16 January 2019

News Flash

ऑर्वेलची प्रकाशवाणी : शास्त्र म्हणजे काय?

मुळात आपण ‘शास्त्र’ किंवा ‘विज्ञान’ हा शब्द दोन वेगवेगळ्या, परंतु एकमेकांशी संबंधित अर्थानी वापरतो

जॉर्ज ऑर्वेल

डॉ. मनोज पाथरकर

ऑक्टोबर, १९४५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘व्हॉट इज सायन्स?’ या लेखात जॉर्ज ऑर्वेलने ‘शास्त्र’ आणि ‘शास्त्रीय शिक्षण’ यांचा नेमका अर्थ स्पष्ट केला आहेच; शिवाय मानव्यविद्याशाखांना दूर सारत केवळ निसर्गविज्ञानांवर भर देणाऱ्या शिक्षणपद्धतीलाही कुचकामी ठरवले आहे. त्या लेखाचा हा स्वैर अनुवाद..

‘ट्रिब्युन’मधील ‘वाचकांची पत्रे’ या सदरात एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला गेला. एका पत्रलेखकाने लक्षात आणून दिले, की आधुनिक समाजात ‘शास्त्रीय ज्ञानावर आधारित श्रेणीव्यवस्था’ निर्माण होण्याचा धोका आहे- म्हणजेच शास्त्रीय ज्ञान कमी असणाऱ्यांकडे नाममात्र सत्ता असेल. सदरहू पत्रलेखकाने यावर दुहेरी उपाययोजनाही सुचविली. एक म्हणजे, सामान्य जनतेला अधिकाधिक शास्त्रीय शिक्षण देणे आणि दुसरी म्हणजे, शास्त्रज्ञांनी आपल्या कोशातून बाहेर येऊन राजकीय व प्रशासकीय क्षेत्रांत सक्रिय होणे. सर्वसाधारण सूचना म्हणून आपण सर्वानीच याच्याशी सहमत व्हायला हरकत नाही. मात्र त्याआधी आपल्याला ‘शास्त्र’चा (विज्ञान) कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे स्पष्ट करायला हवे. (या निबंधात शास्त्र व शास्त्रीय हे शब्द अनुक्रमे Science व Scientific  यांसाठी वापरले आहेत.)

‘शास्त्र’चे दोन अर्थ

मुळात आपण ‘शास्त्र’ किंवा ‘विज्ञान’ हा शब्द दोन वेगवेगळ्या, परंतु एकमेकांशी संबंधित अर्थानी वापरतो. या दोन अर्थामध्ये गल्लत केल्यास शास्त्रीय शिक्षणाचे नेमके उद्दिष्ट स्पष्ट होत नाही. पहिल्या अर्थाने ‘शास्त्र’ हा शब्द अशा काटेकोर ज्ञानविषयांसाठी वापरला जातो, ज्यांत नियंत्रित वातावरणात प्रयोग केले जाऊ  शकतात. या अर्थानुसार, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र इत्यादी विषय शास्त्रे ठरतात आणि निसर्गविज्ञानाच्या शाखा (Natural Sciences) म्हणून ओळखले जातात. मात्र या अर्थाने अर्थशास्त्र किंवा समाजशास्त्र ही शास्त्रे ठरत नाहीत. ‘शास्त्र’चा दुसरा अर्थ एका ‘अभ्यासपद्धती’चा निर्देश करतो. यात वास्तविक घटनांचे निरीक्षण व तर्काधिष्ठित परीक्षण करून प्रत्यक्षात सिद्ध करण्याजोग्या परिणामांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो.

एखाद्या शास्त्रज्ञाला किंवा सुशिक्षित माणसाला ‘शास्त्र’ या शब्दाचा अर्थ विचाराल, तर बहुधा वरील दुसऱ्या अर्थाजवळ (एक अभ्यासपद्धती) जाणारे उत्तर येईल. मात्र रोजच्या लिहिण्या-बोलण्यात ‘शास्त्र’ हा शब्द पहिल्या अर्थानेच (निसर्गविज्ञान) घेतला जातो. त्यामुळे ‘शास्त्र’ म्हणताच डोळ्यासमोर परीक्षानळ्या, सूक्ष्मदर्शक यंत्रे, आलेख, इत्यादींचे चित्र उभे राहते. साहजिकच ‘शास्त्र’ म्हणजे ‘प्रयोगशाळेत निर्माण होणारे ज्ञान’ अशी समजूत रूढ झालेली आहे. एखादा जीवशास्त्रज्ञ, खगोलतज्ज्ञ अथवा गणितज्ञही ‘शास्त्रज्ञ’ या पदवीला प्राप्त होतो. मात्र राजकीय मुत्सद्दी, कवी, पत्रकार किंवा तत्त्वज्ञ यांच्यापैकी कुणाला ‘शास्त्रज्ञ’ ठरविण्याचा प्रयत्न कोणीही करणार नाही. ‘नव्या पिढीला शास्त्रीय शिक्षण देणे आवश्यक आहे’ असे म्हणताना ‘तरुण विद्यार्थ्यांना किरणोत्सर्ग, ग्रह-तारे किंवा त्यांच्या स्वत:च्या शरीरातील क्रिया यांबद्दल अधिकाधिक शिकवावे’ हेच अभिप्रेत असते. शास्त्रीय शिक्षणाचा अर्थ क्वचितच ‘अधिक नेमकेपणाने विचार करायला शिकविणे’ असा घेतला जातो.

