‘‘बुकर’वर ‘बुकमार्क’ पानाचं एवढं प्रेम का?’ हा प्रश्न या पानाच्या खंद्या वाचकांना पडत असेल, तर त्या शंकेचा आदर करून आधी हा खुलासा केला पाहिजे की, हे पारितोषिक सर्वाधिक प्रतिष्ठेचं किंवा हे मिळालं तरच पुस्तक चांगलं, यातलं कोणतंही कारण यामागे नाही.. खरं कारण आहे ते हे की, कथात्म लिखाणाच्या, कादंबऱ्यांच्या वाचकांना नवनव्या पुस्तकांची भुरळ पाडणं आणि बिनवाचकांचीही उत्कंठा वाढवणं ही दोन्ही कामं ‘बुकर’ पारितोषिक जितक्या चोखपणे करतं, तितकं कोणतंही अन्य पारितोषिक करत नाही! तेव्हा यंदाच्या बुकरसाठी १३ स्पर्धक-पुस्तकांची पहिली यादी मंगळवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्या काही दिवसांतच ज्यांची चर्चा झाली, त्यांची नोंद इथं घेऊ. सलमान रश्दी, मार्गारेट अ‍ॅटवूड या ज्येष्ठ साहित्यिकांची अनुक्रमे सप्टेंबर आरंभी आणि ऑगस्टअखेरीस प्रकाशित होणार असलेली पुस्तकं ‘बुकर’च्या स्पर्धक यादीत आहेत. शिवाय तितक्या ज्येष्ठ नसलेल्या ब्रिटिश लेखिका डेबोरा लेव्ही यांचीही कादंबरी आगामीच. अमेरिकी लेखकांना गेल्या सहाच वर्षांत ‘बुकर’ मिळू लागलं, पण यंदा एकच अमेरिकेत राहणारी लेखिका १३ जणांच्या यादीत आहे, ती मूळची मेक्सिकोची. भारतीय साहित्यिक यंदा एकही नाही. मेक्सिकोच्या लेखिकेला ब्रिटिश समीक्षकांनी ‘अमेरिकन’ म्हटलेलं नाही!

यंदा आफ्रिकी स्त्री-मनाचा वेध घेणाऱ्या तीन कादंबऱ्या पहिल्या यादीत आहेत. पैकी ‘ऑर्केस्ट्रा ऑफ मायनॉरिटीज’ची लेखिका चिगोझी ओबिओमा जन्मानं नायजेरियन, तर अन्य दोघी ब्रिटिश-नायजेरियन. या दोघी म्हणजे बर्नार्डिन इव्हारिस्टो (‘गर्ल, वूमन, अदर’) आणि ओयिन्कान ब्रेथवेट (‘माय सिस्टर, द सीरिअल किलर’) तुर्कस्तानात राजद्रोही समजल्या जाणाऱ्या एलीफ शफाक या लेखिकेचं ‘टेन मिनिट्स थर्टी सेकंड्स इन धिस स्ट्रेंज वर्ल्ड’ आणि मूळची मेक्सिकोची, त्यामुळे आजवर स्पॅनिश भाषेतच लिहिणारी व्हॅलेरिया लुइसेली हिनं प्रथमच इंग्रजीत लिहिलेलं ‘लॉस्ट चिल्ड्रन आर्काइव्ह’ ही पुस्तकं ‘बुकर’चं सांस्कृतिक वैविध्य दाखवणारी आहेत. आर्यलडचे केव्हिन बॅरी यांची ‘नाइट बोट टु टँजिअर्स’ ही आयरिश गुंड-टोळ्यांची पाश्र्वभूमी असलेली कादंबरी, नवलैंगिकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वेध घेणारी ‘फ्रॅन्केस्स्टीन’ ही जीनेट विंटरसन यांची कादंबरी, अन्य लेखकांपेक्षा तुलनेनं तरुण असलेले मॅक्स पोर्टर यांची ‘लॅनी’ ही कादंबरी, अशी पुस्तकं यंदा स्पर्धेत आहेत.