वर्ष संपत आलं की, पुस्तक प्रकाशन आणि विक्रीच्या क्षेत्राला याद्यांचे वेध लागतात. वाचकसुद्धा यादीवर नजर टाकून, वाचलेल्या पुस्तकांबद्दल यादीकारांनी काय म्हटलंय आणि आपण न वाचलेल्या पुस्तकांचं महत्त्व यादीकारांना का बुवा पटलंय, याचा पडताळा करून पाहात असतात; पण अ‍ॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या (मुळात पुस्तक विक्रीपासूनच सुरुवात केलेल्या) महाजालीय विक्रीस्थळांवर आजकाल ‘टॉप टेन’ पुस्तकांच्या याद्या असतात आणि त्या दर आठवडय़ालाच काय, दिवसालासुद्धा बदलू शकतात. या याद्या कुणाला वाचनीय वाटण्याचा संभव किती हे माहीत नाही, पण इंटरनेटवर खरेदी करताना त्या कुठून ना कुठून आदळतात किंवा तुमच्याकडे ई-मेलनंही उगाच धाडल्या जातात. अशा वेळी वर्षांन्ताच्या पुस्तक याद्यांची काय मातबरी उरणार? पण नाही. वर्षअखेरीला याद्यांची प्रथा सुरू आहेच आणि उलट ती उसळी घेतल्यासारखी वाढते आहे- फक्त संख्येनं नव्हे, अगदी गुणांनीसुद्धा समृद्ध होते आहे!

असं का? याचं उत्तर आपल्या काळातला एक भारी इटालियन लेखक उम्बतरे ईको यांनी २००९ मध्येच देऊन ठेवलं होतं. ते म्हणतात: यादी ही संस्कृतीची सुरुवात आहे..
उम्बतरे ईको यांनी यादी या विषयावर चिंतन करणारं, मूळ इटालियन भाषेत लिहिलेलं एक पुस्तकच आहे. ‘द इन्फिनिटी ऑफ लिस्ट्स’ या नावानं २००९ साली ते प्रकाशित झालं होतं. त्यापैकी काही भागाचा मराठी स्वैरानुवाद असा:
‘‘यादी ही संस्कृतीची सुरुवात आहे. कला आणि साहित्य यांच्या इतिहासाचा अविभाज्य भाग म्हणजे यादी. संस्कृतीचा उद्देश काय असतो? संस्कृतीला काय हवे असते? अनंततेला आकलनात आणणे हे संस्कृतीचे उद्दिष्ट असते. संस्कृतीला अगदी शिस्त नव्हे, पण रीतभात हवी असते. मानवप्राणी म्हणून आपण अनंततेला कसे सामोरे जात असतो? जे आकलनाच्या पलीकडले आहे, ते आपण कसे समजून घेत असतो? याद्या.. किंवा माहितीपुस्तिका, कॅटलॉग, संग्रहालयांतून संग्रहित केल्या जाणाऱ्या पुराणवस्तू किंवा कलावस्तू, ज्ञानकोश, शब्दकोश.. हे याद्यांचेच विस्तारलेले प्रकारच आपली समज वाढवीत नसतात काय? याद्याही अमूर्त असू शकतात.. उदाहरणार्थ डॉन गिव्होनानीच्या २०६३ बायका होत्या असा उल्लेख मोझार्टच्या एका ऑपेरात आपल्याला सापडतो; तेव्हा काही आपण त्यांची नावे विचारत नाही. पण अनेक याद्या अगदी व्यवहारातल्या आणि सान्त असतात.. खरेदीची यादी, मृत्युपत्रात केलेली विगतवारी, मेन्यूकार्डावरली चवीचवींची यादी.. यातूनही संस्कृतीचा प्रत्यय आपापल्या परीने येतच असतो.
