नर्मदा खरे

स्टीफन किंग हा हाडाचा भयकथा लेखक. मात्र, त्याला वाचकाला घाबरवायला आवडतं ते नुसतं भुतं किंवा बेढब प्राणी वापरून नाही. किंगला अभिप्रेत असलेली भीती ही अज्ञाताची नसून ज्ञाताचीच आहे, हे दाखविणाऱ्या कादंबरीविषयी…

homemade mango ice cream recipe
Mango Ice-cream: मुलांसाठी घरच्या घरी बनवा आंब्याचे थंडगार आइस्क्रीम! वापरा फक्त ‘हे’ तीन पदार्थ
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
How sugar sakhar and chini get its name
Sugar, साखर वा चिनी या गोड पदार्थाला इतकी नावं कशी पडली? जाणून घ्या रंजक इतिहास…
Holi 2024, Natural Colors, Children, Celebrate, Harmful Chemicals, parents, caring tips, skin, eye, infection,
होळीतील रासायनिक रंगाने डोळे, त्वचेच्या आजाराचा धोका! मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज

टेक्सासमधल्या एका छोट्या गावातला पेट्रोल पंप. काही मित्र शिळोप्याच्या गप्पा मारत बसलेत. गप्पांचे विषय- बऱ्याच आठवड्यांत न आलेले बेरोजगारी भत्ते, गेलेल्या नोकऱ्या, कामावरचे कमी झालेले तास, परदेशांमध्ये गेलेल्या नोकऱ्या आणि ओस पडलेला पेट्रोल पंप. त्यांचे, किंबहुना सगळ्या देशाचेच, सगळे प्रश्न लवकरच सुटणार आहेत. त्यांच्या नकळत मृत्यू त्यांच्याच दिशेने येतो आहे : एका कारमध्ये बसून, भयानक आजाराने पछाडलेल्या एका कुटुंबाच्या रूपात.

गोष्टीचा सांगाडा सोपा आहे –

कॅलिफोर्नियामधील एका प्रयोगशाळेत एक चंचुपात्र चुकून सांडतं, आणि अमेरिकी सरकारच्या संमतीने तयार केलेल्या जैविक शस्त्रावरचं माणसाचं नियंत्रण संपुष्टात येतं. आता हा जीवघेणा विषाणू खोकणाऱ्यांच्या थुंकीतून, हस्तांदोलनांमधून, पैशांच्या देवाणघेवाणीतून… आगीच्या वेगाने देशभरात, आणि मग जगभरात पसरतो. साध्या फ्लूसारख्या लक्षणांनी सुरू होणारा, पण फ्लूपेक्षा किती तरी जास्त संसर्गजन्य आणि प्राणघातक आजार. जेमतेम एक टक्का माणसं जगतात. कुत्री, माकडे, घोडे मरतात, पण गाई, लांडगे, पक्षी जगतात. का? या प्रश्नाचं उत्तर शोधायलाही कोणी उरलेलं नाही. वाचलेले लोक आधी या गुदमरवणाऱ्या भयकथेतून भरकटत राहतात, आणि मग हळूहळू प्रत्येकाला दोन प्रकारची स्वप्नं पडू लागतात. म्हातारी, प्रेमळ मदर अबॅगेल; आणि अविनाशी, भीतीदायक रँडल फ्लॅग. स्वप्नांमधून दोघेही लोकांना आपल्याकडे बोलावतात : म्हातारी नुसत्या प्रेमाच्या आश्वासनाने, तर फ्लॅग कधी आमिषं, तर कधी भीती दाखवून. या दोघांपैकी कोण चांगलं, कोण वाईट याबद्दल कुठलीच शंका नाही; आणि कुणाचं आमंत्रण स्वीकारायचं, हा निर्णय पूर्णपणे प्रत्येकाचा स्वत:चा असतो.

