News Flash

दोन हेरांच्या गप्पा.. दोन देशांचे प्रश्न!

‘द स्पाय क्रॉनिकल्स : रॉ, आयएसआय अ‍ॅण्ड द इल्यूजन ऑफ पीस’

|| रवि आमले

  • ‘द स्पाय क्रॉनिकल्स : रॉ, आयएसआय अ‍ॅण्ड द इल्यूजन ऑफ पीस’
  • लेखक : ए. एस. दुलत, असद दुर्रानी, आदित्य सिन्हा
  • प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
  • पृष्ठे : ३४४ ; किंमत: ७९९ रु.

दोन गुप्तचर अधिकारी. एक रॉचे माजी प्रमुख. दुसरे आयएसआयचे माजी प्रमुख. या दोन्ही संस्था एकमेकांना शत्रुस्थानी. एकमेकांविरोधात कटकारस्थाने करणाऱ्या. यातील ‘आयएसआय’ – इंटर सव्‍‌र्हिसेस इंटेलिजन्स – ही पाकिस्तानी लष्कराची अत्यंत शक्तिशाली अशी संस्था. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांनी हात रंगलेली. तिचे नाव काढताच कोणत्याही भारतीयाच्या कपाळाची शीर तडकावी. हेच पाकिस्तानात  आपल्या ‘रॉ’बाबत. ही भारताच्या कॅबिनेट सचिवालयांतर्गत येणारी हेरसंस्था. रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग- संशोधन आणि विश्लेषण विभाग. नाव किती साधे! पण आपल्यासाठी आयएसआय जेवढी खतरनाक त्याहून पाकिस्तानी नागरिकांसाठी ही संस्था अधिक भयंकर आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक समस्येमागे त्यांना ‘रॉ’ दिसते. तेथील अनेकांची तर अशीही श्रद्धा आहे, की पाकिस्तानी तालिबानमागेही रॉचाच हात आहे. तर अशा या संस्थांचे माजी प्रमुख एकत्र येतात. वेगवेगळ्या देशांत, शहरांत, तेथील हॉटेलांत मद्याचे घोट घेत, सिगारची धूम्रवलये काढत गप्पा मारतात. हे म्हणजे आक्रीतच. पण ते घडले आणि त्यातून जन्माला आले ‘द स्पाय क्रॉनिकल्स’.

आधी आयबीचे आणि नंतर रॉचे प्रमुख आणि निवृत्तीनंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार अशी पदे सांभाळलेले अमरजीत सिंह दुलत आणि पाकिस्तानी लष्करातील निवृत्त लेफ्ट. जनरल आणि आयएसआयचे माजी महासंचालक मोहम्मद असद दुर्रानी यांचा रॉ, आयएसआय, सीआयए, केजीबी आणि अर्थातच भारत-पाक संबंध, खासकरून काश्मीर अशा विविध विषयांवरील संवाद, असे या पुस्तकाचे स्वरूप. हेच त्याचे सर्वात मोठे वैशिष्टय़.

त्यांच्या या मफलीतील सुसंवादक आहेत लेखक-पत्रकार आदित्य सिन्हा. ‘काश्मीर- द वाजपेयी इअर्स’ हे दुलत यांचे याआधीचे पुस्तक. त्याचे सहलेखन आदित्य सिन्हा यांनीच केले होते. काश्मीर, तेथील माणसे, नेते, दहशतवादी, फुटीरतावादी आणि दिल्ली दरबार यांचे एक वेगळेच दर्शन घडविणारे ते पुस्तक. ते गाजले त्यातील काही गौप्यस्फोटांमुळे. परंतु त्याही पलीकडे त्या पुस्तकाने आपल्याला काश्मीर समस्येचे काही वेगळेच – जनमाध्यमांतून सहसा न येणारे – पलू दाखविले. काश्मीर समस्या समजून घेण्याचे आपले स्रोत म्हणजे माध्यमांतील वृत्तान्त वा लेख आणि नेत्यांची भाषणबाजी. पण त्यातून उभे राहणारे चित्र अर्धवटच असते. त्यापलीकडे खूप काही चाललेले असते. त्याचा गंधही सामान्यांना नसतो. माहितीच्या फेकलेल्या तुकडय़ांवरच त्यांचा मत-निर्वाह चाललेला असतो याचे किमान भान देणारे असे ते पुस्तक होते. त्या पाश्र्वभूमीवर आता ‘स्पाय क्रॉनिकल’ आले आहे.