अनादिकाळात किंवा इतिहासपूर्व काळातील संस्कृतीत याद्या नसतील, असेच काही नाही.. त्यांच्याही याद्या असतील, पण आपल्याला त्या जेथपासून वाचता किंवा उलगडता येतात, तिथपासून इतिहास सुरू होतो. मध्ययुगात तर विश्वाची कल्पना पाश्चात्त्य जगालाही आलेली असल्यामुळे याद्या आणखी वाढल्या; पण मध्ययुगातही कमी श्रेणी ज्ञात होत्या आणि त्यामुळे आजच्या तुलनेत त्या वेळच्या याद्या कमीच होत्या. पण हे वैज्ञानिक क्षेत्रातील ज्ञानाबद्दल झाले. याउलट सांस्कृतिक क्षेत्रातील याद्या अगदी शाखोपशाखांनी वाढल्याच आणि मुख्य म्हणजे पुन:पुन्हा केल्या गेल्या, त्यातून दर वेळी नव्या राहिल्या. मध्ययुगातील खगोलज्ञान भले तोकडे असेल, पण त्यावर आधारलेला प्रबोधनकाळ आणि बरोक कलाशैली या कैक याद्यांचे उगमस्थान ठरल्या. उत्तराधुनिक काळातसुद्धा याद्यांचे महत्त्व कमी झालेले नाही, होणारही नाही. कारण याद्या हा मानवी जीवनेच्छेचा आविष्कार आहे.’’
हा उम्बतरे ईको पक्का युरोपवादी म्हणावा लागेल! त्याला कृष्णाच्या सोळा सहस्र नारी ही सांस्कृतिक संकल्पना ‘अमूर्त यादी’ म्हणून आठवलीच नाही.. त्याऐवजी दोन-अडीच हजार बायकावाला कुणी डॉग गिव्होनानी त्याला महत्त्वाचा वाटला. पण हे असे हेत्वारोप करण्याऐवजी ईकोचं म्हणणं साकल्यानं वाचल्यानंतर एक मुद्दा तरी स्पष्ट व्हावा.. इंटरनेटवरल्या ऊठसूट याद्यांमुळे यादी हा प्रकारच बदनाम किंवा अतिपरिचयाचा ठरला, तरीदेखील कुणीही याद्या करायचे थांबणार नाही..
नाहीच थांबलेलं कुणी यंदाही. उलट, याद्यांमध्ये वैविध्य दिसतंय पराकोटीचं. म्हणजे, सरळ ‘ही वर्षभरातली आमच्या मते महत्त्वाची पुस्तकं’ असं सांगून दहा-पंधरा पुस्तकांची नावं एकाखाली एक – हवं तर माहितीसह- मांडण्याऐवजी काय काय शकला लढवल्यात काही जणांनी! ‘पब्लिशर्स वीकली’ हे प्रकाशन धंद्याचं नियतकालिक असल्यामुळे ते सर्वानाच न्याय देऊ पाहातात.. ‘टॉप टेन’ आणि ललित/ललितेतर या नेहमीच्या श्रेणींखेरीज विज्ञानकथा, गूढकथा, कॉमिक, प्रेमकथा.. धर्मविषक.. झालंच तर, ‘मिडल ग्रेड’ आणि ‘यंग अ‍ॅडल्ट’ या वयोगटांवर आधारलेल्या श्रेणी.. असे तब्बल १३ प्रकार पब्लिशर्स वीकलीच्या संकेतस्थळावर आहेत आणि या १३ पैकी प्रत्येक श्रेणीत ६ ते १५ पुस्तकं. ही खास विक्रेतेगिरीला पोषक अशी यादी, पण ‘न्यूयॉर्कर’ या दर्जेदार ललित आणि ललितेतर गद्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नियतकालिकानं वेगळीच शक्कल लढवली आहे. ‘यंदा कोणत्या ललित पुस्तकांनी (माझ्या) ज्ञानात काय भर पाडली’ अशी एक यादी ‘न्यूयॉर्कर’नं त्यांच्या साहित्य-प्रतिनिधीला करायला सांगितली. फोर्ब्ज या अर्थउद्योग क्षेत्रातल्या मासिकानं ‘बेस्ट बिझनेस बुक्स’ ही यादी सालाबादप्रमाणे यंदाही केली. संगणकसम्राट बिल गेट्स हासुद्धा ‘मी वाचलेली पुस्तके’ अशी यादी २०१३ पासून दर डिसेंबरात करतो. त्याच्या यादीत ‘वॉटरगेट’ भ्रष्टाचारफेम रिचर्ड निक्सन यांची दुसरी बाजू उलगडू पाहणारं पुस्तक तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेट्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेलं ‘द रोड टु कॅरेक्टर’ हे पुस्तक आपल्याकडे रस्तोरस्तीसुद्धा लवकरच दिसू लागेल आणि खपेल, अशी शक्यता आहे.
इंटरनेटवर जरा शोधलंत तर आणखीही याद्या सापडतीलच.. पण इथं या याद्यांची यादी करणं, हा या ‘बुकबातमी’चा उद्देश नाही. बातमी एवढीच की, याद्या वाढताहेत!