|| राहुल सरवटे

महाराष्ट्राविषयी जगभरच्या अकादमिक वर्तुळात झालेल्या संशोधनपर साहित्याचा आढावा घेणाऱ्या मासिक लेखमालिकेतील हा अकरावा लेख- परदेशी ज्ञानविश्वातील महाराष्ट्रविषयक अभ्यासाची वैशिष्टय़ं आणि त्याच्या मर्यादांचीही चर्चा करणारा..

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

गेलं वर्षभर या मासिक सदरातून आपण परदेशातल्या विद्यापीठांतून होणाऱ्या महाराष्ट्रविषयक संशोधनात्मक लिखाणाचा काही प्रमाणात परिचय करून घेतला. या लेखमालिकेचा समारोप करतेवेळी, एकीकडे परदेशातल्या विद्यापीठांमधला ‘मानव्यशास्त्रातला महाराष्ट्र’ सांगताना, बरोबरीने ‘महाराष्ट्रातली मानव्यशास्त्रे’सुद्धा पाहायला हवीत हे जाणवल्यामुळे हा समारोपाचा लेख दोन भागांत मांडण्याचा विचार आहे. आजच्या लेखात आपण परदेशात होत असलेल्या मानव्यशास्त्रातल्या महाराष्ट्रविषयक अभ्यासाचा एक व्यापक आढावा घेऊ. त्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या पुस्तकांची धावती तोंडओळख करून घेऊ आणि या परदेशी चर्चाविश्वाची काही उल्लेखनीय वैशिष्टय़ं व त्याच्या काही मर्यादांचाही विचार करू. आपल्या पुढच्या लेखात या विषयाची उलटी बाजू- म्हणजे महाराष्ट्रातल्या मानव्यशास्त्रांविषयी काही निरीक्षणं नोंदवण्याचा आपण प्रयत्न करू.

स्वातंत्र्योत्तर काळातल्या नावाजलेल्या महाराष्ट्राभ्यासकांमध्ये- महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक रचनांचा ऐतिहासिक अभ्यास करणारे हिरोशी फुकाझावा किंवा हिरोयुकी कोटानींसारखे जपानी इतिहासकार, महाराष्ट्राची जातव्यवस्था आणि विशेषत: ब्राह्मणेतर व दलित चळवळींचा इतिहास लिहिणाऱ्या रोझालींड ओ’हॅनलन किंवा इलिनॉर झेलिअट, महाराष्ट्रातल्या जातविरोधी विचारांचं अतिशय सूक्ष्म विश्लेषण करणाऱ्या आणि केवळ अभ्यासावर न थांबता या चळवळीत आयुष्य झोकून देणाऱ्या गेल ऑम्वेट किंवा मॅक्सिन बर्नस्टीन, १९ व्या आणि २० व्या शतकातल्या मराठी वैचारिक इतिहासाचा आढावा घेणारं इंग्रजीतलं एकमेव पुस्तक लिहिणारे मॅथ्यू लेडर्ले, पंढरपूरला ‘महाराष्ट्राचं जेरुसलेम’ मानणारे आणि वारीविषयी इंग्रजीत अभ्यासपूर्ण लिखाण करणारे फ्रेंच भाषिक पाद्री गाय देल्युरी, खंडोबा, बिरोबा आणि धनगरी ओव्यांवर संशोधन करणारे गुंथर सोन्थायमर आणि अ‍ॅन फेल्डहाऊस, रशियात दीर्घकाळ मराठी भाषा आणि साहित्य शिकवणाऱ्या प्राध्यापिका इरिना ग्लुश्कोवा, मराठय़ांच्या इतिहासाचा बहुपेडी अभ्यास करणारे आंद्रे विंक, स्टुअर्ट गॉर्डन, सुमित गुहा अशा अनेकांचा उल्लेख करणं प्राप्त आहे आणि तरीही जिम मासेल्लोस, ली श्लेसिंगर, फिलीप इंग्ब्लोम अशा अनेकांची नावं राहून जातात.

