मुकुंद संगोराम mukund.sangoram@gmail.com

परंपरा आणि त्यातील तहजीब टिकवून धरत असतानाच जगातील संगीताकडेही मोकळ्यापणाने पाहण्याची दृष्टी सतारवादक विलायत खाँ यांच्याकडे होती. त्यांच्या मनस्वी आणि सर्जनशील जगण्यातील गडद आणि धुरकट पदर उलगडणाऱ्या पुस्तकाविषयी..

शहर : दिल्ली. वर्ष : १९५२.

स्थळ : कॉन्स्टिटय़ूशन क्लबचे मैदान.. ऐन तारुण्यात असलेल्या दोन कलावंतांच्या सहवादनाची मैफील, म्हणून मोठय़ा संख्येने रसिक जमा झालेले. स्वातंत्र्य मिळून पाचच वर्षे झालेली आणि तो आनंद अजूनही ओसरलेला नव्हता. रविशंकर आणि अलीअकबर खाँ हे ते कलावंत; उस्ताद अल्लादीन खाँ यांचे शिष्य. ते स्वत: जातीने हजर. एकाच्या हाती सतार, तर दुसऱ्याच्या हाती सरोद. अली अकबर खाँ हे अल्लादीन खाँ यांचे चिरंजीव, तर रविशंकर जावई. अचानक एक तरुण स्वरमंचासमोर हातात सतार घेऊन उभा राहिला. अस्खलित उर्दूमध्ये म्हणाला, ‘‘या स्वरमंचाने स्वरांचे अनेक गंध अनुभवले आहेत. आज मलाही माझा गंध त्यात मिसळू द्या.’’ या अचानक आगमनाने स्तंभित झालेल्या रसिकांमध्ये चुळबुळ सुरू झाली. अल्लादीन खाँ यांनी समोर येऊन असे करण्यास विरोध दर्शवला. एव्हाना चुळबुळीचे रूपांतर गलक्यात झालेले. आणि त्याला स्वरमंचावर जाण्याची अनुमती मिळाली. त्या तरुण कलावंताचे नाव- विलायत खाँ! त्या मैफिलीत त्याने आपल्या हाताची जादू अशा काही पद्धतीने दाखवली, की सगळे जण अक्षरश: चकित झाले. विलायत खाँ यांच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा मैलाचा दगड. वयाच्या दहाव्या वर्षी गुरू आणि वडील असलेल्या उस्ताद इनायत खाँ यांचे निधन झालेले आणि गुरूच्या शोधात भटकंती करत कोलकात्यापासून दिल्लीपर्यंत पोहोचलेला हा लहानगा मुलगा कलेच्या शोधात होता. त्याला शाळेत जायचेच नव्हते, संगीतच करायचे होते. पण त्यासाठी गुरू हवा, मार्गदर्शक हवा.

भारतीय संगीताच्या वाद्याच्या प्रांतात आपल्या स्वतंत्र शैलीने आणि प्रज्ञेने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या या असामान्य कलावंताचे सगळे आयुष्य एखाद्या कादंबरीसारखे होते. ‘द सिक्स्थ स्ट्रिंग आॉफ विलायत खाँ’ या प्रसिद्ध संगीताभ्यासक नमिता देवीदयाल यांच्या पुस्तकातून या कलावंताचे जगणे जेवढय़ा आत्मीयतेने लिहिलेले दिसते, तेवढय़ाच प्रमाणात एका कलावंताला आयुष्यात आपल्या कलात्मक जीवनात काय काय करावे लागले, याचे दर्शनही घडते. भारतीय संगीताला एक शाप कायमचाच लागला असावा; तो म्हणजे कलावंताने उपाशीपोटी कला सादर करावी आणि रसिकांनी ती भरल्यापोटी ऐकावी. कलेची उंची गाठण्यासाठी केवळ श्रम करून उपयोग नसतो, त्यामागे स्वत:चा असा विचार असावा लागतो, धारणा असावी लागते आणि त्याहून अधिक सर्जनाचे दान असावे लागते. विलायत खाँ यांनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या अडचणींना तोंड दिले, त्या बहुतेकांना कमी-अधिक प्रमाणात येतच असतात. प्रश्न असतो तो त्यांना सामोरे जातानाही आपली कलात्मक जगण्याची भूक टिकवून ठेवण्याचा. इमदाद खाँ हे विलायत खाँचे आजोबा. दरबारी कलावंत वडील इनायत खाँ यांच्याकडे संगीताची परंपरा त्यांच्या वडलांकडून आलेली. त्या काळात संगीताचा रियाझ किती केला, याच्या मोजणीचे माप मेणबत्ती असे. किती मेणबत्त्या जळेपर्यंत रियाझ केला, यावरून त्या कलावंताच्या कष्टाची ओळख असे. या इमदाद खाँ यांचा रियाझ चार मेणबत्त्यांचा होता. त्या पूर्ण जळेपर्यंत त्यांनी जागेवरून उठायचेही नाही, असा पण त्यांनी केला होता. पण असा रियाझ करताना, स्वत:च्या मुलीची तब्येत अतिशय खालावली तरीही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले; परिणामी त्या मुलीला मृत्यूला कवटाळावे लागले होते, अशी एक आठवणही या पुस्तकात वाचायला मिळते. विलायत खाँ यांच्या घरात फक्त स्वरांचेच राज्य. त्यातून सतारीसारखे अवघड वाद्य हाती धरलेले. शाळेच्या प्रगतिपुस्तकात खाडाखोड करून उत्तीर्ण असल्याचे दाखवणाऱ्या विलायत खाँ यांना वडिलांनी- शाळेत जायचेय की संगीत करायचेय, असा प्रश्न विचारला; तेव्हा ‘संगीत’ असे उत्तर त्यांनी दिले. आवडीनेच संगीत करायचे ठरवले, तर त्यासाठी अघोरी कष्ट करण्याशिवाय पर्यायच नाही, हे कळेपर्यंत इनायत खाँ यांचा मृत्यू झाला. कोलकात्यातील त्यांच्या राजेशाही थाट असलेल्या घराला अवकळा आली. केवळ आई बशरीन हिने मुलांच्या संगोपनासाठी घेतलेले अपार कष्ट या मुलांचे आयुष्य बदलायला कारणीभूत ठरले.