या पुस्तकाची मूळ कल्पना दुलत यांची. जन. दुर्रानी आणि त्यांची जुनी जानपहचान. निवृत्तीनंतर त्यांनी मिळून भारत-पाक संबंधांवर दोन संशोधन प्रबंध लिहिले होते. त्याच प्रकारे हे पुस्तक लिहिण्याचा त्यांचा विचार होता. ‘जगरनॉट बुक्स’च्या संचालक, प्रकाशिका चिकी सरकार यांनी त्यासाठी संवादाचे स्वरूप सुचविले. दुलत आणि दुर्रानी यांच्या छान गप्पा चालल्यात आणि एका कोपऱ्यात बसून आपण त्या ऐकतोय असा भास हे पुस्तक निर्माण करते. ही शैली आकर्षक खरी. पण या संवाद स्वरूपाच्या काही अंगभूत मर्यादाही आहेत. गप्पा कितीही गंभीर असल्या, तरी त्यात एक उडतेपणा येतोच. बोलताबोलता माणसे एका विषयातून दुसऱ्यावर घसरतात. वाक्ये अर्धवट सोडतात. त्यात जागा गळतात. स्पाय क्रॉनिकल्स वाचताना या – दोन ओळींमधल्या – रिक्त जागा ठिकठिकाणी आढळतात. भारत-पाक संबंधांच्या अभ्यासकाला वा गंभीर वाचकाला त्या भरून काढता येतात हे खरे. प्रश्न येतो तो या विषयाला नव्यानेच भिडणाऱ्यांचा. त्यांना थोडा गृहपाठ करावा लागणार. ही एवढी कमतरता सोडली, तर मात्र हे पुस्तक दृश्य राजनीतीमागील घडामोडींचा, विचारांचा पट आपल्यासमोर मांडते. गुप्तहेरांच्या विचारविश्वाची सफर घडवते.

‘सनसनाटी’च्या पलीकडले..

आता गुप्तहेरांचे विश्व म्हटले, की आपल्या नजरेसमोर तातडीने त्या गोपनीय मोहिमा, झुंझार हेर, त्यांची वेशांतरे, छुपे कॅमेरे वगरे वगरे बरेच काही उभे राहते. गुप्तहेरांचे पुस्तक म्हटले, की सनसनाटी गौप्यस्फोटांची अपेक्षा उंचावते. या पुस्तकात ओसामा बिन लादेन येतो, कुलभूषण जाधव येतात. रॉने दिलेल्या एका गोपनीय माहितीमुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे प्राण वाचल्याची माहिती यातून मिळते. या दोन्ही माजी प्रमुखांनी रॉ आणि आयएसआयची केलेली तुलना या हेरसंस्थांबाबतचे आपले दृष्टिकोन तपासून घेण्यास साह्य़भूत ठरते. परंतु यात गौप्यस्फोट म्हणावे असे फार काही नाही. अमेरिकेच्या ‘नेव्ही सील्स’नी लादेनला पाकिस्तानात ‘घुसून’ मारले. त्या ‘लक्ष्यवेधी हल्ल्या’चे आपल्याला फार कौतुक. परंतु ती कारवाईही पाकिस्तानच्या सहकार्याने झाली होती. ओसामाला मारण्याच्या काही दिवस आधी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जन. अश्फाक कयानी ‘कुणाला तरी’ (म्हणजे अफगाणिस्तानातील अमेरिकी कमांडर डेव्हिड पेट्रॉस यांना) एका जहाजावर किंवा हवाईतळावर भेटले होते. दुर्रानी यांच्या मते अफगाणिस्तानातून अमेरिकी फौजांनी माघार घेण्याच्या बदल्यात ‘तो’ व्यवहार ठरला होता. आता हे सारे कबूल करणे हे पाकिस्तानी नेत्यांसाठी राजकीयदृष्टय़ा आत्मघाताचेच. त्यामुळे ते कोणी मान्य करणार नाही. दुर्रानी मात्र त्याची स्पष्ट कबुली देतात. पण ती बाबही तशी जगजाहीर आहे. सेम्यूर हर्ष यांनी तर त्यावर पुस्तकच लिहिले आहे. तरीही पाकिस्तानी सरकार आणि लष्कर दुर्रानी यांच्यावर नाराज आहे. त्यांच्याकडून एकंदरच या पुस्तकाबाबत लष्कराने खुलासा मागितला आहे. हे सारे विनोदीच. कारण दुर्रानी यांनी जे काही सांगितले आहे, त्यात गौप्यस्फोट काही नाहीच.

