15 February 2019

News Flash

फॅसिझमचा साहित्यिक वेध

भविष्याचे भयावह चित्र रेखाटतानाच या कादंबऱ्यांनी फॅसिस्ट प्रवृत्तींचा कसा वेध घेतला, ते १९४० मधील ‘Prophecies of Fascism’ या लेखात ऑर्वेल तपासून पाहतो..

|| डॉ. मनोज पाथरकर

आदर्श समाजव्यवस्थेची कल्पना करणाऱ्या इंग्रजीतील ‘युटोपियन कादंबरी’ या साहित्यप्रकाराने २० व्या शतकाच्या पूर्वार्धात नकारात्मक वळण घेतले. भविष्याचे भयावह चित्र रेखाटतानाच या कादंबऱ्यांनी फॅसिस्ट प्रवृत्तींचा कसा वेध घेतला, ते १९४० मधील ‘Prophecies of Fascism’ या लेखात ऑर्वेल तपासून पाहतो..

अमेरिकी कादंबरीकार जॅक लंडनच्या ‘द आयर्न हील’ (१९०८) या कादंबरीकडे हिटलरच्या उदयाचे अचूक भाकीत म्हणून पाहिले जाते. माझ्या मते, ही कादंबरी फॅसिझमच्या उदयाचे भाकीत असण्यापेक्षा भांडवलशाही व्यवस्थेतील दडपशाहीची कहाणी आहे. ती लिहिली गेली तेव्हा फॅसिस्ट शक्तींच्या उदयासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रवादासारख्या संकल्पनांच्या पुनरुज्जीवनाचे फारसे चिन्ह नव्हते. मात्र एका महत्त्वाच्या सत्याचे आकलन जॅक लंडनला किती अचूकपणे झालेले होते, याचा प्रत्यय या कादंबरीतून येतो. ते सत्य म्हणजे- ‘समाजवादी परिवर्तन आपोआप होणारी प्रक्रिया नसून हा प्रवास अत्यंत खडतर असणार आहे.’ कोमेजून जाणाऱ्या फुलाप्रमाणे भांडवलशाही वर्ग आपल्याच अंतर्विरोधांमुळे आपोआप लयास जाणार नव्हता. काय घडते आहे, ते समजण्याइतकी हुशारी या वर्गात असल्याने आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने तो कामगार चळवळींवर प्रतिहल्ला चढविणार होता. जगाच्या इतिहासातील हा सर्वात रक्तरंजित आणि विधिनिषेधशून्य संघर्ष असणार होता.

‘द आयर्न हील’ची तुलना एच. जी. वेल्स लिखित ‘व्हेन द स्लीपर वेक्स : अ स्टोरी ऑफ इयर्स टू कम’ (१८९९) या कादंबरीशी (हीच कादंबरी पुढे १९१० साली ‘द स्लीपर अवेक्स्’ या नावाने पुन:प्रकाशित झाली) केल्यास जॅक लंडनच्या मर्यादा तर लक्षात येतातच; परंतु त्याचबरोबर तो वेल्सप्रमाणे ‘पूर्ण सुसंस्कृत’ नसल्याचे त्याला झालेले फायदेही ध्यानात येतात. वेल्सच्या कादंबरीतील जग चकचकीत, परंतु काहीसे भयप्रद वाटते. जातिव्यवस्थेसमान असलेली या समाजाची श्रेणीबद्ध रचना कामगारांना कायमचे गुलाम करून ठेवते. सौम्य प्रकृतीचे उच्चवर्गीय लोक कामगारांची पिळवणूक करताना दिसतात. चांगुलपणावर विश्वास नसलेल्या या वर्गाचे आयुष्य श्रद्धाहीन आहे. त्यांच्यासमोर जशी जीवनाची भव्यदिव्य उद्दिष्टे नाहीत, तसाच त्यांच्यात क्रांतिकारक किंवा धर्मासाठी हौतात्म्य पत्करणारे यांच्यातील जोशही नाही. वेल्सच्या भविष्यवेधी कादंबरीचा जॅक लंडनच्या साहित्यकृतीवर प्रभाव पडलेला आहे, हे निश्चित! मात्र, एक कादंबरी म्हणून ‘द आयर्न हील’ वेल्सच्या साहित्यकृतीचा दर्जा गाठू शकत नाही. ओबडधोबड शैलीत लिहिली गेलेली ही कादंबरी विज्ञानामुळे निर्माण झालेल्या शक्यतांचा फारसा विचार करीत नाही. समाजवादाची रेकॉर्ड वाजविणारे यातील मुख्य पात्र खुद्द समाजवादी साहित्यात कालबाह्य झालेले आहे! मात्र, त्याच वेळी स्वत:मधील आदिम प्रेरणांमुळे जॅक लंडन वेल्सच्या ध्यानात न आलेले एक महत्त्वाचे राजकीय तत्त्व समजून घेताना दिसतो. ते म्हणजे- ‘भौतिक ऐषारामावर आधारित समाजव्यवस्था फार काळ टिकू शकत नाही’!