नमिता देवीदयाल यांच्या लेखन शैलीचे वैशिष्टय़ असे की, विलायत खाँ यांच्याबद्दल लिहिताना त्यांच्या मनात असलेला आदरभाव त्या लपवू शकत नाहीत. एखाद्याचे आयुष्य समजून घेताना त्याच्या मनाच्या आतपर्यंत पोहोचण्याची त्यांची हातोटी अधिकच लोभस. एखादी गोष्ट सांगावी तशी त्या विलायत खाँ यांचे आयुष्य उलगडून सांगतात. आयुष्यात फक्त एकदाच विलायत खाँ यांची भेट झालेली, पण त्यांच्या सतारीने पिच्छा काही सोडला नाही. रविशंकर आणि विलायत खाँ यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे त्या सहजपणे सांगतात. कलावंत म्हणून वाटय़ाला आलेले यश, अपयश, कीर्ती, पैसा या पलीकडे जाऊन त्या कलावंतामध्ये दडलेला माणूस शोधण्याचा त्यांचा प्रयत्न या पुस्तकाची वाचनीयता अधिकच वाढवतो. ज्या कोलकात्यात वडील इनायत खाँ यांचा दबदबा होता, तिथेच अपमानित व्हावे लागणे विलायत खाँ यांच्या जिव्हारी लागणारे होते. कोलकाता सोडताना ‘पुन्हा येईन ते कलावंत झाल्यावरच,’ अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आणि ती खरीही करून दाखवली.

सतार वादनाच्या शैलीत त्या वाद्याच्या अंगभूत स्वभावामुळे संगीताचा आविष्कार गायनापेक्षा वेगळ्या पद्धतीने करता येणे शक्य असते. वाद्यावर प्रभुत्व मिळवल्यानंतर मेंदूने अतिशय वेगाने निर्माण होणारे संगीत त्या वाद्यातून लीलया व्यक्त करणे शक्य होते. रविशंकर यांनी नेमके हेच केले. ते ज्या परंपरेचे पाईक होते, त्या तंत अंगाच्या शैलीत वाद्यातून गायनापेक्षा अधिक वेगळे, चमत्कृतीपूर्ण आणि तरीही मनाला भिडणारे कारंज्यासारखे मनोहर संगीत व्यक्त करण्याची क्षमता होती. रविशंकरांनी त्या शैलीत पाश्चात्त्य संगीतातील काही संकल्पनांचा समावेश केला, तरीही त्यांचे सतारवादन भारतीय परंपरेतलेच राहिले. विलायत खाँ यांनी आपली वाट बदलली. लहान वयात त्यांना गायक व्हायचे होते. पण वडिलांची सतार वादनाची परंपरा टिकून राहण्याच्या उद्देशाने, आईच्या हट्टाखातर सतार हे सर्वस्व करायचे त्यांनी ठरवले. पण त्या सतारीतून त्यांनी आपले गाणेच सादर केले. त्यांनी तंत अंगाच्या शैलीपासून फारकत घेत गायकी अंग विकसित केले. त्यासाठी सतारीमध्ये अनेक तांत्रिक बदल केले. षडज् पंचम या मूलभूत स्वरांच्या आधारासाठी आवश्यक असलेला तंबोरा त्यांनी सतारीतच सामावून टाकला. त्या सतारीला आणखी एक शेवटची सहावी तार त्यांनी जोडली. वादनातील प्रभुत्व मिळवण्यासाठी करावी लागणारी मेहनत तर त्यांनी केलीच, पण त्यानंतर त्यांनी केवळ संगीताचाच विचार केला. गळ्यातून व्यक्त होणाऱ्या संगीताशी आपल्या सतारवादनाची नाळ जोडत त्यांनी वाद्य वादनाच्या क्षेत्रात एका नव्या पद्धतीचा विचार रुजवला.

