१८१५ मध्ये ब्रिटिशांनी उत्तराखंडमधील कुमाऊँ भाग आपल्या साम्राज्यात जोडून घेतला. भारतातील इतर प्रदेशांप्रमाणेच धार्मिक-सामाजिक रूढी-परंपरांशी घट्ट बांधला गेलेला हा प्रदेश.. ब्रिटिशांशी आलेल्या संपर्कातून येथे आधुनिक मूल्यांशी ओळख होऊ लागलेली आणि त्यातूनच परंपरा की आधुनिकता असे द्वंद्वही उभे राहिलेले. वसाहतकालीन भारतातील या द्वंद्वाचे चित्रण करणारी ही कादंबरी.. मिथकं आणि वास्तव जग यांची सरमिसळ असलेल्या प्रवाही कथानकातून परंपरा, स्वातंत्र्य, प्रेम यांचा अर्थ शोधू पाहणाऱ्या या कादंबरीविषयी..

नमिता गोखलेंची ‘थिंग्ज टू लीव्ह बिहाइंड’ ही कादंबरी १८४० ते १९१२ या सात दशकांतील ऐतिहासिक घटना काल्पनिक व वास्तव या दोन्हींची सरमिसळ करीत सांगत राहते. नैनिताल येथील निसर्गरम्य ठिकाणी राहणाऱ्या धार्मिक  रूढी-परंपरांच्या जोखडात अडकलेल्या दोन ब्राह्मण कुटुंबांची ही कहाणी आहे. राजे व राजवाडे यांचा होत जाणारा अस्त, ब्रिटिशांचे वाढते वर्चस्व, सामान्य माणसाची या साऱ्या बदलाला सामोरे जाताना होणारी संमिश्र प्रतिक्रिया या कादंबरीत अधोरेखित केली आहे. या कादंबरीतील तिलोत्तमाची बंडखोरी, देवकीचे धाडस वाचकांच्या मनाचा कब्जा घेते. नमिता गोखलेंची आजतागायत १३ पुस्तके प्रकाशित झाली असून ‘हिमालयन लव्ह स्टोरी’ व ‘दि बुक ऑफ शॉडोज’ ही पुस्तकं विशेषत्वानं उल्लेखनीय ठरली आहेत. जयपूर व भूतान लिटरेचर फेस्टिव्हलच्या त्या संस्थापक सहसंचालक आहेत.

प्रसिद्ध लेखक प्रज्वल परांजुली यांनी या पुस्तकाविषयी म्हटले आहे- ‘‘अतिशय दुर्मीळ अशा या पुस्तकाच्या मी प्रेमात पडलो. बिचारा जयेश, नाजूक देवकी यांच्याबद्दल मला खूप काही वाटलेच, पण विचित्र, तापट, काळाच्या खूप आधी जन्माला आलेल्या तिलोत्तमापुढे मी नतमस्तक झालो. इतर सर्व अप्रतिम व्यक्तिचित्रणांमध्ये हे अपवादात्मक क्षमता व गुणवत्ता असलेलं व्यक्तिचित्रण आहे.’’ नमिता गोखलेंचे आजोबा बद्रिदत्त पांडे यांनी ‘कुमानका इतिहास’ हे पुस्तक १९३२  मध्ये लिहिले होते. ही कादंबरी लिहायला या पुस्तकातून प्रेरणा मिळाल्याचे लेखिका सांगते.

कादंबरीत सन १८४० च्या दरम्यानचा-  म्हणजे पावणेदोनशे वर्षांपूर्वीचा- काळाचे चित्रण आले आहे.  त्या काळातील कुटुंबपद्धती, विवाहसंस्था, धार्मिक विधी, अंधश्रद्धा, चालीरीती यांचे बारकावे तपशिलासह यात येतात. नैनितालचा निसर्ग, कुमाऊँ प्रदेश, नैना नदी, हिरवीकंच निसर्गसृष्टी, टेकडय़ा, त्यावरील ढग, त्याच्या छटा यांचे चित्रमय वर्णन कादंबरीत आले आहे. लेखिका म्हणते, ‘क्षितिजावर इंद्रधनुष्य फुलपाखरासारखे विसावले व निघून गेले.’

