आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं ‘टर्नअराऊंड : लीडिंग आसाम फ्रॉम द फ्रंट’ हे आत्मचरित्र आसाम विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना बाजारात आलं. त्या राज्यात मतदानाचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर आता यथावकाश, शनिवारी (१४ मे) दिल्लीत या पुस्तकाचा विमोचन सोहळा होतो आहे.
‘राजकीय आत्मचरित्र’ असंच या पुस्तकाचं स्वरूप असणार हे उघडच आहे. तसं ते आहेदेखील. शिवाय, गोगोईंची भाषणं, त्यांच्या आठवणी, मुलाखती यांमधून कुणी तरी भलत्यानंच हे पुस्तक संकलित केलेलं असावं, असा आरोपही करण्याची उबळ हे पुस्तक वाचताना येते.. कारण पुस्तकातल्या सातही प्रकरणांची मांडणी कालानुरूप नसून विषयानुरूप आणि तुकडय़ातुकडय़ांत आहे. बरं, बहुतेकदा प्रकरणाची सुरुवात ही अगदी ललितलेखासारखी असते आणि नंतरच्या तुकडय़ांत मात्र राजकीय सूर चढत जातो. ‘कोइनाधारा’ या प्रकरणात, त्याच नावाच्या खेडय़ातल्या स्वत:च्या घराबद्दल छानपैकी दोन-तीन पानं लिहून झाल्यावर मग दुसऱ्या तुकडय़ात ‘मंत्रालय इमारत पाहावी बांधून’ याचा अनुभव आपण कसा घेतला, त्यासाठी वाजपेयींना कसं साकडं घातलं (किंवा घालावं लागलं) आणि त्यांच्या सरकारनं कशी खळखळ केली, तरीही आसामच्या भल्यासाठी आपण नव्या इमारतीचा आग्रह कसा लावून धरला, वगैरे चऱ्हाट येतं. ‘राज्यशकट चालताना दिसला पाहिजे आणि त्यासाठी सरकारची कार्यालयं सुसज्ज असली पाहिजेत’ असा विचार गोगोई मांडतात, इथवर ठीक; पण पुढे त्यांचा सूर पक्षीयच असतो. तोही असणारच म्हणा! तरुण यांचे आईवडीलही काँग्रेसचे पाईक. गोगोई ‘पस्तिशीचे तरुण’ असताना (१९७१) इंदिरा गांधींनी त्यांच्यावर आसाम युवक काँग्रेसची जबाबदारी दिली आणि पुढे तर संजय गांधींनाही तरुण यांनी साथ दिली.
पण याहीपूर्वी, वयाच्या विशीत तरुण गोगोई हे साहित्यावर मनापासून प्रेम करणारे, स्वत:देखील लिहिणारे आणि आसामात भारतीय व असमिया साहित्याची छाप दिसावी, यासाठी नेटानं प्रयत्न करणारे होते. त्यांच्या आई उषा गोगोई या कवयित्री होत्या. हे साहित्य-संस्कार गोगोईंच्या लेखन-तुकडय़ांतून दिसत राहतात. अर्थात, हे शैलीपुरतंच राहतं. बाकी पुस्तक राजकीयच आहे, पण राजकीय हेतू आणि बिगरराजकीय शैली यांची छानशी सरमिसळ या पुस्तकात झाली आहे. तरुण यांचं बालपण जोऱ्हाट शहरात गेलं. तिथे पं. जवाहरलाल नेहरूंच्या दहा वर्षांत तीन सभा झाल्या, त्या तीनही आपण कशा ऐकल्या आणि कसे प्रभावित झालो, याचं वर्णन रसाळ आहे.. त्यामुळेच, ते वाचताना निव्वळ गांधी-नेहरू घराण्याचरणी निष्ठा वाहिलेला नेता नेहरूंबद्दल काही सांगतो आहे, असं वाटत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा दहा-बारा वर्षांची असणारी सारीच मुलं सहसा नेहरूंमुळे प्रभावित असत. गोगोईंनी मात्र वर्णन चित्रदर्शी केलं आहे, एवढंच वाचकाला वाटेल. तरुण गोगोईंनी इंदिरा गांधी यांना वाहिलेली निष्ठा आणीबाणीतही कशी अचल राहिली, हे सांगताना ‘आणीबाणीचा निर्णय चुकीचाच ठरला होता’ अशी भाषा ते वापरतात.. ‘चुकीचाच होता’ म्हणत नाहीत. या काळात मनाची कशी घालमेल झाली, आसामातील काही ज्येष्ठ नेत्यांनी आणीबाणीविरोधात स्वाक्षऱ्यांची मोहीम सुरू करून आपणालाही सही करायला सांगितलं आणि ‘अजून लहान आहेस तू वयानं.. तुझ्यापुढे अख्खी कारकीर्द आहे..’ तेव्हा निष्ठा की कारकीर्द, असा प्रश्न पडला आणि ‘अखेर निष्ठाच महत्त्वाची’ हे आईचे शब्द कसे आठवले, असा लिखाणाचा ओघ तरुण गोगोई यांनी ठेवला आहे. हा भावनिक सूर आहे, हे निश्चित. तो सूर पुस्तकभर दिसत राहतो. हा सूर पुस्तकाचं वैशिष्टय़ आहे खरा, पण नेमका हाच सूर, हीच भावनिक सरमिसळ करून ललितशैलीत लिहिण्याची पद्धत या पुस्तकाला मारक ठरते.
