दोन आदरणीय आध्यात्मिक पुरुषांबद्दल पूर्ण आदरच बाळगून, त्यांचे अनुभव- त्यांचे जीवनचरित्र यांची सांगड आधुनिक विज्ञानाशी घालणारे हे पुस्तक अरुण शौरी यांनी लिहिले. कोणताही ठाम निष्कर्ष त्यात नसला, तरी शौरी यांच्या चौकसपणाची साक्ष त्यातून मिळते..

अरुण शौरी यांचे ‘टू सेंट्स- स्पेक्युलेशन्स अराऊंड अ‍ॅण्ड अबाऊट रामकृष्ण परमहंस अ‍ॅण्ड रमण महर्षी’ हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले. रामकृष्ण परमहंस आणि रमण महर्षी या भारतातील दोन मोठय़ा आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांविषयीची माहिती या पुस्तकात आहेच, पण त्याहीपलीकडे जात हे पुस्तक मानवी मेंदूच्या संदर्भातील प्रत्येक गोष्टीचा आढावा घेणारे आहे.

मानवी मेंदू म्हणजे विज्ञानासमोरील एक मोठे कुतूहल आणि आव्हान आहे. जगभर मानवी मेंदूवर संशोधन सुरू आहे आणि त्यातून नवी माहिती मिळत आहे. आधी अनाकलनीय वाटणाऱ्या किती तरी गोष्टी आता समजू लागल्या आहेत. त्याचबरोबर वैज्ञानिक चाकोरीबाहेर विचार करू लागले आहेत. गूढ अनुभव, मृत्यूनंतरचे जीवन यांच्या चिकित्सेसाठी अध्यात्माचा अभ्यास आणि त्याचा शरीर-मनावर होणारा परिणाम हेही काही वैज्ञानिकांनी अभ्यासविषय मानले. आजपर्यंत मेंदूविज्ञानात प्रकाशित झालेल्या साहित्याचा आढावा आणि संशोधनाची माहिती या पुस्तकात मिळते. त्याचबरोबर मानसशास्त्र आणि समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही मांडणी केलेली आहे. पुस्तकाचे शीर्षक पाहता हे पुस्तक अध्यात्मावर असेल असे वाटते, पण प्रत्यक्षात यातील मांडणी अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान यांचा मेळ घालणारी आहे.

पुस्तकाच्या उपशीर्षकात ज्या दोन आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वांची नावे नमूद केली आहेत, त्यांचे मोठेपण आजच्या बाबा-महाराजांच्या तुलनेत शौरी यांनी अधोरेखित केले आहे. मुळात दीनांचे दु:खहरण करणे हे त्यांचे जीवितसाध्य होते. त्यांनी निरपेक्ष सेवा केली. त्याचे अनेक दाखले पुस्तकात आहेत. संकटसमयी माणूस हतबल होऊन कोणी तरी आपल्याला यातून वाचवेल अशी आशा मनी बाळगून बाबा-महाराजांकडे जातो आणि हे गुरू मात्र त्याचा गरफायदा घेतात, याची उदाहरणे आपण रोज पाहत असतो. म्हणून शौरी म्हणतात, की अशा महान गुरूंचा जमाना कदाचित आता संपला आहे. संकटात कोणाकडे धाव घ्यायची याचे भान आज ठेवणे अत्यावश्यक आहे.