नैनितालमधील बुरा बाजारमध्ये देवीदत्त पंत हा सरकारी वकील एकमजली घर बांधून त्याची पत्नी सरूली, विधवा बहीण दुर्गा व तिची सहा वर्षांची मुलगी तिलोत्तमा यांच्यासह राहत असतो. अल्पावधीतच त्याची वकिली व्यवसायात भरभराट होते व तो तीनमजली घर बांधतो. दुर्गा ही अबोल व स्वमग्न बहीण रावण, शिव-पार्वती अशी देवदेवतांची चित्रे काढत असते. अचानक एके सकाळी तिचे प्रेत नैनी तलावात पाण्यावर तरंगताना आढळते. या आधीही केंडाल नावाची ब्रिटिश स्त्री पाय घसरून तलावात मृत्यू पावली होती; देवीने बळी घेतला असं गावातले लोक म्हणायचे.

नैनितालमध्ये ब्रिटिशांच्या छावण्या होत्या. रॅमसे नावाचा ब्रिटिश अधिकारी तिथे राहत होता. त्याला रामजी म्हणत. नानासाहेब पेशवेंची राजवट होती. ब्रिटिश व राजे यांच्यामधील संघर्ष टोकाला पोहोचला होता. बेगम हुसेनी खातून या नानासाहेबांच्या पत्नीनं युरोपीयन मुले व स्त्रियांना कैदेत ठेवून त्यांची कत्तल केली होती. याचा बदला म्हणून मॅक्सवेल या ब्रिटिश अधिकाऱ्याने नैनितालमधील अनेक क्रांतिकारकांना टेकडीवर नेऊन एका रांगेत उभे करून गोळ्या घालून मारले होते, ज्याला रामजी व पेशव्यांचा विरोध होता. पेशव्यांच्या बायका तर उपोषणालाही बसल्या होत्या. तिलोत्तमाचा काका बद्रिदत्त या क्रांतिकारकालाही फाशी देण्यात आले होते. त्याचवेळी मेरीजेन या ब्रिटिश स्त्रीचा नवरा व तीन मुले यांनाही मारण्यात येते. दु:खी मेरीजेनला बोडेन भेटतो व त्याच्याबरोबर ती इडन आश्रमात येते. रोझमेरी व क्लोरिया या दोन मुली आश्रमात मोठय़ा होतात. तिलोत्तमाचा काका तिला शेवटचे भेटतो तेव्हा म्हणतो, ‘‘घाबरू नकोस, तुला जे करायचे ते कर. तुला काय आवडते ते करू नको, तर तुला काय हवं आहे ते कर.’’ कादंबरीभर तिला हवं ते करणारी काहीशी विचित्र, हास्यास्पद, पण तरीही कौतुकास पात्र तिल्ली वाचकांना भेटत राहते.

