‘अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या पुतणीचं पुस्तक’ हे समजा क्लिंटन वा ओबामाकाळात आलं असतं, तर ते निव्वळ कौटुंबिक कथा सांगणारं म्हणून सोडून देता आलं असतं. आज या पदावर डोनाल्ड ट्रम्प आहेत, त्यामुळे मेरी ट्रम्प यांचं पुस्तक प्रकाशनाआधीच गाजतंय. पुतणीसुद्धा काकाच्या विरुद्धच आहे आणि या आगामी पुस्तकाचं नाव ‘टू मच अ‍ॅण्ड नेव्हर इनफ’ असं असलं तरी उपशीर्षक ‘हाउ माय फॅमिली क्रिएटेड द वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस मॅन’ असं आहे. पण गाजण्याचं कारण म्हणजे, हेही पुस्तक प्रकाशित होऊच नये यासाठी ट्रम्प यांचे आटोकाट प्रयत्न सुरू होते. कोर्टबाजीही करून पाहिली, ट्रम्प यांच्या यंत्रणेनं. मात्र न्यू यॉर्क शहरातल्या स्थानिक न्यायालयानं, ‘हे प्रकरण आमच्या अखत्यारीत येत नाही. वाटल्यास उच्च न्यायालयाकडे जा’ असं नुसतं सांगून याचिका न फेटाळता, ‘लोकशाहीचा आदर राखत असाल तर अभिव्यक्तीस्वातंत्र्याला वाट द्या आणि पुस्तक प्रकाशित होऊ द्या’ हेही सुनावलं. मग ट्रम्प-यंत्रणेनं आणखी एक मुद्दा काढला. म्हणे, ट्रम्प कुटुंबात संपत्तीची वाटणी झाली तेव्हाच, आपण गृहकलहाविषयी अवाक्षरही बाहेर बोलणार (/लिहिणार) नाही, अशा करारावर मेरी यांची स्वाक्षरी १९९१ पासूनच आहे. पण हा अख्खा करारनामाच बोगस असल्याचा गौप्यस्फोट ‘न्यू यॉर्क टाइम्स’नं केला. करार कसा खोटा आहे, याचे आणखी तपशील मेरी यांनी वरच्या न्यायालयाला दिले आहेत. शिवाय, ‘गृहकलह वेशीवर टांगणे हा आपला हेतू नसून, सार्वजनिक जीवनातील सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्तीबद्दल लोकांना जागरुक करणे हे राष्ट्रहितासाठी आवश्यकच ठरते. हाच माझ्या पुस्तकाचा हेतू आहे’ असं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. हे म्हणणं उच्च न्यायालयानं मान्य केल्यास ट्रम्प यांची नाचक्कीच होईल, असं मानलं जातं. तेव्हा आता, प्रकाशकांनी आधी घोषित केल्याप्रमाणे २६ जुलै या तारखेला हे पुस्तक प्रकाशित होणारच, हे नक्की! ट्रम्प यांच्याकडून  याआधी रोखण्याचा प्रयत्न झालेल्या जॉन बोल्टन यांच्या पुस्तकाप्रमाणेच, याही पुस्तकाचे प्रकाशक  ‘सायमन अ‍ॅण्ड शूस्टर’ हेच आहेत, हे विशेष.