12 December 2019

News Flash

पडद्यामागील रंजक तपशील..

‘स्टार इंडिया’ या माध्यम समूहाचा तीन दशकी प्रवास सांगणाऱ्या पुस्तकाविषयी..

उज्ज्वला बर्वे – ujjwalabarve@gmail.com

स्टार इंडियाया माध्यम समूहाचा तीन दशकी प्रवास सांगणाऱ्या पुस्तकाविषयी..

भारतीय माध्यम आणि मनोरंजन व्यवसाय हा भारतातील आघाडीचा आणि वृद्धिक्षम व्यवसाय आहे. भारतातील लोकसंख्या, भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्य, माध्यमांचे सामान्यांच्या जीवनातील स्थान आदींमुळे भारतातील माध्यम व्यवसायाचे- विशेषत: टीव्ही व्यवसायाचे- स्वरूप आणि दिशा जगातील माध्यम व्यवसायांपेक्षा खूप वेगळी आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसायांनी दखल घ्यावी असे मोठे माध्यम समूह भारतात निर्माण झाले आहेत. त्यांपैकी ‘स्टार इंडिया’ या माध्यम समूहाच्या वाटचालीतील चढ-उतारांची, संघर्षांची रोचक कहाणी ‘द मेकिंग ऑफ स्टार इंडिया’ या नव्या पुस्तकात वाचायला मिळते.

ज्येष्ठ पत्रकार वनिता कोहली-खांडेकर यांनी ‘स्टार’च्या स्थापनेपासून २०१८ पर्यंतचा प्रवास सांगितला आहे. कोहली-खांडेकर यांनी पत्रकार या नात्याने अनेक वर्षे माध्यम व मनोरंजन व्यवसायाचे वार्ताकन केले आहे. त्यामुळे स्टार टीव्हीच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना विविध उच्चपदस्थांना भेटण्याची, त्यांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळाली. तेव्हा वेळोवेळी जमा केलेली माहिती, इतर पुस्तके, अहवाल यांच्या आधारे त्यांनी हा सप्रमाण इतिहास वाचकांसमोर मांडला आहे. माध्यम अभ्यासकांच्या आणि व्यवस्थापन तज्ज्ञांच्या दृष्टीने त्याचे संदर्भमूल्य मोठे आहेच; परंतु एखाद्या उत्कंठावर्धक कादंबरीच्या शैलीत त्याचे लेखन केले असल्याने सर्वसामान्य वाचकालाही आवडेल असे हे पुस्तक आहे.

घटनाक्रमाची सुरुवात होते १९९० च्या दशकाच्या प्रारंभापासून. दूरदर्शनची मक्तेदारी मोडून काढत उपग्रह टीव्ही वाहिन्यांचा भारतात प्रवेश झाला आणि भारतीय टीव्ही मनोरंजनाचे क्षेत्र बदलायला सुरुवात झाली. त्या वेळी सगळ्यांत आधी भारतीयांच्या घराघरांत (केबल जोडण्यांद्वारे) पोहोचलेली उपग्रह वाहिनी म्हणजे- ‘स्टार टीव्ही’! (‘सॅटेलाइट टेलिव्हिजन एशियन रिजन’ या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरांपासून ‘स्टार’ असे नामकरण करण्यात आले होते.) हाँगकाँगस्थित रिचर्ड ली या उद्योगपतीने ती वाहिनी सुरू केली. प्रचंड मोठा आशियाई समुदाय पाश्चात्त्य करमणुकीचा भुकेला आहे किंवा असणार या विचाराने त्याने ‘स्टार प्लस’, ‘प्राइमस्पोर्ट्स’, ‘बीबीसी न्यूज’ व ‘एमटीव्ही’ या चार वाहिन्या सुरू केल्या आणि भारतीय प्रेक्षकमनांची घुसळण सुरू झाली.

