13 July 2020

News Flash

बुकबातमी : ट्रम्पिस्तानातलीअमेरिकी सेना

अफगाण भूमीवरून सैन्य माघारी घेण्याची घाई केली, अशीही मतं- अर्थातच सज्जड आधारानिशी- या पुस्तकात आहेत. 

‘ट्रम्प यांच्यापासून अमेरिकेचं रक्षण करावं लागेल, याची जाणीव या तिघाही संरक्षणतज्ज्ञ अधिकाऱ्यांना लवकरच झाली..’ हे पीटर बर्गेन यांच्या ताज्या पुस्तकातलं वाक्य सध्या गाजतं आहे! ‘ ट्रम्प अँड हिज जनरल्स- द कॉस्ट ऑफ केऑस’ या नावाचं ते पुस्तक ‘पेंग्विन’तर्फे १० डिसेंबरपासूनच अमेरिकी बाजारांत आलं असलं, तरी भारतात ते उपलब्ध नाही. संरक्षणमंत्री जिम मॅटिस , व्हाइट हाउसचे (अध्यक्षीय कार्यालयाचे) प्रमुख जॉन एफ. केली आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एच. आर. मॅकमास्टर हे ते तिघे तज्ज्ञ. या तिघांनाही ट्रम्प यांनीच नेमलं आणि ट्रम्प यांनीच घालवलं. यापैकी मॅटिस आणि केली यांनी चीनशीच यापुढे अमेरिकेची स्पर्धा असणार, हे ओळखलं होतं. पण बाकी आंतरराष्ट्रीय संरक्षणनीतीबाबत अनेकदा, ट्रम्प यांच्या ‘आगळय़ावेगळय़ा’ कल्पनांपुढे या तिघांनीही हात टेकले! उत्तर कोरियावर हल्लाच करायचा, म्हणून ट्रम्प हटून बसले होते म्हणे..  अहो दक्षिण कोरियाची राजधानी सोल (सेऊल) ही इतकी जवळ आहे की तिचंही नुकसान होईल, मोठी जीवितहानी होईल, असं सांगावं तर ट्रम्प म्हणाले,‘‘मग त्यांना हटावं लागेल.. शहर रिकामं करावं लागेल’’!  हे २५ लाख लोकवस्तीचं एक जागतिक दर्जाचं शहर आहे, याचं भानच नसल्यासारखं ट्रम्प बोलत होते. एकंदर जणू, बिल्डर लोक जशी एखादी नवी ‘साइट’ पाहातात, वाटाघाटी करतात, तसाच ट्रम्प यांचा पवित्रा अनेक भूराजकीय बाबतींत असायचा, असं मत ‘सीएनएन’चे ‘राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक’ असलेले आणि या क्षेत्रात नावाजलेले पीटर बर्गेन नोंदवतात. वाटाघाटींनंतरही उत्तर कोरिया शिरजोरी करतो आहेच. शिवाय  इराण करार तोडू नका, हा मॅटिस आणि मॅकमास्टर यांचा सल्ला ट्रम्प यांनी मानला नाही, अफगाण भूमीवरून सैन्य माघारी घेण्याची घाई केली, अशीही मतं- अर्थातच सज्जड आधारानिशी- या पुस्तकात आहेत.  एकंदर ट्रम्पिस्तानात अमेरिकी सेनेनं अमेरिकेच्या परराष्ट्रनीतीत काहीच भूमिका निभावली नाही (जशी अगदी ‘शांतता नोबेल’ मिळवणाऱ्या ओबामांच्याही कारकीर्दीत निभावली होती!) असा पीटर बर्गेन यांच्या या पुस्तकाचा सूर आहे.  देशप्रेमाचा दावा ट्रम्प वारंवार करतात. ‘सेनादलांवर ते (डेमोक्रॅट) प्रेम करत नाहीत, नाहीच नाही..’असं विधान त्यांनी अलीकडेच केलं होतं. पण प्रेमापेक्षा धोरण महत्त्वाचं, हे या पुस्तकातून उमगतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 1:55 am

Web Title: trump and his generals the cost of chaos book review zws 70
Next Stories
1 भांडवलशाही.. वाचवा होऽऽ
2 न्यायपूर्ण नात्यासाठी..
3 बुकबातमी : मनोरंजनाचा मागोवा..
Just Now!
X