यातले बरेचसे अभ्यासक साधारणपणे मराठी विचारांच्या संदर्भात ज्याला ‘साठोत्तरी काळ’ म्हटलं जातं, त्या पिढीतले म्हणता येतील असे आहेत. या अभ्यासक मंडळींच्या पुढाकाराने गेली सुमारे पाच दशकं साधारणपणे दर दोन वर्षांआड ‘महाराष्ट्र अभ्यास परिषद’ भरवली जाते आणि तिथे वाचल्या गेलेल्या निबंधांचं संपादित स्वरूपात प्रकाशन होतं. याअंतर्गत छापली गेलेली अनेक पुस्तकं आज उपलब्ध आहेत. ही परिषद आजवर मॉस्को, टोकिओ, ब्रातीस्लाव, सिडनी, न्यू यॉर्क, शिकागो आणि भारतातल्याही अनेक शहरांत आयोजित केली गेली. २०१९ सालची महाराष्ट्र अभ्यास परिषद जानेवारीत अमेरिकेतल्या ऑस्टिन शहरात भरणार आहे. (अधिक तपशिलांसाठी http://www.maharashtra studiesgroup.org/activities.html या साठोत्तरी पिढीनंतरही हे संशोधन अनेक दिशांनी आणि उत्तम गतीनं पुढे गेलेलं दिसतं. ख्रिस्तियन नोवेत्झ्की, प्राची देशपांडे, अंजली नेर्लेकर अशा काहींचा आपण आधी परिचय करून घेतलाच आहे. तरीही, १९ व्या शतकातल्या मराठी मुद्रण माध्यमांतून निर्माण झालेल्या नव्या चर्चाविश्वाचा अभ्यास करणाऱ्या वीणा नरेगल (‘लँग्वेज पॉलिटिक्स, एलिट्स अ‍ॅण्ड द पब्लिक स्फीअर : वेस्टर्न इंडिया अंडर कलोनियालिझम’), विदर्भातल्या कापूस पिकाचा आणि दुष्काळाचा ऐतिहासिक वेध घेणारे लक्ष्मण सत्या (‘कॉटन अ‍ॅण्ड फॅमीन इन बेरार १८५०-१९००’ ; याचा संक्षिप्त आणि सुरस अनुवाद नुकताच नंदा खरे यांनी ‘कापूसकोंडय़ाची गोष्ट’ या नावानं केला आहे.), महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातल्या वासाहतिक कायदा, उदारमतवादी विचारसरणी आणि स्त्रियांच्या हक्कविषयक चर्चाचं विश्लेषण करणाऱ्या रेचल स्टर्मन (‘द गव्हर्नमेंट ऑफ सोशल लाइफ इन कलोनिअल इंडिया’), आंबेडकरी चर्चाविश्वाचा सखोल वेध घेणाऱ्या अनुपमा राव (‘द कास्ट क्वेश्चन’), भारतीय अर्काइव्हज्मधून लैंगिकतेचा इतिहास शोधणाऱ्या अंजली अरोंदेकर (‘फॉर द रेकॉर्ड’), भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचा शास्त्रीय संगीताशी असणारा अनुबंध उलगडणाऱ्या जानकी बखले (‘टू मेन अ‍ॅण्ड म्युझिक’), मुंबईच्या महानगर बनण्याच्या प्रवासाची हकीकत सांगणारे प्रशांत किदंबी (‘मेकिंग ऑफ अ मेट्रोपोलीस’), राष्ट्र, भाषा आणि इतिहास यांच्या एकमेकांत गुंफलेल्या कथनाचा मराठी शालेय शिक्षणक्रमाच्या संदर्भात अभ्यास करणाऱ्या वेरोनिक बेनेइ (‘स्कूलिंग पॅशन्स’), मराठी राष्ट्रीय कीर्तन परंपरेचा इतिहास तपासणाऱ्या अ‍ॅना शुल्त्झ (‘सिंगिंग अ हिंदू नेशन’), भारतीय स्त्रीवादाचा इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भात पाहणाऱ्या पद्मा अनगोळ (‘इमर्जन्स ऑफ फेमिनिझम इन इंडिया १८५०-१९२०’) अशा कित्येक अभ्यासकांचा परिचय या लेखमालिकेच्या मर्यादित अवकाशात करून घेणं शक्य झालं नाही.