१९९१ मध्ये फक्त पाश्चात्त्य कार्यक्रम दाखविणाऱ्या ‘स्टार टीव्ही’पासून ‘हॉट स्टार’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणेपर्यंतचा ‘स्टार’चा हा प्रवास मोठा रंजक आहे. विशेषत: १९९२-९३ मध्ये रूपर्ट मडरेक या माध्यमशहाच्या ताब्यात ‘स्टार’ आल्यानंतर त्याने या वाहिनीला पूर्ण भारतीय चेहरामोहरा कसा दिला; एमटीव्हीला टक्कर देण्यासाठी ‘चॅनेल व्ही’ ही वाहिनी कशी सुरू झाली; ‘हिंग्लिश’ हे खास भारतीय भाषा रूप रुजवण्यात या वाहिनीचा कसा सहभाग होता; कालांतराने ‘स्टार’ने हिंदी कार्यक्रमांत प्रवेश करून ‘झी’बरोबर संघर्षांचा पवित्रा कसा घेतला; रूपर्ट यांचे चिरंजीव जेम्स मडरेक, प्रणय रॉय, रतिकांत बसू, पीटर मुकर्जी, उदय शंकर आदींचे वाहिनीच्या प्रगतीतील योगदान; प्रत्येकाची कामाची पद्धत, त्यांचे गुणावगुण.. अशा अनेक मुद्दय़ांचा सविस्तर परामर्श लेखिकेने घेतला आहे. पत्रकारी लेखनाला अनुसरून मुलाखती दिलेल्यांची नावे तर त्यांनी दिली आहेतच; पण ज्यांनी मुलाखती नाकारल्या त्यांच्याबाबतीतही आवश्यक तेथे तसे उल्लेख केले आहेत.

सर्वसामान्य वाचक-प्रेक्षकांसाठी ‘स्टार’ म्हणजे ‘स्टार प्लस’ आणि त्यावर ‘क्यों की सास भी कभी बहू थी’ व ‘कहानी घर घर की’पासून सुरू झालेला कौटुंबिक मालिकांचा रतीब. या मालिकांच्या जन्मकहाण्या वाचणे मोठे रंजक आहे. ‘स्टार प्लस’ची आणखी एक ओळख म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’! हा कार्यक्रम खरे तर ‘कौन बनेगा लखपती’ या नावाने येणार होता. पण ‘लाखा’च्या जागी ‘करोड’ कसे आले, याची गोष्ट मुळातून वाचण्यासारखी आहे. मोठी उडी मारली तर मोठी ध्येये साध्य करता येतात, हा व्यवसाय क्षेत्रातील महत्त्वाचा धडा त्यातून नवउद्यमींना मिळू शकतो. तीच गोष्ट आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाची. खासगी वाहिन्यांच्या ‘सवंग मनोरंजन वाहिन्या’ या तोवरच्या प्रतिमेला छेद देणारा हा कार्यक्रम कसा तयार झाला, त्याने काय साध्य झाले, हे पुस्तकातून कळतेच; पण त्यातून भारतीय प्रेक्षकांची मानसिकताही लक्षात येते.

अनेक प्रस्थापित टीव्ही वाहिन्या, ‘प्रो-कबड्डी’, ‘आयपीएल’, ‘हॉट स्टार’ यांच्या जोरावर आजच्या घडीला सुमारे १४ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करणारा ‘स्टार’ हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा माध्यम समूह झाला आहे. आता ‘डिस्ने’ या अमेरिकी कंपनीकडे ‘स्टार इंडिया’ची मालकी आली आहे. इथून पुढे त्याची आणि एकूणच भारतीय माध्यम व्यवसायाची वाटचाल कशी होणार आहे, हे पाहणे उद्बोधक असेल.

या पुस्तकात आंतरराष्ट्रीय वाचकांनाही रस असणार, हे लक्षात घेऊन अनेक ठिकाणी तळटिपा, सविस्तर स्पष्टीकरणे देण्यात आली आहेत. त्यामुळे प्रत्येक घडामोडीचा संदर्भ पूर्णपणे स्पष्ट होतो. ‘स्टार इंडिया’चा हा इतिहास अलीकडचा, जेमतेम ३० वर्षांच्या कालावधीचा आहे. प्रेक्षक त्या इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होतेच; पण टीव्हीच्या पडद्यामागे काय चालते, ते सगळ्यांनाच माहीत नसते. आपण जे पाहिले, त्याच्या पुन:प्रत्ययाचा, पडद्यामागील तपशील माहीत करून घेण्याचा आनंद या पुस्तकाच्या वाचनाद्वारे मिळतो.

‘द मेकिंग ऑफ स्टार इंडिया’

लेखिका : वनिता कोहली-खांडेकर

प्रकाशक : पेंग्विन

पृष्ठे: २१२, किंमत : ६९९ रुपये

लेखिका माध्यम अभ्यासक व अध्यापक आहेत.

First Published on September 28, 2019 1:04 am

Web Title: vanita kohli khandekar book the making of star india
Just Now!
X