कलावंत म्हणून मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या वलयामुळे येणारा उच्छृंखलपणा विलायत खाँ यांच्याकडेही आला. स्वरमंचावर कलावंत म्हणून देवत्व प्राप्त झालेल्यांना उर्वरित आयुष्यात मानवाच्या ठायी असलेल्या षड्रिपुंच्या तावडीतून सुटका करून घेता येतेच असे नाही. विलायत खाँ यांच्याबाबतीत असेच घडले. ज्या काळात त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, तो काळ चित्रपट संगीताने भारण्याचा होता. एका नव्याच धाटणीने साऱ्या भारतीयांचे लक्ष वेधून घेतले होते. अभिजात संगीताच्या आधारे तयार होणाऱ्या चित्रपट गीतांबरोबरच पाश्चात्य संगीताशी नाते जोडणाऱ्या नव्या शैलीनेही प्रेक्षक प्रभावित होत होते. अशा काळात शुद्ध संगीत टिकवून ठेवण्यासाठी विलायत खाँ यांच्याबरोबरीने त्या काळातील सगळेच कलावंत कसोशीने प्रयत्न करत होते. ज्येष्ठ गायक उस्ताद अमीर खाँ, मदनमोहन आणि नौशाद या संगीतकारांशी त्यांची असलेली गाढ मैत्री, गायन न करण्याचे आईला दिलेले वचन न मोडता सतार वाजवता वाजवता मधेच गळ्यातून सतारीवरची धून गाऊन दाखवण्याची लकब, उस्ताद अहमदजान थिरकवा यांच्यासारख्या तबलजीचे लाभलेले मैत्र आणि कोणत्याही स्पर्धेला तोंड देण्याची जिद्द या विलायत खाँ यांच्या स्वभावातील गुणवैशिष्टय़ांचे वर्णन करण्याऐवजी नमिता देवीदयाल खूप साऱ्या कहाण्या सांगतात. त्यातले छोटेछोटे तपशील कथेसारखे टिपतात.

परंपरा आणि त्यातील तहजीब टिकवून धरत असतानाच जगातील संगीताकडेही मोकळ्यापणाने पाहण्याची दृष्टी या सतारवादकाकडे होती. त्यामुळे वयाच्या ऐन तिशीत त्याने भारताबाहेर पाऊल ठेवले आणि तिथल्या रसिकांना मंत्रमुग्ध केले. पण तरीही विलायत खाँ कधी ‘शोमन’ झाले नाहीत. आपल्याच तोऱ्यात आणि धुंदीत राहणे त्यांनी पसंत केले. मुंबईत दीर्घकाळ वास्तव्य केले, तरीही प्रेम मात्र कोलकात्यावरच केले. आपल्या कलेचे मूल्यमापन अन्य कोणी करणे, हे त्यांना कधीच पसंत नव्हते. त्यामुळे ‘पद्मश्री’ पुरस्कार न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मग ‘पद्मभूषण’ हा पुरस्कारही त्यांनी नाकारला. मनस्वी आणि सर्जनशील अशा या कलावंताच्या जगण्यातील गडद आणि धुरकट पदर नमिता देवीदयाल यांनी इतक्या सुंदरपणे रेखाटले आहेत, की त्यामुळे या पुस्तकाचे स्वरूप केवळ चरित्र असे राहत नाही. विलायत खाँ यांचे मित्र, नातेवाईक, ते राहिलेली ठिकाणांना भेट देऊन या कलावंताला समजून घेण्याचा केलेला कष्टपूर्वक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक!

‘द सिक्स्थ स्ट्रिंग ऑफ विलायत खाँ’

लेखक : नमिता देवीदयाल

प्रकाशक : कॉन्टेक्स्ट, वेस्टलँड पब्लिकेशन्स प्रा. लि. चेन्नई

पृष्ठे: २५४, किंमत : ६९९ रुपये