मला वाटतं, यावरून किमान आपल्याला परदेशात चाललेल्या महाराष्ट्रविषयक अभ्यासाचा साधारण इतिहास, त्याची एकूण व्याप्ती आणि या चर्चाविश्वाच्या एकंदर दिशेचा काहीएक अंदाज येऊ  शकेल. इथे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, मानव्य किंवा सामाजिक शास्त्रांतर्गत चालणाऱ्या या अभ्यासाचा अंतिम लक्ष्य-विषय हा एखादा भूभाग क्वचितच असतो. म्हणजे अर्थव्यवस्था, राज्यसत्ता, वर्ग, लिंगभाव वा लैंगिकता, जात, वर्ग अशा कोटीक्रमांच्या अभ्यासाकरिता एखादा भूभाग (उदा. महाराष्ट्र) निवडून त्याचा ऐतिहासिक, वाङ्मयीन किंवा समाजशास्त्रीय अभ्यास केला जातो. इथे मुख्य संवाद हा कोटीक्रमांशी चाललेला असून, असा अभ्यास करताना भारतीय- आणि महाराष्ट्रीय- कालावकाशाबद्दल काही आनुषंगिक सैद्धांतिक मांडणी करणं असं या संशोधनाचं स्वरूप साधारणपणे असतं. त्यामुळे होतं काय की, त्या-त्या भाषांतली साधनं वापरण्यापुरती भाषा शिकणं पुरेसं ठरू लागतं. त्यामुळे या जुजबी भाषिक ज्ञानापलीकडचे त्या भाषेतले व्यापक सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भ या अभ्यासकांसाठी अनाकलनीय ठरतात.

आता यात आणखी एक अडचण अशी की, हे निव्वळ इंग्रजीत आणि बहुतांशी परदेशात चालू असलेलं भारत-महाराष्ट्रविषयक ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय संशोधन काळ आणि अवकाश या दोन्ही अर्थानं आधीच काहीसं दूरस्थ आहे. त्यातच आपल्या संशोधनाला व्यापक मराठी चर्चाविश्वाशी जोडून घेण्याची इच्छा आणि क्षमता ही आजच्या अभ्यासकांमध्ये तुलनेनं फारशी आढळत नाही. इथे या परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या वैश्विक आणि इंग्रजी अकादमिक चर्चाविश्वाच्या दोन ठळक मर्यादांकडे मला लक्ष वेधायचं आहे.

एक म्हणजे, अकादमीतून बहुभाषिकतेचा लय होऊन भारतीय भाषांमध्ये पुरेसा पाया नसणारा किंवा त्यांतल्या चर्चाविश्वाशी जोडून घेण्यास अनुत्सुक आणि अक्षम असा अभ्यासकांचा एक वर्ग मोठय़ा प्रमाणात अमेरिकी आणि युरोपीय अकादमीत आता कार्यरत आहे. विचारवंतांचं बहुभाषिक असणं हे जे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या वैचारिकतेचं विशेष लक्षण होतं ते हळूहळू खुंटत गेलं आणि या परदेशी विद्यापीठांच्या अवकाशातल्या चर्चाविश्वाचं भाषिक खुरटलेपण स्पष्ट दिसू लागलं. अरुण कोलटकर म्हणायचे : ‘माझ्या पेन्सिलीला दोन्ही बाजूंनी टोकं काढलीयेत; एका बाजूनं लिहिलेलं इंग्रजीत उमटतं आणि दुसऱ्या बाजूनं लिहिलेलं मराठीत!’ दुर्दैवानं नव्वदोत्तरी अकादमीच्या थोटय़ा पेन्सिलीची गोष्ट जराशी निराळी आहे.

