सुखदेव काळे a2zsukhadeo@gmail.com

जमशेटजी, दोराबजींपासून जेआरडी, रतन टाटांपर्यंत तब्बल पाच पिढय़ांनी कर्तबगारी, सचोटी आणि विश्वासाच्या भक्कम पायावर निर्मिलेल्या उद्योगपर्वाचा वेध घेणारं ‘टाटायन’ हे गिरीश कुबेर यांचं पुस्तक ‘हार्पर कॉलिन्स’नं ‘द टाटाज् : हाऊ  ए फॅमिली बिल्ट ए बिझनेस अ‍ॅण्ड ए नेशन’ या शीर्षकानं इंग्रजीत आणलं आहे.. संपत्तीनिर्मितीतील सात्त्विकता आणि नीतिमत्तेचं प्रतीक ठरलेल्या टाटा समूहाच्या घडणीचा पट मांडणाऱ्या या पुस्तकाविषयी..

माझे बालपण ज्या खेडय़ात गेले, तिथे ‘टाटा’ची टिकाव-फावडी आणि किलरेस्कर पलटी नांगर एवढीच यंत्रसामग्री शेतीत होती. ‘मोठा टाटा-बिर्ला लागून गेलाय’ हे वाक्य हिणवण्यासाठी, तर ‘टाटा’ हे मुलांसाठी ‘गुड बाय’ अर्थाने. आज टाटा स्टील, पाइप, शेतीतील पिकांसाठीची औषधे (‘रॅलीज् इंडिया’ या टाटा समूहाच्या कंपनीची), सिमेंट आणि सुमो माझ्या गावात, तर किलरेस्कर ट्रॅक्टर, किलरेस्कर पाण्याचे पंप विहिरीवर-नदीवर. मात्र त्यांच्या शेतीतील या हातभाराची नोंद घेतली जात नाही. ‘किलरेस्कर’, ‘मनोहर’, ‘स्त्री’ या मासिकांच्या योगदानावर जेवढे लिहिले गेले असेल, तितके किलरेस्कर उद्योग समूहाबद्दल नाही. एकूण भारतीय आणि त्यातल्या त्यात मराठी विचारविश्व साहित्य, कला, इतिहास, राजकारण यांत जेवढे रमते, तेवढे उद्योगधंद्यांत नाही रमत. म्हणून मग ‘परप्रांतीय’ ते काबीज करतात आणि आपण बोंब मारत राहतो. समाजवादी विचारधारेनेही उद्योग, भांडवलदार म्हणजे ‘लुबाडणारे’ अशी भाबडी समजूत करून दिल्याने त्यात भरच पडली. तरीही ‘टाटा’ या नावाचे गारूड खेडय़ांतही आहे. विशेषत: दर्जासंबंधी आणि कर्करोगावरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या परळच्या टाटा स्मारक रुग्णालयामुळे. टाटा कुटुंबातील एक स्त्री कर्करोगाने दगावली. आपण इतके श्रीमंत असूनही उपचार करू शकलो  नाही, मग गरीब काय करतील, या विचाराने टाटांनी ते रुग्णालय स्वत:च्या पशातून सुरू केले, अशी आख्यायिका मी समज आल्यापासून ऐकतोय.

अशा या टाटा समूहाचा जमशेटजी टाटा ते चंद्रशेखरन नटराजन असा दीर्घ पस, त्याचा पसारा, विविधता, चढ-उतार एका पुस्तकात मांडणे तसे अवघडच. मात्र गिरीश कुबेर यांच्या ‘टाटायन’ या पुस्तकात ते साधले आहे. मराठीत लिहिलेल्या ‘टाटायन’चा विक्रांत पांडे यांनी केलेला इंग्रजी अनुवाद ‘द टाटाज्’ या शीर्षकाने हार्पर कॉलिन्सने प्रसिद्ध केला आहे. प्रस्तावनेत लेखकाने ‘टाटायन’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा दाखला- पाच वर्षांत डझनभर पुनर्मुद्रणं- दिलाय, तो पुस्तक वाचताना नैसर्गिक वाटतो. एखादी कादंबरी जशी उत्कंठा वाढवते, खिळवून ठेवते, तशी अनुभूती हे पुस्तक वाचकाला पानोपानी देत राहते. ‘टाटा’ हा उद्योगसमूह फक्त संपत्ती कमावत नाही, तर ती लोकोपयोगी कामांसाठी वापरतो, याची जाणीव हे पुस्तक करून देते. त्याबद्दल पुस्तकातील काही भाग- जसे जमशेदपूर कामगार संप आणि कामगार पुढाऱ्यांपेक्षा टाटांवर कामगारांनी दाखविलेला विश्वास, ‘टेल्को’त नायर यांचे उपोषण, ‘नॅनो’ची निर्मिती, सायरस मिस्त्री प्रकरण.. हे वानगीदाखल सांगता येईल.