भारतीयांच्या आणि खासकरून मराठी वाचकांच्या दृष्टीने यातील कुलभूषण जाधव प्रकरण महत्त्वाचे. त्याबाबत मात्र दुलत आणि दुर्रानी हे जर-तरच्या भाषेतच बोलताना दिसतात. जाधव हे हेर नसल्याचे भारताचे म्हणणे आहे. दुलत म्हणतात, ‘‘हे समजण्यासारखे आहे. जर ते हेर असतील तरी त्याचा इन्कारच केला जाईल आणि नसतील तर इन्कारच केला जाईल. पण आपल्याला जे काही कळते त्यावरून असे म्हणता येईल की हे जर रॉचे ऑपरेशन असेल, तो रॉचा हेर असेल, तर हे अत्यंत निष्काळजी ऑपरेशन आहे.’’ आता यावरून काय समजायचे? त्यांच्या संवादातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे जाधव हेर असोत वा नसोत, पठाणकोटच्या पाश्र्वभूमीवर ताणल्या गेलेल्या भारत-पाक संबंधांचे ते बळी आहेत. परंतु यातही नवीन असे काहीच नाही. कुलभूषण जाधव प्रकरणाच्या प्रारंभी आदित्य सिन्हा दोघांनाही एक प्रश्न विचारतात – ‘यातील खरी गोष्ट काय आहे आणि दोन्ही देश हेरगिरीची प्रकरणे कशी हाताळतात?’ या प्रश्नाच्या दुसऱ्या भागाचे उत्तर आपल्याला मिळते. जाधव प्रकरण जुन्या शंका तशाच ठेवून पुढे सरकते.

परंतु या पुस्तकाचा हेतू मुळात सनसनाटी गुपिते फोडणे वगरे नाहीच. या दोघांचा संवाद सीआयए, रशिया, अमेरिका-अफगाण-पाक यांच्यातील राजकारण, काश्मीर, हाफीझ सईद अशा विविध वाटांवरून जातो. पण या साऱ्या प्रवासाची दिशा एकच आहे. भारत-पाक संबंधांत सुधारणा कशी करता येईल, संघर्ष कसा टाळता येईल, यावर हे दोघे सातत्याने बोलत आहेत. त्यासंदर्भात तोडगे सुचवीत आहेत. तेव्हा हा ‘ट्रॅक टूडिप्लोमसी’चाच एक भाग म्हणता येईल. स्वयंसेवी संस्था, थिंक टँक अथवा विचारमंच, सुप्रतिष्ठित नागरिक, निवृत्त उच्चपदस्थ अधिकारी, सचिव यांच्यामार्फत दोन राष्ट्रांमधील संबंध सुधारण्यासाठी जे सुरू असते ती ‘ट्रॅक टू डिप्लोमसी’. आंतरराष्ट्रीय संबंधांत थेट राजनतिक संवादाला पूरक म्हणून ही पडद्यामागची वैचारिक देवाणघेवाण सुरू असते. भारत-पाक दरम्यान हा मार्ग मध्यंतरी बंद होता. परंतु आता पुन्हा तो सुरू करण्यात आला आहे. १९९१-९२ मध्ये ‘नीमराना डायलॉग’ म्हणून सुरू करण्यात आलेला बिगरसरकारी राजनतिक संवाद मोदी सरकारने पुन्हा सुरू केला आहे. गेल्या एप्रिलमध्ये माजी परराष्ट्र सचिव विवेक काटजू यांच्या अध्यक्षतेखालील एक शिष्टमंडळ पाकिस्तानात पाठविण्यात आले होते. तर अशा पडद्यामागील बिगरराजकीय राजनतिक संवादांमध्ये दुलत आणि दुर्रानी या दोघांचाही नेहमीच सहभाग राहिलेला आहे. तेव्हा ही चर्चा – पुस्तकाच्या उपशीर्षकात ‘इल्यूजन ऑफ पीस’ असे म्हटलेले असले, तरी – भारत-पाक यांच्या संघर्षहीन संबंधांवरच येऊन ठेपते.

अतिरंजनाचा ‘लक्ष्यवेध’!

त्यातील एक टप्पा आहे लक्ष्यवेधी हल्ल्याचा. पठाणकोट, उरी, गुरुदासपूर येथील हल्ल्यांचा. लक्ष्यवेधी हल्ला म्हणजे नेमके काय, भारताने केलेला हल्ला, त्यामागील आंतरराष्ट्रीय राजकारण आणि त्यातून मिळालेला राजकीय फायदा या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी हे प्रकरण मुळातून वाचले पाहिजे. त्यातील दुर्रानी यांचे एक विधान येथे आवर्जून सांगावे असे आहे. पठाणकोट, उरीच्या पाश्र्वभूमीवर ‘माध्यमांनी सगळ्या गोष्टी अतिरंजितपणे मांडून खूप समस्या निर्माण केल्या’ असे दुलत यांनी म्हणताच दुर्रानी उद्गारले, ‘माध्यमे ही शांततेची शत्रू आहेत.’ एका माजी गुप्तचर प्रमुखाच्या तोंडून आलेले हे वाक्य आहे. त्यामागचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. कारण त्या माध्यमांचे प्रेक्षक आपणच होतो.

