व्हॅन गॉ (उच्चार गॉघ्, गॉख्, गॉफ्   असा काहीही केला तरी चालेल! तोच तो..) हा आजच्या आधुनिक चित्रकलेच्या संकल्पनांची पायाभरणी करणाऱ्यांपैकी, म्हणून अतिशय महत्त्वाचा चित्रकार.  त्याच्या महान कार्याबद्दल थोडक्यात असं सांगता येईल की, ‘दृश्याचा माझा अनुभव मी कसा चित्रित करतो हे महत्त्वाचं आहे.अशा ध्यासातून त्यानं चित्रं रंगवल्यामुळे, पुढल्या काळात व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनांमधून आणि पुढे विचारांमधून आलेल्या चित्रांना मोकळीक मिळण्याचा पाया रचला गेला.  अर्थात, हे त्याच्या योगदानाचं पुरेसं वर्णन नव्हे. तसं त्याचं महत्त्व थोडक्यात सांगताही येणार नाही. म्हणून तर त्याच्या कलेचा वेध घेणारी, त्याच्या सैराट आयुष्याचा त्याच्या कलेशी ताळमेळ जोडू पाहणारी अनेक पुस्तकं निघाली. त्यापैकी माधुरी पुरंदरे यांचं पुस्तक मराठीत आहे, बाकीची इंग्रजीत किंवा फ्रेंच भाषेत वगैरे. पण आजच्या बुकबातमीतलं पुस्तक व्हॅन गॉच्या कलेबद्दल कमी आणि आयुष्याबद्दल- त्यातही त्याच्या आयुष्यातल्या एकाच आख्यायिकावजा गोष्टीबद्दल- अधिक आहे.

ही आख्यायिकावजा गोष्ट म्हणजे ‘व्हॅन गॉनं स्वत:चा कान कापला आणि प्रेयसीला पाठवला!’ यात ‘प्रेयसी’ हा आख्यायिकेचा भाग आहे, पण बाकी सारं खरं आहे! कानगोष्टींच्या खेळात मूळ वाक्य जसं बदलत-बदलत जातं, तसं व्हॅन गॉनं कान कापल्याच्या गोष्टीचं रूप पालटत गेलं, इतकंच. व्हॅन गॉ मानसिकदृष्टय़ा अस्थिर होता. त्यातूनच त्यानं कानासारख्या अवयवाला इजा करून घेतली आणि पुढे तर त्यानं आत्महत्त्याच केली, एवढी माहिती व्हॅन गॉ माहीत असणाऱ्या बहुतेकांना असतेच. पण म्हणून काही, त्यानं कान कधी कापला, कुठला कापला, किती कापला, कुणाला दिला, तिचं नाव काय, तिचे वंशज हल्ली कुठे असतात.. हे सारे तपशील कोणी शोधत बसत नाही. व्हॅन गॉची चित्रं आजही प्रेरणादायी आहेत का आणि असली तर ती कशाची प्रेरणा देताहेत, हे तरी एक तर महत्त्वाचं असतं किंवा मग ‘तो व्हॅन गॉ वगैरे उत्तुंग शिखरांचा काळ किती चांगला होता- नाही तर हल्लीची ताळतंत्र सुटलेली कला!’ असं तरी असतं. हे चित्रकलेच्या क्षेत्रातल्यांचे दृष्टिकोन झाले.

happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
this is true love old couple eating in one plate
याला म्हणतात खरं प्रेम! एका ताटात जेवणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक
once man misbehaved with priya bapat (1)
प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”

व्हॅन गॉच्या फक्त कापलेल्या कानाचाच शोध घेणाऱ्या लेखिका बर्नाडेट मर्फी या काही चित्रकलेच्या क्षेत्रात नाहीत – म्हणजे आतापर्यंत तरी नव्हत्या! त्या इतिहासकार आहेत (हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलीवरून केलेल्या सफरी आणि लोकरीचं विणकाम अशा छंदांबद्दलची पुस्तकं ‘बर्नाडेट मर्फी’ यांच्या नावावर असल्याचं इंटरनेट सांगेल, पण त्या मर्फी निराळ्या!). एखाद्या गुप्तचराच्या कौशल्यानं मर्फी यांनी या ‘केस’चा शोध घेतला आहे. तशी पावती १२ जुलैपासनं- म्हणजे ते पुस्तक प्रकाशित झालं रे झालं की लगोलग-  ‘न्यूयॉर्क टाइम्स’ किंवा ब्रिटनचा ‘टेलिग्राफ’ अशी दैनिकं देऊ लागली आहेत. या कौतुकात तथ्यही आहेच..