वेल्सच्या युटोपियन कादंबऱ्यांच्या विडंबनावर बेतलेल्या अ‍ॅल्डस हक्सलेच्या ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’मध्ये (१९३२) नेमकी चंगळवाद आणि ऐषाराम यांनी परिसीमा गाठलेली दिसते. या कल्पित विश्वात सगळ्या जगाचेच एक पंचतारांकित हॉटेल होऊन गेलेले आहे. १९३० च्या दशकातील प्रवृत्तींचे उत्कृष्ट विडंबन असलेली ही कादंबरी भविष्यावर मात्र फारसा प्रकाश टाकत नाही. अशा प्रकारची कोणतीही समाजव्यवस्था दोन पिढय़ांपेक्षा अधिक काळ टिकू शकणार नाही. कारण सतत मौजमजा करीत राहणे ही विचारसरणी असलेला कोणताही सत्ताधारी वर्ग लवकरच आपले तेज गमावून बसेल. जॅक लंडनला चांगलेच ठाऊक होते, की सत्ताधारी वर्गाला एक कठोर नैतिक नियमावली आवश्यक असते. त्यांचा स्वत:वर गूढ धार्मिक विश्वास असावा लागतो. सातशे वर्षे जगावर अधिराज्य गाजविणारे ‘द आयर्न हील’मधील मूठभर श्रीमंत अमानुष राक्षस असले तरी ते ऐदी किंवा देहसुखामागे धावणारे नाहीत. ही समाजव्यवस्था पूर्णत: त्यांच्यावर अवलंबून आहे, असा त्यांचा दृढ विश्वास आहे. आणि म्हणूनच एका वेगळ्या अर्थाने तेही त्यांना विरोध करणाऱ्या क्रांतिकारकांइतकेच शूर, सशक्त आणि समर्पित वृत्तीचे आहेत.