तिलोत्तमाला मंगळ असल्यानं ज्योतिषाच्या सांगण्यावरून तिचे लग्न १९ व्या वर्षी अलमोरा येथे राहणाऱ्या व सरकारी नोकरीत असणाऱ्या नैनचंद जोशीबरोबर होते. तिल्ली अलमोराला येते व तिला साऱ्या बंधनांतून मुक्त झाल्यासारखे वाटते. चूल पेटविता येत नसल्यानं ती स्वयंपाक करीत नाही. अनेक दिवस आंघोळीशिवाय राहते. शेवटी घरात स्वयंपाकाला एक आजी ठेवण्यात येते. नैनचंदची फिरतीची नोकरी असल्यानं तो बराचसा बाहेरच असे. त्याच्या अनुपस्थितीत तिल्ली त्याचे कपडे, हॅट घालून त्याचा चिरूट ओढत असे. मनोरमा ही नैनचंदची पुतणी आजी वारल्याचे सांगायला येते व पाठमोऱ्या फिरंगी पोशाखातल्या पुरुषाला (तिल्लीला) पाहून पळून जाते व तिल्लीचे फिरंग्यांशी संबंध असल्याचे साऱ्यांना सांगते. परंतु यावर नैनचंद विश्वास ठेवत नाही. नैनचंदचे डेहराडून येथील एका नेपाळी स्त्रीबरोबर संबंध होते. फिरतीमुळे तो आठ-आठ महिने बाहेर राही. तिल्लीच्या विचित्र स्वभावामुळे त्याला घरी येण्यास स्वारस्य नव्हते व तिल्लीलाही नैनचंदचे बाहेर राहणेच जास्त आवडे. तिलोत्तमाला मुलगी होते. मुलीची- देवकी- देखभालही म्हातारी आजी करत असते. शेवटी देवकीची काकी तिला घेऊन जाते.

सकाळी उठून प्रार्थना म्हणणे, दुपारी टेकडीवर जाणे, संध्याकाळी हिंदी-इंग्रजी मासिके व पुस्तके वाचणे असा तिल्लीचा दिनक्रम होता. ती टिपणेही काढायची. जगभर काय चाललेय हे जाणून घ्यायची. पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तिच्यावर प्रभाव होता. विवेकानंदांचे भाषण ऐकायला तिल्ली जाते व त्यांना सिगारेट ओढणे व तंबाखू खाणे या सवयींसह तुम्ही मला तुमची शिष्या करून घ्याल का, असा प्रश्न सभागृहात विचारून  उपस्थित सर्वाना धक्का देते. काकी देवकीचे लग्न ठरविते. देवकीने शिकले पाहिजे म्हणत तिल्ली या गोष्टीला विरोध करते, पण नैनचंदच्या आरडय़ाओरडय़ापुढे नमते घेते.

अलमोरा येथे राहणाऱ्या आणखी एका कर्मठ, धार्मिक ब्राह्मण कुटुंबाचा परिचय कादंबरीतून होतो. या कुटुंबातील जीवनचंद्र पंत काठमांडू येथे नेपाळी राजाच्या दरबारी वैद्य होता. डाळिंब्याच्या दाण्यांपासून बनवलेले प्रभावी औषध त्याने शोधले होते; पण राजाची मर्जी खप्पा झाल्यानंतर त्याची नोकरी जाते व तो अलमोराला परत येतो. त्याची पत्नी कौमुदी एकटीच राहत असते. आपल्याला मूलबाळ नसूनही पतीनं दुसरं लग्न केलं नाही यासाठी ती उपकृतच असते. मुंबईत शिकायला गेलेला व वाईट संगत लागून बिघडलेल्या जीवनचंद्रचा पुतण्या जयेश हाही अलमोराला येतो. पुढे काका व पुतण्या मिळून अनारदाना चूर्ण बनवितात, जे खूप प्रसिद्ध होते. कौमुदी जयेशचे लग्न तिल्लीच्या मुलीशी- देवकीशी- ठरविते. इडन आश्रमात मेरीजेन बोडेन मरताना आपली मुलगी रोझमेरी हिला आपला भूतकाळ सांगते. जयेशला रोझमेरी रडत असताना बागेत भेटते. तो तिचे सांत्वन करतो व तिच्या प्रेमात पडतो. रोझमेरीवर प्रेम आहे, पण ती अप्राप्य आहे. देवकीवर प्रेम नाही, पण ती बायको आहे. जयेश गोंधळलेला आहे.