पुस्तकात सुरुवातीला रामकृष्ण परमहंस यांच्या दैवी शक्तीबद्दल माहिती दिली आहे. श्री परमहंसाचे अनेक गूढ अनुभव (कालीमातेचे अनेकदा दर्शन, विवेकानंदांना शिष्यत्व देणे, इ.) त्यात नमूद केलेले आहेत. स्वत: परमहंस या अनुभवांबद्दल क्वचितच बोलत, पण शिष्यांनी प्रश्न विचारल्यास त्यांचे शंकानिरसन करण्यासाठी ते या अनुभवांबद्दल सांगत असत. त्यासाठी ते मिठाच्या बाहुलीचे उदाहरण देत. एकदा मिठाची बाहुली समुद्राचा तळ शोधायचे ठरवते. पण समुद्रात पडल्यावर ती त्यात विरघळून जाते. तसेच काहीसे या दैवी अनुभवांचे आहे. हे अनुभव वर्णन करण्यापलीकडे आहेत, असे ते म्हणत. हा अनुभव ज्याचा त्याने घ्यायचा असतो. आज मेंदूविज्ञानाने काही प्रयोगांद्वारे हे सिद्ध केले गेले आहे, की काही औषधांच्या प्रभावामुळे असे ‘गूढ अनुभव’ माणसाला येऊ शकतात. याशिवाय साधनेतील कठोरपणामुळे होणाऱ्या शारीरिक परिणामांची परिणती अशा अनुभवात होत असावी का? परमहंसांनी बारा वर्षे कठोर साधना केली; त्यापकी सहा वर्षे ते झोपले नव्हते. केवळ झोपेच्या अभावामुळेही माणसाला अनेक व्याधी होतात. त्याचबरोबर मनावरही परिणाम होतो. रमण महर्षीनी साडेतीन वर्षे अशी तपश्चर्या केली. अशा वेळी तहानलेले, भुकेले शरीर अशा संवेदना निर्माण करते का?

परमहंस अनेकदा समाधीत जात असत. काही विशिष्ट दृश्यांमुळे, आवाजामुळे ते एक प्रकारच्या गाढ तंद्रीत- समाधीत- जात असत. असा पहिला अनुभव त्यांना वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी आला. शेताच्या बांधावरून जात असताना काळ्या ढगांच्या पाश्र्वभूमीवर आकाशात विहरत असलेले पक्षी पाहून ते समाधीत गेले. तेथून जाणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांना घरी आणले. त्यांना काही शारीरिक दुखणे झाले आहे, असे वाटून त्यांच्यावर उपचार केले गेले. पण त्यानंतर त्यांना असे अनुभव वारंवार येऊ लागले.

शौरी पुढे असे प्रश्न उपस्थित करतात, की अशा समाधीअवस्थेत जाण्याचा व मेंदूशी संबंधित आजार असण्याचा काही संबंध आहे का? समाधीत मिळणाऱ्या ब्रह्मानंदात व अपस्माराच्या झटक्यात मिळणाऱ्या परमानंदात काही साम्य आहे का? त्या वेळेस मेंदूची स्थिती काय असते? आधुनिक काळात यावर ध्यानधारणेदरम्यान मेंदूमध्ये बीटा लहरी निर्माण होतात, त्यांचे साम्य फेफरे आलेल्या व्यक्तीच्या मेंदूतील लहरींशी असते’ यासारखे संशोधन झाले. अनेकदा समाधीत परमहंसांना आपल्या शरीरातून स्वसदृश आकृती बाहेर पडून आपल्याला मार्गदर्शन करत आहे, असे वाटत असे. तर कधी वेगवेगळी दृश्ये दिसत; त्यात काही वेळा भविष्यात घडणाऱ्या घटना दिसत. अपस्माराच्या उन्मादाच्या अवस्थेत रुग्णांना ज्याप्रमाणे परमानंद लाभतो त्याप्रमाणे समाधी अवस्थेत परमानंद लाभतो. मग या दोन्हीत काही साम्य आहे का? या दोन संतांना असा काही आजार होता का? ज्यामुळे ते वारंवार समाधीत जात असत? रमण महर्षीना अपस्माराचे झटके येत असत.

परमहंसांनी मृत्यूनंतर काहींना दर्शन दिले, असे सांगितले जाते. त्यात त्यांच्या पत्नीचाही समावेश आहे. काही भक्तांना त्यांच्या मृत्यूसमयी परमहंसांचे दर्शन मिळाले. प्रत्यक्षात ते त्या वेळी इतरत्र असत. पण भक्त याबद्दल अगदी ठामपणे ग्वाही देतात. या बाबीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचे झाले, तर मृत्यूसमयी माणूस प्रचंड शारीरिक व मानसिक तणावाखाली असतो, त्या वेळी परमहंसांवरील श्रद्धेमुळे त्याला प्रत्यक्ष दर्शन मिळाले, असे लेखकास वाटते. तीव्र इच्छेने असे भास होत असावे का? रमण महर्षी शेवटच्या घटका मोजत असताना म्हणाले की, मी कुठेच जात नाही. मी इथेच आहे. असे का झाले असावे, हाही प्रश्न शौरींनी मांडला आहे. हे गूढ, दैवी अनुभव हा स्व-संमोहनाचा प्रकार आहे? देवाच्या भेटीची आंतरिक तीव्र इच्छा आणि तगमग याला कारणीभूत असावेत का? संमोहित व्यक्तीला जसे प्रत्यक्षात नसलेले घडते आहे असे वाटते, तसे काही?