‘द टाटाज्’ वाचताना ‘बियॉण्ड द लास्ट ब्लू माऊंटन’ आणि ‘द जॉय ऑफ अचिव्हमेंट’ ही आर. एम. लाला यांची पुस्तके आणि ‘की-नोट’ हे जे. आर. डी. टाटांच्या भाषणांचे पुस्तक आणि त्यातले काही संदर्भ डोक्यात होते. मात्र, ‘द टाटाज्’ या पुस्तकाचा पल्ला जमशेटजी, सर दोराबजी, सर रतनजी यांच्यापासून पुढे रतन टाटा ते चंद्रशेखरन नटराजन असा दीर्घ असल्याने वाचक म्हणून माहितीत अधिक भर पडली. एकूण ‘टाटा’ म्हणजे पणजोबा-आजोबा- बाप-मुलगा- नातू-पणतू असा नातेसंबंधांचा धागा नसून, ती तशी गुंतागुंतच आहे हे वाचकांच्या ध्यानात येते. त्यासाठी वाचकाला दक्षही राहावे लागते. कर्तबगारी आणि वकूब हेच टाटा समूहाच्या संचालकपदासाठीचे निकष राहिले आहेत. त्यामुळे नवरोजी सकलातवाला, सायरस मिस्त्री, चंद्रशेखरन नटराजन अशीही बिगर टाटा नावे समूह-संचालकपदी दिसली. हे टाटा समूहाचे वैशिष्टय़ भारतात तरी इतर उद्योगांत आढळून येत नाही. सिंघानिया, किलरेस्कर, वाडिया, अगदी बजाज, अंबानी या उद्योग घराण्यांत कुरबुरी, वाद झाले, प्रसंगी ते माध्यमांतून गाजले; मात्र टाटा कुटुंबात तरी अद्याप तसे काही झाले नाही. त्यामुळेच ‘टाटा’ हे ‘उद्योग घराणे’ म्हणून नाही, तर ‘उद्योग समूह’ म्हणून ओळखले जातात.

जमशेटजी म्हणजे एम्प्रेस मिल, ताज हॉटेल आणि स्टील कारखाना काढण्याचा ध्यास. पण ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ या संस्थेची कल्पनाही त्यांचीच. त्यासाठी ब्रिटिश सरकारचे उंबरठे झिजवणे, प्रसंगी दागिने, मुंबईतल्या एक-दोन नव्हे तर २७ इमारती विकून पसा उभा करणे आणि जिवंतपणी स्वप्न साकार झाले नाही तरी पुढच्या पिढीतील दोराबजी टाटा यांनी जिद्दीने धसास लावून संस्था उभी करणे, वाढवणे हे फक्त ‘टाटा’च करू जाणे! आज हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या भारतीय शिक्षण संस्था जगमान्य असून, त्यांपैकी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स ही एक संस्था आहे. हा टाटांच्या दूरदृष्टीचा एक नमुना. संस्था फक्त उभ्याच करायच्या नाही, तर सातत्यपूर्ण दर्जा वाढवीत त्या विकसित करायच्या हे टाटा समूहाच्या सगळ्याच उद्योगांत, संस्थांत दिसून येते. याचे अतिशय खुलासेवार वर्णन लेखकाने पुस्तकात इतर उद्योगांची तुलना करत केले आहे.