भारत-पाकिस्तान संबंध किती डळमळत्या पायावर आधारलेले आहेत याचे भान हे प्रकरण देऊन जाते. त्या दोघांनीही चिंता व्यक्त केली आहे ती हीच. पठाणकोट, उरी नंतर ‘लक्ष्यवेधी हल्ला’ झाला. त्यात ‘समजुतीचा भाग’ किती होता, मुळात होता की नव्हता हा प्रश्न त्यांनी आपल्यासमोर उभा केला आहे. परंतु उद्या जर एखादा ‘मुंबई’ वा ‘संसदहल्ला’ झाला, तर पुढे काय? दुर्रानी म्हणतात, दोन्ही देशांतील संबंधांचे आणि क्रिया-प्रतिक्रियांचे ‘डायनॅमिक्स’ काबूत ठेवता येईल. पण ते अवलंबून असेल, सत्तेवर कोण आहे त्यावर. तेथे वाजपेयींसारखे असतील, तर ते हे करू शकतील. येथे प्रश्न येतो मोदींचा. दुलत म्हणतात, ‘तुम्ही तुम्हाला एका विशिष्ट प्रतिमेत रंगविले असले, की मग लोक तुमच्याकडून तातडीने प्रतिहल्ल्याची अपेक्षा करतात.’  त्याही पुढे जाऊन दुर्रानी चिंता व्यक्त करतात ती ज्यांना स्थर्य नको आहे, अंदाधुंदीत ज्यांना रस आहे अशा सत्तेतील आणि सत्ताबाह्य़ शक्तींची. भारत-पाक संबंध सुधारूच नयेत अशी इच्छा बाळगणारे ‘नॉनस्टेट अ‍ॅक्टर’ आज दोन्ही देशांत ‘मोठा पडदा’ गाजवताना दिसत असताना या गुप्तचरांची भयशंका कापरे निर्माण करणारी ठरते.

‘डोवल हेच धोरण’?

या परिस्थितीत आपल्यासमोर येते ‘डोवल डॉक्ट्रीन’. अजित डोवल (खरा उच्चार डोभाल) हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. ते रॉचे हेर होते अशी एक लोकप्रिय समजूत आहे. वस्तुत: ते आयबीचे अधिकारी होते. १९८०च्या दशकात ते इस्लामाबादेतील भारतीय वकिलातीमध्ये अधिकारी होते. तेथे ते काही काळ सहकुटुंब होते. त्यांचा मुलगा शौर्य तेथील शाळेत शिकतही होता. कदाचित त्या वास्तव्यातील अनुभवांमुळे असेल वा वैचारिक संस्कारांमुळे; पाकिस्तानबाबतची त्यांची भूमिका नेहमीच कठोर राहिलेली आहे. दुर्रानी यांच्या बोलण्यातून ही बाब सतत समोर येते की, पाकिस्तानात डोवल यांच्याविषयी प्रचंड अविश्वास आहे. पण त्याच वेळी पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार जन. नासीर खान जंजुआ आणि डोवल यांच्यात चांगले संबंध आहेत. वाजपेयी आणि मुशर्रफ यांच्यात असेच चांगले संबंध होते. कारगिलचे युद्ध आणि संसदेवरील हल्ल्यानंतरही भारत-पाक संवाद सुरूच राहिला त्याचे श्रेय त्या संबंधांना. हीच बाब मोदींची. नवाझ शरीफ यांच्याकडे ते उगाच काही अचानक जाऊन टपकत नसतात. दुलत यांना खंत आहे ती हीच की, मोदींच्या पहिल्या दोन वर्षांतील हे वातावरण आज उरलेले नाही. आणि ‘मोदींचे पाकिस्तानबाबतचे धोरण’ अशी गोष्टही शिल्लक राहिलेली नाही. डोवल हेच मोदींचे आजचे पाकिस्तानविषयक धोरण आहे, ही याबाबतची दुर्रानी यांची टिप्पणी महत्त्वाची आहे. परंतु हे सारे घडले ते उरी हल्ल्यानंतर. आणि हाच खरा चिंतेचा मुद्दा आहे. हे संपूर्ण पुस्तक दृश्य-अदृश्यरीत्या याच एका चिंतेभोवती फिरत आहे. हल्ले होणार. काश्मीरमध्ये सतत काही तरी घडणार. परंतु म्हणून तुम्ही बोलणारच नाही?