शास्त्राच्या दोन अर्थामध्ये (निसर्गविज्ञान व एक अभ्यासपद्धती) होणाऱ्या गोंधळातून मोठाच धोका आहे. शास्त्रीय शिक्षणाचा आग्रह धरताना हे गृहीत धरले जाते, की निसर्गविज्ञानाचे शिक्षण घेतलेली प्रत्येक व्यक्ती सर्वच विषय अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. एखाद्या शास्त्रज्ञाची राजकीय मते किंवा कलेबद्दलचे विचार ‘सामान्य माणसा’पेक्षा (layman) श्रेष्ठ आहेत, असा समज यातून दृढ होऊ  शकतो. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, बुद्धिमान शास्त्रज्ञांकडे जगाचे नियंत्रण गेले तर त्यात आमूलाग्र सुधारणा घडून येतील, असा निष्कर्ष काढला जाऊ  शकतो! ‘शास्त्रज्ञ’ या शब्दाचा अर्थ निसर्गविज्ञानाच्या विविध शाखांतील तज्ज्ञ असाच घेतला जातो. त्यामुळे विज्ञानाचे श्रेष्ठत्व मान्य करण्याचा अर्थ असाही होऊ शकतो, की भौतिकशास्त्रासारख्या विषयांतील तज्ज्ञांची राजकीय समज कवींपेक्षा श्रेष्ठ असते.

निसर्गविज्ञानाबाहेरील प्रश्न..

परंतु शास्त्रज्ञांचा निसर्गविज्ञानाबाहेरील प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक वस्तुनिष्ठ असतो हे खरे आहे का? खरे तर, या निष्कर्षांला फारसा आधार नाही. एका साध्या ‘चाचणी’तून हे कळून येईल- कुणाही शास्त्रज्ञाला त्याचा ‘राष्ट्रवादा’सारख्या संकल्पनांबाबतचा दृष्टिकोन काय ते विचारा. मिळणाऱ्या उत्तरांवरून दिसून येईल की, ‘विज्ञानाला स्थलकालाच्या मर्यादा नसतात, ते आंतरराष्ट्रीय असते’ हे प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा वापर करताना कुणीही मानीत नाही. अनुभव असा आहे, की सर्वच देशांतील वैज्ञानिक व तंत्रज्ञ आपापल्या सरकारला डोळे झाकून पाठिंबा द्यायला तयार असतात. याउलट लेखक आणि कवी इतक्या सहजासहजी ‘राष्ट्रवादा’च्या प्रचाराला बळी पडत नाहीत, असे दिसून येते.