जे.आर.डी. टाटा आणि रतन टाटा यांची व्यक्तिमत्त्वे यात अधिक उजागर झाली आहेत आणि ते साहजिकच आहे. कारण या पिढीने त्यांचे कर्तृत्व पाहिले आहे. जेआरडींनी टाटा समूह हा उद्योग संघटन म्हणून उभे केले, तर रतन टाटांनी त्यास जगभर वाढवले. विशेषत: जगप्रसिद्ध लॅण्ड रोव्हर, जॅग्वार, कोरस स्टील कंपन्या अधिग्रहित करून आणि टीसीएस उभी करून- जिच्यात आज सव्वादोन लाख कर्मचारी काम करतात.

जेआरडींची पत्नी अकाली गेली. पुनर्विवाह करण्याचे, दत्तक मूल घेण्याचे दिले गेलेले सल्ले त्यांनी नम्रपणे नाकारले. तर रतन टाटा अविवाहित. वंशाला दिवा असावा म्हणून नाना खटपटी करणारे आणि त्याला आपल्या क्षेत्रात उभे करण्यासाठी वाट्टेल ते करणारे आपले भारतीय मानस. परंतु इथे तर प्रचंड साम्राज्य, अफाट संपत्ती असतानाही तसा विचार, प्रयत्न पुसटसाही केला गेला नाही. टाटा इथे अतिशय उंची गाठतात, वेगळे वाटायला लागतात. पुस्तकभर हे अतिशय सजगपणे लक्षात येत राहते, हे आणखी एक वैशिष्टय़.

जेआरडी एकदा कार्यालयात काम करत बसले होते. स्वीय साहाय्यकाने विचारले, ‘घरी जायचे नाही का?’ तर म्हणाले, ‘काय करू घरी जाऊन?’ या उत्तराने गलबलायला होते. आजारी पत्नी, विधवा आजारी बहीण, उमेदीच्या काळात दोन भावांचा अपघाती मृत्यू, त्यातला एक भाऊ मानसिक विकलांग अशी अवस्था, तर दुसरीकडे अनेक जबाबदाऱ्या. एअर इंडिया टाटांची. तिचे राष्ट्रीयीकरण झाले, तरी त्यावर अध्यक्ष म्हणून जबाबदारी जेआरडींकडेच. त्यात बाबू लोकांचा हस्तक्षेप. तरी ते चिवटपणे ते काम करत राहिले. रघुराम राजन ते विरल आचार्य यांचे नोकरशाहीला वैतागून सोडून जाण्याच्या परिप्रेक्ष्यात जेआरडी टाटांचा एअर इंडिया बाबतीतचा चिवटपणा उठून दिसतो. मात्र एअर इंडियाच्या अध्यक्षपदावरून कोणतीही कल्पना न देता त्यांना दूर करून त्यांच्याच एका कंपनीतील संचालकांची नेमणूक तिथे केली गेली. त्यावर मीठ चोळल्यासारखे मोरारजी देसाई यांचे पत्र आले. ही जेआरडींना मिळालेली अवहेलनात्मक वागणूक अस्वस्थ करते. आजच्या एअर इंडियाची अवस्था ५५ हजार कोटी कर्ज, क्षुल्लक कारणावरून धक्काबुक्की करणारे वैमानिक, पाकीट चोरीवरून निलंबित वैमानिक ही दुरवस्था कुठे आणि जेआरडींच्या काळात जगातील तिसऱ्या क्रमांकाची एअर इंडिया कुठे! एअर इंडिया टाटांकडे असती तर.. असा विचार सतत येत राहतो.

टाटा समूहामध्ये बिचकत बिचकत छोटय़ा कंपन्यांची जबाबदारी पार पाडत, काहीसे पडद्यामागे राहणारे रतन टाटा संधी मिळताच जी झेप घेतात आणि एकामागून एक साम्राज्ये पादाक्रांत करावीत तसा टाटा समूह वाढवतात, हे वाचताना एखाद्या राजकुमाराची गोष्ट वाचतोय की काय, असा भास होतो. इंडिका आणि नॅनोची निर्मिती, त्यात सिंगुर ते साणंद असा प्रकल्प प्रवास आणि वाढलेला खर्च, तसेच जागतिक मंदी असूनही नॅनोचे मुंबईत विमोचन करतेवेळच्या रतन टाटा यांच्या भाषणातील ‘प्रॉमिस इज प्रॉमिस’ हे वाक्य उदात्त भावनेची अनुभूती देऊन जाते.