काही दिवसांपूर्वी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी एक विधान केले होते- ‘आम्ही चच्रेस तयार आहोत. परंतु दहशतवाद आणि चर्चा हातात हात घालून जाऊ शकत नाही. हीच आमची नेहमीची भूमिका राहिलेली आहे.’ आपल्या तर्कबुद्धीला किती पटण्यासारखे आहे हे विधान. पण त्यात एक समस्या आहे. एकतर दहशतवाद आणि चर्चा एकत्र जाऊ शकत नाहीत, ही सामान्यांच्या जगातील भूमिका आंतरराष्ट्रीय राजकारणात लागू पडत नसते. तेव्हा, दुलत सांगतात, वाजपेयींनी अशी विधाने कधीही केली नाहीत. या दोन्ही गुप्तचरांचे म्हणणे हेच आहे की, ही अशी विधाने निर्थक आहेत. आपल्या अनुभवांतून ते सांगतात की, तुम्ही दहशतवाद्यांशी बोलणार नाही म्हणजे काय? तुम्ही सतत त्यांच्याशी बोललेच पाहिजे. जगातील कोणत्याही विवेकी गुप्तचर संस्थेसाठी बोलण्याकरिता हीच महत्त्वाची माणसे असतात. तुम्ही वाईट माणसांशी बोलत नसाल, तर मग कुणाशी बोलताय आणि त्यात वेळ का वाया घालवताय? हेरगिरी आणि नंतर ट्रॅक टू डिप्लोमसी असा दुहेरी अनुभव असलेल्या अधिकारी व्यक्तींचे हे सवाल आहेत. आपल्या घरातील सोफ्यावर चहा पिता-पिता कोणीही ते सहज उडवून लावू शकतो. पण प्रश्न आंतरराष्ट्रीय संबंधांचा आहे. काश्मीरमधील दहशतवादाचा आहे आणि या दोघांच्या मते तेथे वाटाघाटी, चच्रेला स्थान असलेच पाहिजे. पण तरीही एक मुद्दा उरतोच. पाकिस्तान दहशतवाद थांबवत का नाही? दुर्रानी यांनी त्यावर दिलेले उत्तर आहे – ‘वुइ डोन्ट वाँट टू लूज लीव्हरेज.’ हातातली कळ आम्ही सोडून नाही देणार. अन्यथा म्हणे परिस्थिती बिघडेल. ती अर्थातच पाकिस्तानसाठी. यातून समोर येणारी बाब ही आहे की, पाकिस्तानला या ‘नॉनस्टेट अ‍ॅक्टर्स’चे भय आहे.

यातून मार्ग काय? तर वाटाघाटी, चर्चा, बोलणे, संवाद. तो सर्व पातळ्यांवर.. गुप्तहेरांच्या, लष्कराच्या, अधिकाऱ्यांच्या, सरकारच्या.. हवा. हा मार्ग ट्रॅक वन आणि ट्रॅक टू डिप्लोमसीचाच आहे. पण तो सोपा नाही. आजच्या परिस्थितीत कदाचित केंद्रीय पातळीवर ते घडू शकणार नाही. मग पुढे काय?

हे पुस्तक आपल्याला त्याचे एकच एक वस्तुनिष्ठ उत्तर देत नाही. त्या उत्तराकडे जाण्याचा मार्ग मात्र नक्कीच दाखवते. तो योग्य की टीकास्पद हा पुढचा भाग. त्याबाबत बोलताना एक लक्षात घ्यायला हवे की, तो माजी गुप्तचर प्रमुखांच्या अनुभवांतून, विचारांतून आलेला आहे. त्यावर वरिष्ठ वर्तुळात, अभ्यासकांत साधकबाधक चर्चा सुरू झाली आहेच. पण एक नागरिक म्हणून आपल्यासाठीही हे विचार समजून घेणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही गंभीर वाचनाला पर्याय म्हणून आपल्यासमोर चॅनेली चर्चा आणि व्हॉट्सअप संदेश ठेवण्यात येत असतानाच्या काळात अशा पुस्तकांकडे वळणे अधिकच आवश्यक ठरते.

ravi.amale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 2:07 am

Web Title: the spy chronicles raw isi and the illusion of peace
Next Stories
1 अविस्मरणीय, मध्यमवर्गीय डिकन्स
2 बिल क्लिंटन यांचे नवे रहस्य
3 राष्ट्राच्या अस्मितेतले अंतर्विरोध..
Just Now!
X