकलेल्या कुण्या एका विदेशी माणसाचे भलतेच अनुभव शब्दबद्ध होतात. पुस्तकाच्या नावाबरहुकूम, मुलाच्या जडणघडणीच्या काळातील सारे चित्रविचित्र अनुभव येथे आले आहेतच. त्याशिवाय स्वत:च्या लहानपणाच्या कैक स्मृतींची पाने लेखकाने येथे उलगडली आहेत. हा सारा प्रवास इस्रायल आणि त्याच्या शेजारी राष्ट्रांशी या काळात झालेल्या धुसफुसीच्या वृत्तपत्रीय बातम्यांच्या पलीकडचा आहे. लेबनॉन युद्ध, दहशतवादभय, सततचा सायरन.. आदींवर इस्रायली सामान्य माणसाच्या भूमिकेतील निरीक्षणे येथे दाखल होतात. यात ‘इस्रायल युद्ध जिंकण्याचे जाणते’, असे म्हणत कधी राष्ट्राभिमान जागा होतो, तर कधी आपल्या देशाला इराणने जिंकून घेतल्यानंतर काय होईल, याविषयीच्या दु:स्वप्नांना तोंड फुटते तेव्हा विनोदी कल्पनांनाही थारा दिला जातो.
सूक्ष्म संदर्भ टिपणाऱ्यांच्या माळेत..
आतापर्यंत एटगर केरेट या लेखकाच्या कथनसाहित्यापुरत्या परिचित असलेल्या विश्वाला एकूणच लघुनिबंधांचे चटकन पूर्ण होणारे हे कडबोळे त्याच्या अनेक कथांच्या संदर्भापर्यंत नेऊन ठेवेल. गेल्या काही वर्षांमध्ये लोकप्रिय कथालेखकांना ‘नॉनफिक्शन’ लिहिण्यास प्रवृत्त करून ‘जीक्यू’, ‘न्यूयॉर्कर’, ‘बिलिव्हर’, ‘टॅबलेट’ यांच्यासारखी नियतकालिके जाणीवपूर्वक अकथनात्मक सुरस रिपोर्ताजचा नवा प्रवाह तयार करीत आहेत. लेखणीतील खुसखुशीतपणा आणि पत्रकारांच्या बनचुक्या नजरेतून सुटू शकतील अशा सूक्ष्म संदर्भानी हे रिपोर्ताज साकारले जात आहेत. त्यातून तयार झालेली जॉर्ज सॉण्डर्स, जोनाथन फ्रेन्झन, एलिझाबेथ गिल्बर्ट, हारुकी मुराकामी आदी कथाकारांची अकथनात्मक पुस्तकेही तेजीत संपत आहेत. आता त्या नावांच्या पंक्तीत एटगर केरेट यांचाही समावेश झाला आहे.
६ सेव्हन गुड इयर्स : लेखक : एडगर केरेट, अनुवाद : सॉण्ड्रा सिल्व्हरस्टन, मरिअम श्लेसिंजर, जेसिका कोहेन, अ‍ॅन्थनी बेरीस
प्रकाशक : रिव्हरहेड बुक्स, पृष्ठे १९२,
किंमत (ई-पुस्तक) : ६४० रु.
पंकज भोसले – pankaj.bhosale@expressindia.com