बौद्धिक पातळीवर जॅक लंडनला कार्ल मार्क्‍सचे निष्कर्ष मान्य असल्याचे दिसते. भांडवलशाही वर्गाने स्वत:ला संघटित केल्यानंतरही भांडवलशाहीतील विरोधाभास- जसे की उपभोग्य वस्तूंचे अतिरिक्त उत्पादन- कायम राहतील हे त्याला स्पष्ट दिसत होते. परंतु मनोवृत्तीने लंडन बहुसंख्य मार्क्‍सवाद्यांपेक्षा वेगळा होता. त्याच्या स्वत:च्याच स्वभावात काही फॅसिस्ट प्रवृत्ती दडलेल्या होत्या. त्याला हिंसा आणि शारीरिक बळाचे आकर्षण होते. ‘नैसर्गिक अभिजनां’च्या संकल्पनेवर आणि पशुपूजनावर विश्वास असलेला लंडन बऱ्याचदा आदिमतेचे दैवतीकरण करतो. (त्याची सर्वात प्रसिद्ध कादंबरी ‘द कॉल ऑफ द वाइल्ड’ (१९०३) एका पाळीव कुत्र्याचा आदिम प्रेरणांच्या दिशेने होणारा प्रवास चितारते.) मात्र, यामुळेच आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यावर सत्ताधारी मालकवर्ग कसा वागेल, हे त्याला जास्त चांगले समजल्याचे दिसते. मार्क्‍सप्रणीत समाजवाद्यांचे इतिहासाचे आकलन इतके यांत्रिक होते, की मार्क्‍सचे नावही न ऐकलेल्या माणसांना स्वच्छ दिसणारे धोके त्यांना दिसले नाहीत. मार्क्‍सने फॅसिझमच्या उदयाचे भाकीत केले की नाही माहीत नाही. एवढे मात्र नक्की, की त्याच्या अनुयायांना छळछावणीच्या दाराशी नेले जाईपर्यंत फॅसिझमच्या धोक्याची कल्पना आली नाही. नाझी सत्तारूढ झाल्याच्या वर्षभरानंतरही मार्क्‍सवाद्यांना वाटत होते, की हिटलर महत्त्वाचा नसून ‘सामाजिक फॅसिझम’ हाच खरा शत्रू आहे. जॅक लंडनने ही चूक कधीही केली नसती. आपल्या अंत:प्रेरणेतून त्याने हिटलरचा धोका ओळखला असता. त्याला ठाऊक होते, की अर्थशास्त्रातील नियम गुरुत्वाकर्षणाच्या नियमांसारखे नसतात. स्वत:च्या दैवावर ठाम विश्वास असणारी हिटलरसारखी माणसे या नियमांना दीर्घकाळपर्यंत खुंटीवर टांगून ठेवू शकतात.

‘द आयर्न हील’ आणि ‘द स्लीपर अवेक्स्’ या दोन्ही कादंबऱ्या सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून लिहिल्या गेलेल्या आहेत. तर चंगळवादावरील उपहासात्मक प्रहार असलेली ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ ही कादंबरी हुकूमशाही आणि श्रेणीव्यवस्था यांच्यावरही हल्ला करते. या कादंबऱ्यांची तुलना फारशा प्रसिद्ध नसलेल्या अर्नेस्ट ब्रामाच्या ‘द सीक्रेट ऑफ द लीग’शी (१९०७) केल्यास काही वेगळेच मुद्दे लक्षात येतात. ब्रामाची ही युटोपियन कादंबरी वर्गसंघर्षांची मांडणी उच्चवर्गीय किंवा खरे तर मध्यमवर्गीय दृष्टिकोनातून करते. ती लिहिली गेली तेव्हा कामगार चळवळीच्या जोमदार वाढीचा मध्यमवर्गाने नुकताच धसका घ्यायला सुरुवात केली होती. आपल्याला खरा धोका ‘वरच्या’ स्तरातून नसून ‘खालच्या’ स्तरातून आहे, अशी चुकीची समजूत त्यांनी करून घेतली होती. एक राजकीय भाकीत म्हणून या कादंबरीला फारसे महत्त्व नसले, तरी राजकीय संघर्षांतील मध्यमवर्गाच्या मानसिकतेवर ती चांगलाच प्रकाश टाकते.

