News Flash

‘सीईओ’ काय वाचतात?

डॉरसे यांच्या यादीत अर्नेस्ट हेमिंग्वे यांची ‘द ओल्ड मॅन अ‍ॅण्ड द सी’ ही अजरामर कादंबरीही आहे!

आसिफ बागवान

असंख्य व्यावसायिक व्यवधानं असलेले ‘सीईओ’ आठवडय़ाभरात एका पुस्तकाचा फडशा पाडत असतील, तर ‘वेळच मिळत नाही’ असं सांगून वाचनाकडे पाठ करणाऱ्यांचं किती खरं मानायचं?

‘वाचाल तर वाचाल’ असा उपदेश नेहमीच दिला जातो. त्याची कारणं स्वतंत्रपणे इथं सांगण्याची गरज नाही. कारण ‘बुकमार्क’ हे पान मुळात वाचनाची आवड असलेल्यांसाठीचं. त्यामुळे वाचनाचं महत्त्व सांगण्याची गरज नाही. तरीही आताशा वाचनाची गोडी कमी होण्यामागे ‘वेळच कुठं मिळतो’ हे कारण सर्रास दिलं जातं. सध्या जग इतकं वेगवान झालं आहे की, वाचनासाठी फुरसत मिळत नसल्याचंही अनेक जण सांगतात. पण ही सबब किती तकलादू आहे, हे एका सर्वेक्षणातून कळतं. अमेरिकेतील ‘फास्ट कंपनी’ या मासिकाने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार मोठमोठय़ा कंपन्यांचे ‘सीईओ’ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षांला सरासरी ६० पुस्तकं वाचतात. म्हणजेच, सीईओंची मासिक सरासरी वाचनभूक पाच पुस्तकं इतकी आहे. याउप्पर दैनंदिन वृत्तपत्रं, नियतकालिकं यांचं वाचन वेगळंच. कोटय़वधींची उलाढाल असलेल्या कंपनीची धुरा सांभाळणारा, दिवसातील प्रत्येक मिनिटाचा आगाऊ हिशोब ठेवून त्यानुसार वेळ खर्च करणारा, असंख्य व्यावसायिक व्यवधानं असलेला ‘सीईओ’ आठवडय़ाभरात एका पुस्तकाचा फडशा पाडत असेल, तर ‘वेळच मिळत नाही’ असं सांगून वाचनाकडे पाठ करणाऱ्यांचं किती खरं मानायचं?

कंपन्यांचे ‘सीईओ’ वर्षांला ६० पुस्तकं वाचून संपवतात, असं म्हटल्यावर यातल्या अनेकांचं वाचन त्यांच्या त्यांच्या क्षेत्राशी, व्यवसायाशी संबंधित असेल, असं वाटू शकतं. पण या ‘सीईओं’च्या वाचनजगतात डोकावून पाहिलं, की त्यात काल्पनिक कथा-कादंबऱ्यांपासून आत्मचरित्रांपर्यंत आणि ‘सेल्फ हेल्प’ पुस्तकांपासून मानसशास्त्रीय अभ्यासाच्या पुस्तकांपर्यंतच्या पट्टय़ात या मंडळींची मुशाफिरी सुरू असल्याचं पाहायला मिळतं. पुढील तीन दिवसांत नववर्षांत प्रवेश करत असताना अनेक सीईओंनी आपली ‘बुकलिस्ट’ जाहीर केली आहे. एवढंच नव्हे, तर ही पुस्तकं वाचायला हवीच, अशी शिफारसही केली आहे! कोणती आहेत की पुस्तकं?

‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स यांनी त्यांच्या यादीत ‘अ‍ॅन अमेरिकन मॅरेज’ (लेखक : टायारी जोन्स), ‘दीज ट्रुथ्स : ए हिस्ट्री ऑफ द युनायटेड स्टेट्स’ (जिल लेपोर), ‘ग्रोथ : फ्रॉम मायक्रोऑरगॅनिझम टु मेगासिटीज्’ (व्हॅक्लव स्मिल), ‘प्रीपेअर्ड : व्हॉट किड्स नीड फॉर ए फुलफिल्ड लाइफ’ (डायना टॅव्हेनर), ‘व्हाय वी स्लीप : अनलॉकिंग द पॉवर ऑफ स्लीप अ‍ॅण्ड ड्रीम्स’ (मॅथ्यू वॉकर) या पुस्तकांचा समावेश केला आहे. ‘‘माझ्या यंदाच्या पुस्तकयादीत ‘फॅण्टसी’ साहित्य अधिक आहे. पण हे जाणूनबुजून केलेलं नाही. कदाचित दुसऱ्या जगाची सफर घडवणाऱ्या गोष्टींकडे मी आपोआप खेचला गेलोय,’’ असं गेट्स म्हणतात.

गेट्स यांच्या आवडत्या पुस्तकांची यादी हाताच्या बोटावर मोजण्यासारखी असली, तरी ‘फेसबुक’चा निर्माता मार्क झकेरबर्ग यानं मात्र यंदा २३ ‘वाचनीय’ पुस्तकांची शिफारस केली आहे. ही सगळी यादी या ठिकाणी देणं शक्य नसलं, तरी भिन्न संस्कृती, रूढी, इतिहास आणि तंत्रज्ञान या विषयांतील पुस्तकांचा या यादीत समावेश आहे. त्यापैकी ‘द मुकद्दिमाह’ हे इब्न खाल्दून यांचं जगातील इस्लामी इतिहासावरील पुस्तक लक्षवेधी आहे. मार्कच्या वाचननिवडीवर यंदा इतिहासाची छाप दिसते, तर ‘मायक्रोसॉफ्ट’चे सीईओ सत्या नाडेला यांच्या आवडत्या पुस्तकांच्या यादीत प्रेरणादायी किंवा मार्गदर्शनपर पुस्तकांना पसंती दिसून येते. अमेरिकी मानसशास्त्रज्ञ मार्शल रोसेनबर्ग यांचं बोलण्यातल्या शब्दांच्या तीव्रतेचं मोजमाप मांडणारं ‘नॉनव्हॉयलंट कम्युनिकेशन’ आणि टी. एस. इलियट यांचं ‘लिटल गिडिंग’ या पुस्तकांचा त्यात समावेश आहे.

‘ट्विटर’चे सीईओ जॅक डॉरसे यांच्या यादीतलं शल्यविशारद अतुल गावंडे यांचं ‘द चेकलिस्ट मॅनिफेस्टो’ हे पुस्तक भारतीय वंशाचा अमेरिकी लेखक म्हणून लक्ष वेधून घेतं. कोणतंही काम करण्याआधी त्याच्याशी संबंधित टप्प्यांची रीतसर ‘चेकलिस्ट’ करणं किती महत्त्वाचं आहे आणि त्यातून बावळट चुका कशा टाळता येतात, हे गावंडे यांचं पुस्तक सांगतं. डॉरसे यांच्या यादीत अर्नेस्ट हेमिंग्वे यांची ‘द ओल्ड मॅन अ‍ॅण्ड द सी’ ही अजरामर कादंबरीही आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 1:28 am

Web Title: us fast company magazine average books reads by big companies ceo in a year zws 70
Next Stories
1 सरत्या वर्षांतील ग्रंथखुणा..
2 कठीण समयाचे शुभ अर्थशास्त्र!
3 बहुसंख्याकवादी राजकारणाचा लक्ष्यभेद
Just Now!
X