उदाहरणच घ्यायचे झाले तर दुसऱ्या महायुद्धपूर्व काळातील जर्मनीचे घेता येईल. जर्मन वैज्ञानिक संप्रदायाने हिटलरला कोणताही विरोध केला नाही. दूरगामी विचार करता हिटलरने जर्मन विज्ञानाची अपरिमित हानी केली; पण तो हे करीत असताना हजारो तज्ज्ञ त्याला आवश्यक वाटणाऱ्या विषयांवर संशोधन करण्यात व्यग्र होते. त्यात कृत्रिम तेल, जेटविमाने, रॉकेट्स, अणुबॉम्ब विकसित करणे, आदींचा समावेश होता. त्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय जर्मन युद्धयंत्रणा सज्जच करता आली नसती. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, बरेचसे जर्मन शास्त्रज्ञ नाझींच्या ‘वंशविज्ञान’नामक भंपकपणावर विश्वास ठेवायला तयार होते. त्यांची मते प्रा. ब्रॅडी यांच्या ‘द स्पिरिट अ‍ॅण्ड स्ट्रक्चर ऑफ जर्मन फॅसिझम’ या पुस्तकात पाहता येतील. मात्र साहित्यिकांनी आणि पत्रकारांनी नाझीवादाला वारंवार प्रश्न विचारले. म्हणूनच सत्ताधाऱ्यांकडून छळ केल्या गेलेल्या लेखक-पत्रकारांची संख्या ‘शास्त्रज्ञां’पेक्षा किती तरी जास्त होती. थोडय़ा-अधिक फरकाने असे चित्र सगळीकडेच दिसते. खुद्द इंग्लंडमध्येही आघाडीच्या शास्त्रज्ञांमधील बहुतेक जण भांडवलदारी समाजव्यवस्था अपरिहार्य म्हणून स्वीकारताना दिसतात. उगाच नाही त्यांना सढळपणे ‘सर’सारखे किताब दिले जात! जे इंग्रज शास्त्रज्ञ ‘जैसे थे’ व्यवस्था स्वीकारीत नाहीत ते बहुधा ‘कम्युनिस्ट’ असतात! म्हणजेच त्यांच्या तज्ज्ञतेच्या प्रांतात ते कितीही बुद्धिप्रामाण्यवादी असले, तरी काही निवडक गोष्टींबाबत ते चिकित्सक होणे टाळतात किंवा अप्रामाणिक दृष्टिकोन स्वीकारतात.

संकुचित तज्ज्ञ की सुसंस्कृत व्यक्ती?

निसर्गविज्ञानातील प्रशिक्षण आणि कुशाग्र बुद्धिमत्ता या दोन्ही गोष्टी मानवतावादी साक्षेपी दृष्टिकोनाची हमी ठरू शकत नाहीत. याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे अनेक राष्ट्रांत गुप्तपणे आणि उत्साहाने अणुबॉम्बवर काम करणारे शास्त्रज्ञ होत. याचा अर्थ सामान्य जनतेला शास्त्रांचे शिक्षण देऊ  नये असा अजिबात नाही. एवढे मात्र लक्षात घ्यायला हवे, की शास्त्रीय शिक्षणाचा अर्थ जर इतिहास आणि साहित्य वगळून अधिक प्रमाणात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र शिकविणे असा घेतला गेला तर ते शिक्षण कुचकामी ठरेल. त्यातून सर्वसाधारण व्यक्ती आपल्या विचारांना अधिकाधिक संकुचित क्षेत्रात बंदिस्त करील. एवढेच नव्हे, तर ज्याचे आपल्याला ज्ञान नाही अशा गोष्टींबद्दल तुसडेपणा मनात बाळगील. शास्त्रीय शिक्षणाचा अर्थ खरे तर समाजात विवेकनिष्ठ, साक्षेपी, चिकित्सक आणि प्रयोगाधारित विचार करण्याची पद्धती रुजविणे असा घ्यायला हवा. ही पद्धती केवळ तथ्ये (Facts) गोळा करण्यापुरतीच मर्यादित नसून सामोऱ्या आलेल्या कोणत्याही प्रश्नाशी भिडताना वापरली जाऊ  शकते. शास्त्रीय शिक्षणावर भर देणारी कुणीही व्यक्ती वरकरणी हे मान्य करील; पण खोलात जाऊन हे स्पष्ट करताना शेवटी ‘शास्त्रीय शिक्षण म्हणजेच निसर्गविज्ञानांचे शिक्षण’ या समीकरणाकडेच वळेल. कारण ‘शास्त्र’ म्हणजे एक ज्ञानशाखा नसून ती जगाकडे बघण्याची, ते समजून घेण्याची एक पद्धती आहे, हा विचार प्रत्यक्षात स्वीकारणे जड जाते.

शंभर वर्षांपूर्वी चार्ल्स किंग्सली या धर्मसुधारकाने शास्त्राला ‘प्रयोगशाळेत दरुगधींची निर्मिती’ म्हटले होते. आजचा तरुण रसायनशास्त्रज्ञ फारसा विचार न करता काव्याला ‘निरुपयोगी’ ठरविताना दिसतो. खरे तर हे लंबकाचे एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे जाणे आहे. या दोन्ही प्रतिक्रिया सारख्याच निर्थक आहेत. आज विज्ञान झपाटय़ाने पुढे जात असताना सर्वसामान्यांच्या शास्त्रीय शिक्षणावर भर देणे योग्यच आहे; पण त्याच वेळी शास्त्रज्ञांनाही मानव्यविद्यांच्या ‘शिक्षणा’चा फायदा होईल हे कोणी तरी ठासून सांगायला हवे.

manojrm074@gmail.com

First Published on May 12, 2018 2:33 am

Web Title: what is science article by george orwell