ब्रामाच्या कादंबरीत प्रचंड बहुमताने मजूर पक्ष निवडून येतो, परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेची स्थापना होत नाही. भांडवलशाही कायम ठेवतानाच ते वेतन सतत वाढते ठेवतात. यातून नोकरशहांची प्रचंड फौज तयार होते. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उच्चवर्गीयांवर करांचे ओझे लादले जाते. परिणामी ब्रिटन खरोखरच रसातळाला जाऊ  लागते. या सरकारचे परराष्ट्रीय धोरण १९३१ ते १९३९ या काळातील ब्रिटनमधल्या राष्ट्रीय सरकारच्या धोरणासारखेच असते. या सगळ्याविरुद्ध उच्च आणि मध्यमवर्ग एकत्र येऊन एक कट आखतात. भांडवलशाही ब्रिटिश समाजव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे, असे मानणाऱ्यांसाठी या बंडाची रीत अगदीच नावीन्यपूर्ण असते. ते चक्क ‘ग्राहकांचा संप’ पुकारतात! या संपाची पूर्वतयारी दोन वर्षे चालते. एकीकडे गुप्तपणे इंधनतेलाचा प्रचंड साठा केला जातो आणि दुसरीकडे कारखान्यांमध्ये कोळशाऐवजी तेल वापरले जाऊ  लागते. मग अचानक ब्रिटनमधील सर्वात मोठा उद्योग असलेल्या कोळसाखाणींवर बहिष्कार टाकला जातो.

खाणकामगार विचित्र परिस्थितीत सापडतात. त्यांनी खणून काढलेल्या कोळशाला ग्राहकच मिळत नाहीत. बेरोजगारीचे वाढते प्रमाण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांचे पर्यवसान यादवी युद्धात होते. या युद्धात परदेशातून मिळणाऱ्या मदतीमुळे उच्चवर्गीय विजयी होतात. कामगार संघटनांवर कायमची बंदी आणली जाते आणि फॅसिस्ट राज्यव्यवस्थेसारखीच शक्तिशाली असंसदीय शासनव्यवस्था अस्तित्वात येते. लक्षात घ्या, हे चित्र स्पेनमध्ये जनरल फ्रँकोची राजवट येण्याच्या तीस वर्षे आधीच या कादंबरीत पाहायला मिळते! (१९३६ ते १९३९ या काळात स्पेनमध्ये डावे प्रजासत्ताकसमर्थक (शेतमजूर, कामगार, मध्यमवर्गीय) विरुद्ध फॅसिस्ट राष्ट्रवादी (जमीनदार, व्यापारी, धर्मसंस्था, लष्करी अधिकारी) असा यादवी संघर्ष झाला. दोन्ही पक्षांना परदेशातून मदत मिळाली. विजयी ठरलेल्या राष्ट्रवाद्यांचे नेतृत्व खाणकामगारांचा संप निष्ठुरपणे मोडून काढणाऱ्या जनरल फ्रँकोने केले.)

अर्नेस्ट ब्रामासारख्या सौम्यप्रवृत्तीच्या आणि सहानुभूतीने लिहिणाऱ्या लेखकाला कामगारवर्ग चिरडला जाण्याचे दृश्य चितारावेसे का वाटावे? मला वाटते, ही संघर्षांत सापडलेल्या वर्गाची प्रतिक्रिया होती. स्वत:च्या अस्तित्वाचेच संकट समोर उभे ठाकल्याची त्यांची भावना झाली होती. त्यांच्या आर्थिक वर्चस्वाला जसा धोका निर्माण झाला होता तसे त्यांच्या आचार-विचारांनाही आव्हान दिले गेले होते. जॉर्ज गिसिंग या ब्रामापेक्षा काकणभर सरस असलेल्या लेखकामध्येही असाच कामगारवर्गाविरुद्धचा रोष दिसून येतो. अर्थात काळ आणि हिटलर यांनी मध्यमवर्गाला बरेच काही शिकविलेले आहे. यापुढे ते त्यांचा स्वाभाविक सहकारी असलेल्या कामगारवर्गाविरुद्ध जाऊन आपल्याच शोषणकर्त्यांची बाजू घेणार नाहीत. परंतु ते असे करतील किंवा नाही, हे त्यांना कसे हाताळले जाते यावर अवलंबून असणार आहे.

manojrm074@gmail.com

First Published on July 21, 2018 2:35 am

Web Title: what is fascism