शिष्यांचे आजार बरे करणाऱ्या या दोन महान योग्यांना शेवटी कर्करोग झाला. श्री परमहंसांना अतीव वेदना होत असत आणि या वेदना दूर करण्यासाठी ते डॉक्टरना सांगत असत. एकूणच त्यांची तब्येत नाजूक होती. आयुष्यभर त्यांना विविध दुखणी त्रास देत रहिली. रमण महर्षीनाही शेवटी कॅन्सर झाला. पण त्यांनी आपले दुखणे धीराने सहन केले. आता प्रश्न असा निर्माण होतो की सर्व जगाचे दु:ख निवारण करणाऱ्या व्यक्तीला स्वत:ला असा दुर्धर आजार का व्हावा? आणि झाल्यास तो बर का करता आला नाही? या बाबतीत त्यांच्या शिष्यांचे उत्तर असे की इतरांचे दु:ख हरण करताना स्वामी त्यांचे कर्म स्वत:वर ओढवून घेत असल्यामुळे त्यांना व्याधी होत असत. त्यांच्या भावाने त्यांना शाप दिला होता म्हणून त्यांना घशाचा कॅन्सर झाला. पण स्वामींना पान-तंबाखूची सवय होती. अर्थात कॅन्सर होण्याचे फक्त तेवढेच कारण असेल असे नाही.

कोणी तरी आहे : स्वामी जसे म्हणत की माझ्या शरीरातून माझ्यासारखी दिसणारी व्यक्ती बाहेर पडून मला मार्गदर्शन करते किंवा त्यांना कालीमातेचे अस्तित्व सतत जाणवत असे. रमण महर्षीना असे गूढ अस्तित्वाचे अनुभव आले होते. असाच अनुभव अनेक गिर्यारोहकांना आलेला आहे. आत्यंतिक संकटसमयी आपल्याबरोबर कोणी तरी आहे, जे आपली काळजी घेत आहे आणि आपल्याला योग्य मार्गावर नेत आहे असे सतत वाटत असल्याचे त्यांपकी अनेकांनी नमूद केले आहे. त्याची अनेक उदाहरणे दिली आहेत. शास्त्रीय दृष्टिकोनातून हा अति उंचीवर कमी प्राणवायू मिळाल्याचा परिणाम असू शकतो. मात्र आणखी एका अस्तित्वाचा अनुभव समुद्राखाली पाणबुडी-हल्ल्यातून वाचलेल्यांनाही आला आहे. पाíकन्सनच्या रुग्णांना असे अनुभव येतात. म्हणजेच हा काही फक्त प्राणवायूच्या कमतरतेमुळे येणारा अनुभव नाही. आधुनिक विज्ञान याचे असे स्पष्टीकरण देते की टोकाच्या परिस्थितीत येणारा ताण, आत्यंतिक तहान, भूक, धोक्याची जाणीव यामुळे मन जास्त सावध होते. वेगवेगळ्या संवेदना जास्त बारकाईने टिपून त्यापासून संदेश मेंदूला देते आणि एक वेगळी भावना निर्माण होते.

मरण समीप अनुभव : माणसाला मृत्यूची भीती कायमच वाटत आली आहे. मृत्यूनंतर काय? हा सर्वाना छळणारा प्रश्न आहे. त्यावर काही धर्मग्रंथांनी सांगितले आहे की आत्मा अमर आहे आणि तो पुन्हा जन्म घेतो. डॉ. रेमंड मुडीसारख्या डॉक्टरांनी पािठबा दिला. त्यातून मरण समीप अनुभवांचा (नीअर डेथ एक्स्पीरिअन्स – एनडीई) अभ्यास सुरू झाला. आता साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की आत्मा म्हणजे काय? तो कुठे असतो? त्यावर रमण महर्षी ठामपणे असे सांगतात की आत्मा हृदयात असतो. त्यातून ‘मी’चा जन्म होतो. हृदय शरीरशास्त्राप्रमाणे डावीकडे असले तरी महर्षीच्या म्हणण्याप्रमाणे हे हृदय छातीच्या उजव्या भागात टाचणीने पाडलेल्या छिद्राइतके लहान असते. त्यासाठी ते मल्याळी ‘सीता उपनिषदातील’ पुरावा देतात. त्यांच्या मताप्रमाणे हे जग, जन्म, मृत्यू मिथ्या आहे. जागेपणा, झोप, स्वप्न यांचे चक्र जसे सुरू असते; तसेच जन्म-मरणाचे चक्र आहे. आत्मा बुद्धीपलीकडे आहे आणि बुद्धीचा त्याग केल्याशिवाय आत्मा दिसणार नाही.