यथावकाश माणसं एकेकटी वा गटागटांनी या दोन केंद्रकांभोवती जमा व्हायला लागतात. रॉकी पर्वताच्या पूर्वेकडे मदर अबॅगेल आणि पश्चिमेकडे फ्लॅग. दोन अतिशय भिन्न समाज तयार होतात. म्हातारीभोवतीची माणसं ‘सगळ्यांच्या मताने’, ‘सगळ्यांच्या भल्यासाठी’, ‘ज्याला जितकं जमेल तितकं’ या विचारांनी सावकाश बस्तान बसवायला लागतात. त्याउलट, फ्लॅगचं वर्तुळ त्याच्या आज्ञेनं, त्याच्या भीतीनं, पण अत्यंत वेगानं शहर साफ करून, वीज, शाळा सुरू करून, आता विमानं, शस्त्रं कशी वापरायची याकडे वळू लागतं. एक स्वस्थ, पापभीरू, पण तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागासलेला; तर दुसरा सुखसोयी असलेला, वरकरणी स्वस्थ, पण आतून भ्यायलेला-गोंधळलेला समाज. त्यांनी निवडलेल्या नेत्यांनुसार, माणसांच्या प्रकृतींनुसार वसलेले हे समाज. यांतला एकच टिकणार. शेवटी एकमेकांना सामोरं जावंच लागणार.

हाच तो ‘स्टॅण्ड’ : तगण्यासाठी, ‘सर्व्हायव्हल’साठी पाय रोवून ठामपणे उभं राहणं.

१९७८ साली स्टीफन (स्टीव्हन) किंगचं ‘द स्टॅण्ड’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं, तेव्हा तो ३१ वर्षांचा होता. त्याच्या तोवरच्या कादंबऱ्यांमुळे ‘भयकथा लेखक’ म्हणून मानल्या गेलेल्या किंगचं हे नवं पुस्तक मात्र ‘भयकथा’ या लेबलाच्या पलीकडे जाणारं होतं.

१९७० चं दशक अमेरिकेसाठी संक्रमणाचं दशक समजलं जातं. व्हिएतनाममध्ये नाक कापलं गेलं होतं. वॉटरगेट, पेंटॅगॉन पेपर्समुळे सरकारवरचा विश्वास उडाला होता. इस्रााएलचं समर्थन केल्यामुळे अमेरिकेचं तेल मध्य आशियाई देशांनी तोडलं होतं. नोकऱ्या परदेशी जात होत्या आणि मंदी-महागाई काळजी करावी अशा वाढल्या होत्या. स्त्रीमुक्ती, गर्भपाताची न्याय्यता, स्त्रीचे याबद्दलचे अधिकार हे प्रश्न सुटले नव्हतेच. आजही नाहीतच. गोष्टीत या सगळ्यांना स्पर्श होतो.

या अवाढव्य पुस्तकामधून काही विलक्षण धागे घावतात.

एक ग्रीक पुराणकथा आहे : दंतकथांनी वेढलेली एक दैवी बैलगाडी एका खांबाला अत्यंत किचकट गाठीनं बांधलेली असते. भविष्यवाणी असते की, जो ही गाठ सोडवेल तो आशियावर राज्य करील. वर्षांमागून वर्षं जातात, आणि आशियाकडे निघालेला सिकंदर गावात येतो. दोरखंडाच्या त्या क्लिष्ट पिळांकडे एक नजर टाकतो आणि तलवार उपसून एका झटक्यात ती ‘गॉर्डियन गाठ’ कापून काढतो.

या धर्तीचे उपाय लोकसंख्यावाढीच्या बाबतीत बऱ्याच लोकप्रिय कथांमधून दिसतात. उदाहरणार्थ, सगळ्या पूरकथांमधून जगात पाप वाढल्याने देव मनुष्यजात जवळजवळ नष्ट करतो. माव्र्हलचा थॅनोस चुटकीसरशी जगातली अर्धी माणसं धुळीला मिळवतो. आपल्या सगळ्या समस्या वाढलेल्या लोकसंख्येमुळे आहेत आणि माणसं कमी झाली तर त्यांचं निराकरण होईल, ही संकल्पना जुनी आहे. चुकलेलं चित्र खोडून पुन्हा नव्यानं काढायची संधी कुणाला नको असते? पण असले उपाय झाले का यशस्वी? समस्या आणि तिच्यावर सोप्पा, बुलडोझर फिरवल्यासारखा उपाय यासंदर्भात गॉर्डियन गाठीचा उल्लेख पुस्तकात पुन:पुन्हा येतो.