व्हॅन गॉ यानं कानाची फक्त पाळी नव्हे तर अख्खा कानच कापला होता. वस्तरा घेऊन २३ डिसेंबर १८८८च्या रात्री त्यानं हा प्रकार केला, असा निर्वाळा देण्यासाठी आजवर दुर्लक्षित राहिलेला एक सज्जड पुरावा- व्हॅन गॉच्या कानाची जखम तपासणाऱ्या डॉक्टरचं निदानपत्र – लेखिकेला सापडलं. अमेरिकेतल्या एका संग्रहात (बर्कले शहरातल्या कॅलिफोर्निया विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ‘बॅन्क्रॉफ्ट ग्रंथागारा’त) ते होतं. त्याचं महत्त्व लेखिकेनं जाणलं. पण हे एवढंच न करता, तिनं पुढला शोधही घेतला. व्हॅन गॉनं तो कान कापून कुणाला दिला होता, याचा शोध!

आजवर असं समजलं जाई की, रॅशेल नावाच्या कुणा तरुणीला त्यानं कान दिला. ते तसं नाही.

फ्रान्समधल्या आर्ल या छोटेखानी गावात व्हॅन गॉ फेब्रुवारी १९८८ पासून राहायला आला होता. या गावातलं वेश्यालय त्याच्या येण्या-जाण्यातलं होतं आणि इथं झाडलोटीचं काम करणाऱ्या तरुणीच्या कष्टांकडे कुणाचंही लक्ष जावं, इतक्या दु:खात ती होती. तिला कुत्रा चावला होता. त्याची मोठी, कुरूप खूण तिच्या हातावरच होती. रेबीज होण्याचा धोका टाळायचा, तर औषधोपचार हवेच. त्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. म्हणून बिचारी राब राब राबायची.

तिचं नाव गॅब्रिएल्ले. व्हॅन गॉ तिला ओळखायचा, पण बहुधा त्याला तिच्याबद्दल केवळ कणव वाटत असावी. त्यातूनच, आपल्या मांसाचा तुकडा त्यानं तिला दिला. तिच्या वारसांनाही लेखिका बर्नाडेट मर्फी यांनी हुडकून काढलं. आर्ल या गावातून जुने त्या वेळचे फोटोबिटोही मिळवले.

पण हे सारं करण्यासाठी मेहनत खूप झाली. सात र्वष त्या या विषयामागे होत्या! आर्ल गावात १८८८ साली राहणाऱ्या एकंदर १५००० लोकांची यादीच तयार करून, त्यातून शोध घेत-घेत त्या गॅब्रिएल्लेच्या वारसांपर्यंत पोहोचल्या. ‘मात्र, आर्लच्या दोन वर्तमानपत्रांनी बातम्यांमध्ये त्या महिलेचं नाव रॅशेल असं छापलं होतं,’ अशी माहिती बर्नाडेटच पुरवतात.

इतिहासातून काय शिकायचं, हे निराळं असतं. पण इतिहासाचे तपशील वाहावत जाऊ नयेत, ते तंतोतंत आणि खरेखुरेच असावेत, ही आस आणखी आगळी! ती आस बाळगून इतिहासकार बर्नाडेट मर्फी यांनी केलेलं हे काम, त्यांना चित्रकलेच्याही क्षेत्रात थेट प्रवेश मिळवून देणारं ठरलं आहे.. खुद्द ‘व्हॅन गॉ म्युझियम’मध्ये (अ‍ॅमस्टरडॅम शहरात) १५ जुलै ते २५ सप्टेंबर या काळात विशेष प्रदर्शन म्हणून मर्फी यांनी जमवलेली छायाचित्रं, त्यांनी संदर्भासाठी वापरलेली कागदपत्रं यांचं प्रदर्शन भरलं आहे! अ‍ॅमस्टरडॅमला नाही गेलात तरी अर्थात, ३२४ पानी पुस्तक आहेच.. ते इंटरनेटवर सध्या अवाच्या सवा किमतीला उपलब्ध आहे. पण ‘पेंग्विन इंडिया’तर्फे हे पुस्तक भारतीय बाजारातही उपलब्ध होणार असल्याची बातमी आहे.

 

Untitled-2