मेंदूतज्ज्ञ यााला तीव्र तणावाखाली असलेल्या मेंदूचे खेळ समजतात. अर्थात यावर पुरेसे संशोधन झालेले नाही. कारण अत्यवस्थ रुग्णाला वाचवण्याकडे डॉक्टरांचे लक्ष असते. त्या वेळी त्याच्या मेंदूचा अभ्यास कोणी करत नाही. काही औषधांच्या प्रभावाखाली प्रयोगशाळेत असे अनुभव निर्माण करता येतात. पहिल्या महायुद्धात अति वेगाने, अति उंचीवर विमान नेण्यामुळे काही वैमानिकांना मृत्यूसमीप अनुभव आला. त्याचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की अति वेग व अति उंचीमुळे मेंदूतील रक्तप्रवाह वेगाने पोटाकडे व पायाकडे जात असे. त्यातून असे अनुभव येत असावेत. तर मग ‘एनडीई’ म्हणजे मेंदूतील बिघाड आहे का? तर मेंदूतील बिघाडामुळे असे होते यालाही पुरावा नाही. काही झाले तरी असे अनुभव म्हणजे मृत्यूनंतरच्या जीवनाचा पुरावा होऊ शकत नाही.

दोन संतांचे महत्त्व

सर्व गोष्टींचा ऊहापोह केल्यानंतर लेखक म्हणतात की या दोघांचे महत्त्व त्यांनी केलेल्या चमत्कारात नाही. हे चमत्कार ही फार वरवरची गोष्ट आहे. त्यांचे महत्त्व त्यांच्या गुणात आणि उपदेशात आहे. ते ‘आतील जगाचे’ प्रवासी होते. त्यांनी केलेल्या चमत्कारांचे इतरही स्पष्टीकरण देता येऊ शकेल. आपण त्यांच्या दैवी अनुभवांचा अभ्यास करून आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येते का, यासाठी प्रयत्न करायला हवे; आणि त्यांच्या १० टक्के जरी ज्ञान मिळाले तरी खूप झाले.

हे पुस्तक म्हणजे शौरींची तीव्र बुद्धिमत्ता, समतोल विचार, प्रत्येक शक्यतेचा विचार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्रयस्थपणे केलेले विश्लेषण आहे. अस्तित्वात असलेल्या संशोधनाचा आढावा घेणे सोपे असते, पण त्याचे परखड विश्लेषण कठीण असते. ते त्यांनी त्यांच्या नेहमीच्या कौशल्याने केले आहे. तरीही या पुस्तकातून कोणताही ठाम निष्कर्ष काढता येत नाही. कोणती बाजू खरी आहे हे कळत नाही. सामान्य माणसाचा वैचारिक गोंधळ दूर होत नाही. हे सगळे अनुभव आयुष्याच्या ‘या बाजूचे’ आहेत. आणि ‘त्या बाजूला’ गेल्याशिवाय त्यांचा खरे-खोटेपणा पडताळून पाहता येणार नाही. आणि जेव्हा तो आपण पाहू तेव्हा इतरांना सांगता येणार नाही.

हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे आहे. सामान्य व्यक्तीपासून वैद्यकीय व्यावसायिकांपर्यंत सर्वाना उपयुक्त ठरेल. एक वेगळा दृष्टिकोन आणि चौकटीपलीकडला विचार देणारे, विचारप्रवृत्त करणारे पुस्तक आहे.

लेखिका राज्यशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत.

टू सेंट्स- स्पेक्युलेशन्स अराऊंड अ‍ॅण्ड अबाऊट रामकृष्ण परमहंस अ‍ॅण्ड रमण महर्षी

  • लेखक : अरुण शौरी
  • प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
  • पृष्ठे : ४९६ किंमत : ४९९ रु.