टाटा फायनान्स लिमिटेड- टीएफएल कंपनीत पेंडसे यांनी केलेला घोटाळा आणि त्याला टाटा समूह ज्या पद्धतीने सामोरा गेला, या एका उदाहरणावरूनही टाटा समूहाची मूल्यधारणा किती उंचीची आहे, हे समजून येईल. ठेवीदारांचे पैसे-व्याज बुडणे, फसवणूक याची भारतभर असंख्य प्रकरणे आहेत. तसे काहीसे टीएफएल कंपनीत झाल्याचे आढळून आल्यावर अध्यक्ष या नात्याने रतन टाटा सतर्क होऊन चौकशी, त्यात आढळून आलेली अनियमितता याचा लेखाजोखा घेतात. जवळपास ९५२ कोटी रुपये इतर कंपन्यांतून उभे करतात. ठेवीदारांची देणी चुकती करून मग टीएफएल इतर कंपनीत विसर्जित करतात. सक्तवसुली संचालनालय पेंडसे यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करते, तेव्हा सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करून पेंडसे यांना तुरुंगवासाची शिक्षा होते. कळीचा मुद्दा असा की, कायद्याच्या चौकटीत टाटा समूहाची तसेच रतन टाटा यांची जबाबदारी नसताना ‘टीएफएल’ नावात ‘टाटा’ आहे म्हणून रतन टाटा ते प्रकरण मार्गी लावतात. तसेच सायरस मिस्त्री यांच्या बाबतीतही. टाटा समूहाशी प्रतारणा होतेय हे समजताच टीकेला सामोरे जाऊन मिस्त्री यांना हटवून, त्यासाठी प्रसंगी मुत्सद्देगिरीचा वापर करून पुन्हा सूत्रे हाती घेतात आणि नंतर चंद्रशेखरन नटराजन यांची नियुक्ती होते.

टाटा समूह म्हणजे निव्वळ टाटा नव्हे, तर त्यात नानी पालखीवाला,रुसी मोदी, सुमंत मुळगावकर (ज्यांची स्मृती म्हणून ‘सुमो’ हे वाहन आले), टाटा केमिकल्सचे दरबारी शेठ, अर्थमंत्रिपद सोडून टाटाचे संचालक म्हणून काम करण्यास प्राधान्य देणारे जॉन मथाई, अजित केरकर असे एकसे बढकर एक कर्तबगार लोक शोधून जोडलेले, हुन्नर, क्षमता पाहून संधी दिलेले, प्रसंगी चुका पोटात घातलेले आणि समूहाशी प्रतारणा होतेय असे दिसताच दूर केलेलेही. असे कित्येक, प्रत्येकावर एकेक ग्रंथ होईल असे. लेखकाने या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक वाचल्यावर टाटांविषयी इतर वाचायची उत्सुकता वाचकाला नक्की वाटेल.

अनुवादक तुलनात्मकदृष्टय़ा नवखे दिसतात आणि गिरीश कुबेर यांची पल्लेदार मराठी वाक्ये, उपरोध इंग्रजीत अनुवाद करताना त्यांची काहीशी तारांबळही उडालेली आहे हे इंग्रजी वाचणाऱ्या वाचकाच्या लक्षात येते. मोठय़ा भावासाठी ‘एल्डर’ऐवजी ‘ओल्डर’ असे काही अपवादात्मक दोष वगळले, तर एकूण पुस्तक घटना, व्यक्ती यांच्या उल्लेखांनी ओतप्रोत भरलेले असल्याने वाचकाला खिळवून ठेवते. इतर घटनांचे जसे दस्तावेजीकरण होते तसे उद्योगक्षेत्राचेदेखील व्हायला हवे. त्या अंगानेसुद्धा ‘द टाटाज्’ हे पुस्तक महत्त्वाचे ठरते.

‘द टाटाज्’

लेखक : गिरीश कुबेर

अनुवादक : विक्रांत पांडे

प्रकाशक : हार्पर कॉलिन्स

पृष्ठे: २६०, किंमत : ६९९ रुपये