कादंबरीतली स्वतंत्र व्यक्तिमत्त्वांची पात्रं, जीवनकथा, परस्परसंबंध या सगळ्यासकट गोष्ट विणताना आलेल्या अडथळ्यांबद्दल लेखक अनेकदा बोलला आहे. त्याच्या अप्रतिम शैलीनं ती सगळी पात्रं जिवंत झाली आहेत. शहाणा टेक्सन स्टु; विचारी, गरोदर फ्रॅनी; अत्यंत हुशार, पण माथेफिरू हॅरोल्ड; बडबड्या समाजशास्त्रज्ञ बेटमन; मूकबधिर व चलाख निक; आणि स्वत:च्या भयानक भविष्याच्या सावलीत तडपणारी नेदीन. ही फक्त झलक.

एक काळजी जाणवते पुस्तकभर. हे नवं चित्र वेगळं असेल ना? समाजशास्त्रज्ञ असलेला बेटमन इतरांचं लक्ष अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे वळवत राहतो. नव्या समाजांना शहरांत राहायचं असेल, तर शहरं स्वच्छ करायला हवीत. मृतांची विल्हेवाट लावायला हवी. कबूल की, अन्न-वस्त्र-निवारा सध्या मुबलक आहेत. त्यासाठी स्पर्धेची गरज नाही. हव्या त्या वस्तू दुकानांमधून उचलून आणणं शक्य आहे. पण कपड्यांप्रमाणेच बंदुकाही उचलून आणणं शक्य आहे. शिवाय आता वीज नाही. हिवाळ्यात शहरातलं विद्युत केंद्र, पाणीपुरवठा सुरू करू शकतील अशा लोकांना आता तुफान मागणी येणार. अ‍ॅपेण्डिक्स काढण्याची शस्त्रक्रिया करू शकणाऱ्यांना डोक्यावर घेतलं जाणार. कारखाने सुरू करता येणारे, यंत्रं वापरता येणारे- त्यांचंही तेच. या नव्या वस्तुस्थितीत तंत्रज्ञान आणि ते वापरता येणारे लोक हे सोन्यापेक्षाही किमती ठरणार. हॅरोल्ड फक्त तरुणांनाच वाटू शकेल अशा उमेदीनं म्हणतो, ‘‘या वेळी जग नक्कीच वेगळ्या दिशेनं जाईल. वेगळे कायदे तयार होतील. गॉर्डियन गाठ कापली गेलीय, पण म्हणून ती परत बांधण्याएवढे लोक मूर्ख नाहीयेत.’’ अनुभवी बेटमनला मात्र नव्या जगाबद्दल आशा नाही. तंत्रज्ञानामुळे सोप्या झालेल्या राहणीला सोकावलेली माणसं कारखान्यांच्या स्राावांमुळे रोगट झालेल्या नद्या, ओझोनला पडलेलं भगदाड आणि अणुबॉम्ब हे सोयीस्करपणे विसरतील, अशी त्याला खात्री आहे. बेलगाम अराजकतेपासून संरक्षण देणाऱ्या समाजाबरोबर त्याचे अनिवार्य धोकेही येणारच. समाजात जगायचे नियम ठरवायला न्यायसंस्था येणार, सत्ताधारी येणार आणि कायदे पाळायला भाग पाडायला शस्त्रधारी पोलीसही येणार. सगळ्या जुन्या चुका आपण परत करणार. फ्रॅनीची काळजी याच धर्तीवर आहे. झगडून मिळवलेलं स्त्रीस्वातंत्र्यही सभ्यतेच्या अस्ताबरोबर लयाला जाणार. अशक्त व्यक्तींना आसरा देऊ शकणारा सुसंस्कृत समाज नष्ट झाल्याची चिन्हं तिला सगळीकडे दिसतात.

या निराश मन:स्थितीचं कारण? कारण सिकंदरानं गाठ कापली तरी कोडं तसंच राहिलं. ते काही सुटलं नाही.

किंग म्हणतो, कठीण परिस्थितीतून मार्ग म्हणून हिंसेचा वापर करणं हा माणसाचा स्थायिभाव आहे. आणि हाच या गोष्टीचा गाभाही.