त्यातच त्याला काका- जीवनचंद्रने लपवून ठेवलेली, वर्षभरापूर्वी मुंबईहून आलेली पत्रं मिळतात. ती वाचून तो मुंबईला येतो. मेरी नावाच्या स्त्रीच्या अतिशय सामान्य हॉटेलमध्ये राहतो, मटण खातो, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवतो. पण त्यानंतर या कृत्याचा पश्चात्ताप होऊन तो  अलमोराला परत येतो व सत्य सांगून टाकतो. क्रोधिष्ट काका त्याला घरातून हाकलून देतो व जयेश मेल्याचे जाहीर करत सुतक पाळतो. जयेश मेरीजेनची मुलगी रोजमेरीकडे येतो. तो ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करतो.

हे सर्व घडत असतानाच, जयेश जेव्हा मुंबईला जातो तेव्हा त्याची पत्नी- देवकी तिची आई- तिल्लीकडे येते; पण ती देवकीला ठेवून घेत नाही. तिल्ली स्वत: देवकीला इडन आश्रमात नेते व जयेशच्या स्वाधीन करते. जयेशचे जोन्स व देवकीचे डायना असे नामकरण होते. डायनाचा सारे जण निमूटपणे स्वीकार करतात.

डेमस्टर नावाचा अमेरिकन चित्रकार ग्लोरियाची ओळख सांगत आश्रमात येतो. देवकीला घेऊन कूमाऊँच्या टेकडय़ांमधून फिरतो. तिचे नग्न चित्र रेखाटतो. निसर्ग व प्रेमाच्या त्या अनोख्या रूपाला देवकी धीटपणाने सामोरी जाते. डेमस्टरबरोबर शरीरसंबंध ठेवतानाही तिला नीतिमत्तेची कोणतीही चौकट आडवी येत नाही. डेमस्टर अमेरिकेला परत जातो. देवकी सारा व तारा या जुळ्या मुलींना जन्म देते. जयेश, रोजमेरी, तिलोत्तमा सारेच या मुलींच्या प्रेमात पडतात. दोघींनाही मिशनरी शाळेत शिकायला पाठविण्यात येते. तिलोत्तमा मुलींना भेटायला शाळेत जात असते. तिलोत्तमा बनारसला जाऊन स्वत:ला शुद्ध करू घेते. रोजमेरी जयेशवरील प्रेमाला मनातच बंदिस्त करून टाकते. डायना (देवकी) व तिचे सख्य खूपच वाढते. महारोग्यांची सेवा व शाळेतील मुलांना शिकवणे या कामांत दोघीही झोकून देतात. जयेश बिचारा वैद्यकीय पुस्तके वाचण्यात वेळ व्यतीत करीत असतो.

तिल्लोत्तमा नैनितालच्या नैनदेवीच्या मंदिरासमोर असलेल्या निमुळत्या खडकावर बसली आहे. क्षणभरच तिला भूतकाळ न संपणारा वाटतो. ती विचार करते, आईला या तळ्यात कोणी बुडविले असेल? तिच्या रागाने की तिच्या सुंदर चित्रांनी? बुडणारी आई तिल्लीच्या डोळ्यासमोर येते.. ती मागे का वळली नाही? किनाऱ्याला यायला का धडपडली नाही? तिला जगावेसे का वाटले नाही? या प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकलेली तिल्लोत्तमा ‘भूतकाळ मागे ठेव, भविष्याकडे बघ. मागे बघू नको, मागे काय राहिले आहे त्याकडे परतू नको, पुढे पाहा. अजून करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत,’असे स्वमनाला खडसावून सांगते.  इकडे देवकी तळ्याच्या काठी खडकाला टेकून उभी आहे. टक लावून समोर पाहतेय. मन व डोळे तिच्या चित्रांचा प्रत्येक इंच वेढून आहेत. भूतकाळाशी ती जखडली गेलीय. तिचे सुकाणू वर्तमानकाळात घट्ट रोवले गेलेय अन् भविष्यकाळ म्हणजे तिच्यासाठी एक सुंदर देणगी आहे. आणि इथेच ‘थिंग्ज टू लीव्ह बिहाइंड’ या कादंबरीच्या शीर्षकाचा मथितार्थ सांगत कादंबरीचा शेवट होतो.