ती कशी, ते पाहू. खरं तर हे पुस्तक अगदी सरधोपटपणे लिहिलं असतं तरीही वाचकांनी हाती धरलं असतं. नुसता घटनांचा साद्यंत तपशील दिला असता, तरीही पुस्तकाचं वाचनमूल्य वाढलं असतं. १९७९ पासूनची आसामी आंदोलनं, १९८५ मध्ये या आंदोलकांशी झालेला ‘आसाम करार’, पुन्हा बोडो आंदोलन, अशा घडत्या इतिहासात गोगोईंचा सहभाग होता. सन १९७१ पासून केंद्रीय नेत्यांशी आधी दुरून, मग दुसऱ्या फळीतला महत्त्वाचा नेता या नात्यानं जवळून संबंध होता. मात्र नेमका हाच राजीव गांधींनी रातोरात घडवलेला ‘आसाम करार’ हा खरोखरच रातोरात होता का, याची माहिती या पुस्तकातून मिळत नाही. वाचकाचा अपेक्षाभंगच होतो. काँग्रेसनं या आसाम करारात २५ मार्च १९७१ पर्यंत आसामात आलेल्या ‘सर्व परकीयांना’ अभय देण्याचा निर्णय घेतला होता. हे सांगताना, ‘यावर टीका झाली, पण काँग्रेसचा हेतू प्रामाणिक होता,’ अशी भलामण गोगोई करतात; पण बांगलादेशात मुक्तिवादी बंडखोरांप्रमाणेच हिंदूंनाही टिपून मारण्याची ‘ऑपरेशन सर्चलाइट’ ही मोहीम नेमकी २६ मार्च १९७१ या दिवशी सुरू झाली होती. इंदिरा गांधी यांनी १९७१च्या डिसेंबरात बांगलादेश मुक्तिलढय़ाला सक्रिय (लष्करी) पाठिंबा जाहीर करण्याआधीच बांगलादेशी निर्वासित भारतात शिरू लागले होते, ते नेमक्या याच छळापासून वाचण्यासाठी. असं असताना, काँग्रेसचा हेतू प्रामाणिक कसा, या प्रश्नाच्या गुंत्यात गोगोई अजिबात शिरत नाहीत.
आसामातूनच राज्यसभेवर जाणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे. अखेरीस विषयसूचीदेखील आहे आणि ‘परिशिष्टा’मध्ये, अगदी १६ डिसेंबर २०१५ रोजी (म्हणजे पाचच महिन्यांपूर्वी) आसामचे मुख्यमंत्री या नात्यानं पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रानं पुस्तकाची २० पानं भरली आहेत आणि दुसऱ्या परिशिष्टात, गेल्याच स्वातंत्र्यदिनी गोगोईंनी केलेलं अख्खं भाषण आहे. हे तद्दन राजकीय शेपूट आहे आणि विधानसभेची निवडणूक जवळ आली असतानाच पुस्तक निघालं नसतं तर या परिशिष्टाची गरज होती का, हा एक प्रश्न किंवा मोदी यांच्याशी आपण कसे वागत होतो याची पुरावेवजा नोंद अशी ग्रंथबद्ध करण्यामागे केंद्र सरकार आसामवरही राष्ट्रपती राजवट लादेल आणि मग या नोंदीचा पुरावा ऐतिहासिक ठरेल अशी अटकळ होती की काय, असा दुसरा प्रश्न. यापैकी कोणता तरी एक प्रश्न वाचकाला पडेल, यात शंका नाही.
माजी पंतप्रधानांनी प्रस्तावनेच्या अखेरीस, आसामनं ‘लाहे- लाहे’ वृत्ती (‘लाहे लाहे’ म्हणजे सावकाश- सुशेगादपणा यांसाठीचा असमिया शब्द) सोडून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या लाहे-लाहे वृत्तीच्या खाणाखुणा नेमक्या तरुण गोगोईंच्या आत्मचरित्र-लिखाणामध्येही दिसत राहतात. त्यामुळे गोगोईंचं आत्मकथन कुठेही सत्यापलाप करत नसलं, तरी वाचकाला ठोस काही देत नाही.

विबुधप्रिया दास