आज भारतीय भाषांचा वरवरचा परिचयसुद्धा नसणारे भारतविषयक तज्ज्ञ पाश्चिमात्य अकादमीत दिसतात. उदाहरणार्थ, शबनम तेजानी यांचं ‘इंडियन सेक्युलॅरिझम’ (२००७) हे भारतीय इहवादाचा वैचारिक इतिहास तपासणारं पुस्तक महाराष्ट्रविषयक बरीच चर्चा करतं; परंतु त्यात एकही मराठी भाषेतलं साधन वापरलेलं नाही. ‘फाऊंडेशन्स ऑफ तिलक्स नॅशनालिझम’ या पुस्तकातून लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रवादाचा सामाजिक पाया तपासू पाहणाऱ्या परिमला राव यांनी तर साधा ‘केसरी’सुद्धा चाळलेला दिसत नाही. तेजानी आणि राव या दोघींनाही मराठीचा गंधही नाही हे उघडच आहे; परंतु अगदी पंडिता रमाबाईंवर संशोधनात्मक पुस्तक लिहिणाऱ्या उमा चक्रवर्तीसारख्या दिग्गज अभ्यासिकेनंसुद्धा मराठी शिकण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. ही उदाहरणं अपवादात्मक नाहीत. यात आणखी कित्येक नावांची भर घालता येईल.

त्यामुळे आपल्या संशोधनात भारतीय भाषांतली साधनं वापरण्यास अक्षम होत चाललेल्या या मंडळींमध्ये, ज्या लोकांविषयी आपण संशोधन करतो आहोत त्यांच्याशी याविषयी काही संवाद साधावा ही जाणीव तर फारच धूसर होऊन जावी, यात काही नवल नाही! गेल ऑम्वेट यांचं ब्राह्मणेतर चळवळीचा साद्यंत इतिहास सांगणारं मूळ १९७६ सालचं ‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड’ या नावानं १९९५ साली अनुवादित झालेलं पुस्तक सोडलं, तर आपण लेखमालिकेत उल्लेख केलेली इतर कुठलीच पुस्तकं मराठीत आजवर अनुवादित झालेली नाहीत. पी. डी. दिघेंनी केलेला ऑम्वेट यांच्या पुस्तकाचा अनुवादसुद्धा संक्षिप्त स्वरूपाचा आहे. म्हणजे, एकंदर या सगळ्या अकादमिक संशोधनाच्या पसाऱ्याचा मुळासकट मराठी अनुवाद होणं तर सोडाच, त्याची व्यवस्थित माहितीही मराठीत पोहोचली नाही. त्यामुळे महाराष्ट्रविषयक या बहुआयामी संशोधनाचा मराठी चर्चाविश्वावरचा परिणाम नगण्यच राहिला. संशोधनाचा परिचयच नाही झाला, तर त्यानं डोळे दिपले वगैरे जाण्याचीच शक्यता जास्त; मग त्या संशोधनाच्या मर्यादा वगैरे दाखवून देणं फारच दुष्कर अशी आपली गत झाली. पर्यायानं निव्वळ इंग्रजीत चालणाऱ्या या संवादांचा आशय जरी मुक्तीप्रधान असला, तरी तो बिरबलाच्या खिचडीसारखा दुरून भाताला अग्नी देण्याचा प्रकार ठरला तर त्यात आश्चर्य वाटू नये.