नमिता गोखलेंनी नैनितालसारखा निसर्गानं वेढलेला, पण काहीसा दूरस्थ, दुस्तर प्रदेश आपल्या कादंबरीसाठी निवडला असला तरी देशविदेशाशी कथानकाला जोडून घेतले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटनांचा ऊहापोह वास्तव व काल्पनिक घटनांची सुंदर गुंफण करीत केला आहे. कादंबरीच्या सुरुवातीपासून दंतकथा, स्थानिक संस्कृती, तेथील बोलीभाषा, लोकगीते यांचे एकत्रित चित्रण आढळते.

पवित्र अशा नैनी तलावावर पारतंत्र्याची सावली पडली आहे. १९ व्या शतकातील भारतीय लोक जातिव्यवस्थेमध्ये इतके जखडून गेले आहेत, की या व्यवस्थेच्या विरोधात काही केले तर पाप केल्याची अपराधी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. मेरीबरोबर संग केला याची जयेशच्या मनातील अपराधी भावना, तिल्लीचे शुद्धीकरणासाठी बनारसला जाणे आदी उदाहरणांमधून ते दिसून येईल. तिल्ली बिनधास्त आहे, तिचा निर्धार प्रखर आहे, स्वभावात आनंदी, खिलाडूवृत्ती आहे; पण तीही समाजातील नियमांच्या चौकटीत बांधली जाते. व्यक्ती म्हणून व्यक्तीच्या इच्छा व गरजांचा विचार केला जात नाही हे सर्वच व्यक्तिचित्रणांतून वारंवार अधोरेखित होते. शारीरिक आकर्षणाला सामाजिक नियमांमध्ये कधीच मान्यता नसते. त्यामुळेच नयनचंद्र, जयेश अनैतिक संबंध चोरून ठेवतात. रोझमेरीचे जयेशवर प्रेम असते,  त्याच्याबद्दल आकर्षण वाटत असते, परंतु  धर्म व नीतीच्या बंधनातून तिची सुटका होत नाही. याउलट देवकी अमेरिकन चित्रकाराशी शरीरसंग करतेच; पण शारीरिक संबंध नवऱ्याला ताब्यात ठेवण्यासाठी शस्त्र म्हणून वापरते. नैनितालच्या परिसरातील या सर्वच पहाडी स्त्रिया शरीर व मनाने कणखर आहेत, धीट आहेत, बंडखोर आहेत. पहाडी स्त्रिया व त्यांनी केलेल्या स्थानिक शब्दांचा विपुल वापर ओघवत्या कथनात चपखल बसला आहे. कुमाऊँचे सृष्टिसौंदर्य भुरळ पाडणारे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ रेखाटलेल्या या कादंबरीतील सर्वच पात्रे, विशेषत: स्त्रिया स्वातंत्र्यासाठी, बदलासाठी धडपडताना दिसताहेत.

स्थळकाळाच्या पलीकडे जाऊन निसर्ग व व्यक्ती यांना एकत्र बांधून वैश्विकतेच्या दिशेने साऱ्या पात्रांना घेऊन जाणारी ही कादंबरी वाचकांना नक्कीच भुरळ पाडेल यात शंका नाही.

(लेखिका नमिता गोखले यांच्या ‘हिमालयन ट्रायोलॉजी’मधील ही अखेरची कादंबरी. याआधी त्यांच्या ‘अ हिमालयन लव्ह स्टोरी’ (१९९६) व ‘बुक ऑफ श्ॉडोज’ (१९९९) या दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत.)

  • ‘थिंग्ज टू लीव्ह बिहाइंड’
  • लेखिका : नमिता गोखले
  • प्रकाशक : पेंग्विन रॅण्डम हाऊस, इंडिया
  • पृष्ठे : ३०५, किंमत : ४९९ रुपये

 

वृषाली मगदूम

vamagdum@gmail.com