आणखी एक धागा आहे. एरवी तर्कसंगत विचार करणारी, आकलनीय गोष्टीच मान्य करणारी माणसं या नव्या, अनाकलनीय जगाचा अर्थ कसा लावतात? इथं स्वप्नांमधून बोलावणी, सल्ले येतात. चांगलं-वाईट हे काळ्या-पांढऱ्याइतकं स्पष्ट आहे. अद्भुत घटनांचा स्वीकार करणं या जगात आवश्यक आहे. विचारी माणसांना हे सहजी कसं जमणार? पण तर्कसंगत जीवनाला तडा देणारं तर्कविसंगत, विस्कळीत, अंदाधुंद अराजक कधीच फार दूर नसतं. नीटनेटकी घडी विस्कटायला थोडंसं कारणही पुरतं. एक लवंडलेलं चंचुपात्र सगळ्या तर्कशक्तीवर आधारलेल्या मानवी शहाणपणावर पाणी फिरवतं. याविषयी बेटमन अशी कल्पना मांडतो की, अतक्र्य गोष्टी कदाचित आपल्या आजूबाजूला नेहमीच होत्या. पण सूर्यामुळे डोळे दिपून जसे काजवे दिसेनासे होतात, तसं तर्कसंगत विचारांच्या तीव्रतेने आपल्याला आंधळं केलं होतं. साथीत झालेल्या अपरिमित हानीमुळे तर्काचं तेज मंदावून आपल्याला अतक्र्याची दखल घेणं भाग पडलं. तरीही रोजच्या व्यवहारातला दैवी लुडबुडीचा स्वीकार किती काळ टिकणार?

‘द स्टॅण्ड’ची पहिली आवृत्ती ८०० हून अधिक पानांची होती, आणि आताची आवृत्ती तर १,१०० पानांच्या वर आहे. ‘स्टीफन किंग खूप लिहितो’, थोडं ‘बायबल-थम्पिंग’ही आहे. पण त्याचा आवाका, कसब पाहता त्याला हे माफ आहे. लहान मुलं, विचित्र परिस्थितीत अडकलेली माणसं यांच्या ‘पायताणात तो तुम्हाला नेऊन उभं करतो’. वरच्या मजल्यावर बाप मरून पडला असताना, अनावर भूक लागून फ्रिजमध्ये फक्त स्ट्रॉबेरी चीजकेकच सापडल्यामुळे तोच खात डायनिंग टेबलपाशी बसलेली गरोदर फ्रॅनी. असंख्य मृतांच्या शवांमधून रस्ता काढून दमून पार्कातल्या बाकावर बसून चॉकलेट खाणारा आणि रॅपर टाकायला कचराकुंडी शोधणारा लॅरी. ओसाड पडलेल्या गावात भेटलेला एकुलता एक जिवंत माणूस मतिमंद आहे, हे कळल्यावर- ‘कदाचित कुठलं तरी अपंगत्व असलेलेच लोक जगले असावेत या साथीत,’ अशा निष्कर्षाला पोहोचलेला मूकबधिर निक. वाचक सगळं अनुभवून थरारतो.

हे विसरून चालणार नाही की, किंग हाडाचा भयकथा लेखक आहे. त्याला वाचकाला घाबरवायला आवडतं ते नुसतं भुतं किंवा हिरवा पू ओकत पाठलाग करणारे बेढब प्राणी वापरून नाही. त्याला अभिप्रेत असलेली भीती ही अज्ञाताची नसून ज्ञाताचीच आहे. इतरांच्या प्रतिक्रियांइतकीच स्वत:च्या प्रतिक्रियांची आहे. महासाथीचं चित्र तर आज आपल्याला लागू पडतंच, पण अणुशक्तीचा गलथान वापर, सत्ताधाऱ्यांच्या भीतीपोटी आवरलेल्या जिभा, माहिती दडपण्यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर, सफाईकामं करण्याची पांढरपेशा वर्गाची अनिच्छा, स्त्रीवर वर्चस्व दाखवणारी पुरुषी मानसिकता हे आपल्याच समाजाचे वेगवेगळ्या टप्प्यांवर पोहोचलेले रोग आहेत हे सतत जाणवत राहतं. शिक्षेची भीती न उरल्याने सोकावलेला, आपल्याहून वेगळ्या व्यक्तींवर बळजबरी आणि बलात्कार करणारा एक वर्ग तयार होताना कादंबरीत पाहून ‘आजच्या बातम्या’ वाचत असल्यासारखं वाटून घाम फुटतो. कदाचित यातच या ४२ वर्षांच्या कादंबरीचं यश आहे.

narmada.khare@gmail.com