इथे फक्त स्थानिक भाषा न शिकता अकादमिक लेखन होतंय इतकाच मुद्दा नाही. खरा प्रश्न हा आहे की, हे अभ्यासक नेमके कुणासाठी लिहिताहेत? कुठल्या सामाजिक, भाषिक, राजकीय संवेदनांचे ते वाहक आहेत? हे लोक जे आपल्याबद्दल ज्ञान निर्माण करताहेत ते नेमके कुठल्या हितसंबंधांचं प्रतिनिधित्व करतात? ब्रिटिश सनदी अधिकारी आणि मराठय़ांचा एक इतिहासकार चार्ल्स किंकेड  हा ग्रँट डफने लिहिलेल्या मराठय़ांच्या इतिहासावर अभिप्राय देताना म्हणाला होता : ‘It was written without any regard for the feelings of the race whose story the author related.’ हेच उद्गार आजच्या काही मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय आणि ऐतिहासिक लिखाणाबाबत लागू पडतील अशी दुर्दैवी परिस्थिती आहे.

थोडक्यात, जात-वर्गीयदृष्टय़ा हे सगळंच प्रकरण अतिशय उच्चभ्रू आहे. विशेषत: गेल्या सुमारे २५ वर्षांत सामाजिकशास्त्रांकडे वळणारे मुख्यत: दोन वर्ग आढळतात – अभिजन व वंचित! एक निव्वळ इंग्रजीत वावरणारा आणि दुसरा भारतीय भाषांच्या काठाकाठानं चाललेला. अर्थातच, यांच्यात संवाद शून्य आहे. यातल्या मराठीच्या काठाकाठानं वावरणाऱ्या घरच्या मंडळींबद्दल आपण पुढच्या लेखात जाणून घेऊ.

परंतु इंग्रजीतल्या या अकादमिक विश्वाची आणखी एक मर्यादा म्हणजे या अकादमिक उत्पादन-प्रक्रियेचं झालेलं केंद्रीकरण! भारतविषयक वा भारतातल्या भाषिक समूहांबद्दल जे अकादमिक अभ्यास होतात, त्यांचं भारतांतर्गत केंद्र नवी दिल्ली आहे आणि भारताबाहेर न्यू यॉर्क, शिकागो, व्हीस्कोन्सीन, बर्कली, केंब्रिज, हायडेलबर्ग अशी इतर शहरं. या केंद्रीकरणाच्या प्रक्रियेमुळे आधीच उच्चभ्रू असणाऱ्या या उत्पादनाचा सामाजिक पाया आणखीच खचतो. अमेरिकी किंवा ब्रिटिश विद्यापीठांच्या प्रेसमधून छापल्या जाणाऱ्या या अकादमिक उत्पादनांचं विश्व अत्यंत ‘एलिट’ असणं साहजिकच होतं!

तरीही ही स्कॉलरशिप, हे अकादमिक ज्ञानविश्व महत्त्वाचं का आहे? कारण तिच्या माध्यमातून एक व्यापक वैश्विक संकल्पनात्मक संवाद शक्य होतो आणि आपल्या मुक्तीच्या शक्यतांचा शोध घेण्याची प्रक्रिया कार्यान्वित होऊ  शकते. आणखी एक म्हणजे, हा वैश्विक संवाद आपल्याला त्यांच्या चर्चाविश्वाद्वारे निर्माण करतोय. थोडं सोप्या भाषेत सांगायचं, तर मानव्यशास्त्राच्या ज्ञानशाखांचा विषय असतो – माणूस, त्याचा समाज, सामाजिक आंतरसंबंध, त्यांचा इतिहास, संस्कृती, साहित्य.. म्हणजे आपण सगळे लोक! इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्यसमीक्षा या ज्ञानशाखा आपली ज्ञानविषय म्हणून निर्मिती करतात. जागतिक राजकीय व वैचारिक अरिष्टाच्या सध्याच्या ट्रम्पेश काळात आपल्या निर्मितीप्रक्रियेकडे आपण नीट लक्ष दिलेलं बरं, नाही का?

rahul.sarwate@gmail.com