News Flash

‘भारतीय इस्लाम’चे अंतरंग…

मुस्लीम स्त्रियांच्या स्थितीबाबत पुस्तकात एक स्वतंत्र प्रकरण आहे.

‘बॉर्न ए मुस्लीम : सम ट्रुथ्स अबाउट इस्लाम इन इंडिया’ लेखिका : घझाला वहाब प्रकाशक : आलेफ बुक कंपनी पृष्ठे : ४०८, किंमत : ९९९ रुपये

|| श्रीरंग सामंत

भारतात मुस्लीम असण्याचा अर्थ काय? किंबहुना भारतीयांना- मुस्लीम व मुस्लिमेतर दोघांनाही- इस्लाम कसा भासतो? या प्रश्नांच्या उत्तरांपर्यंत नेणाऱ्या पुस्तकाचा हा परिचय…

मुस्लिमेतर भारतीयांच्या मुस्लीम धर्म आणि समाजाबद्दल असलेल्या धारणा पूर्वग्रहावर आधारित असतात आणि सर्व मुस्लीम धर्मीयांना एकाच चष्म्यातून बघितले जाते. भारतात इस्लाम गेली कित्येक शतके असूनसुद्धा आणि आजच्या घडीला देशात जवळपास २० टक्के लोकसंख्या मुस्लीम धर्मीय असली तरी, या धर्माच्या आणि समाजाच्या बाबतीत वस्तुनिष्ठ माहिती इतर धर्मीयांना नसल्याचे, नपेक्षा चुकीची किंवा अपुरी माहिती असल्याचे परिणाम आपण अनुभवत आहोत. कित्येक मुस्लिमेतर- विशेषत: हिंदू- मुस्लीम समाजाकडे फाळणीच्या चष्म्यातून बघतात आणि गेल्या काही दशकांत इस्लामी कट्टरपंथीय त्या धारणांना खतपाणी पुरवताहेत.

या पार्श्वभूमीवर, घझाला वहाब यांनी लिहिलेल्या ‘बॉर्न ए मुस्लीम : सम ट्रुथ्स अबाउट इस्लाम इन इंडिया’ या पुस्तकात इस्लाम व त्याचे भारतातील अनुयायी याबाबत खुलासेवार माहिती देण्यात आलेली आहे. शीर्षकाचा पहिला भाग- ‘बॉर्न ए मुस्लीम’- एका पारंपरिक आणि कर्मठ मुस्लीम घरात जन्मलेल्या लेखिकेचे अनुभव अधोरेखित करणारा आहे. घझाला वहाब या प्रथितयश पत्रकार असून ‘फोर्स’ नियतकालिकाच्या संपादक आहेत. देशाच्या सुरक्षानीती आणि सामरिक समस्यांविषयी त्यांनी भरपूर लेखन केले आहे. पत्रकारितेच्या या अनुभवाची प्रचीती या पुस्तकात येते.

पुस्तकाची सुरुवात वहाब यांच्या कुटुंबातील आठवणी व किस्से यांच्यापासून होते. आग्य्रातील ताजमहालजवळील मुस्लीम मोहल्ल्यात राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय सुन्नी मुस्लीम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मुस्लीम समाजात झपाट्याने पसरत असणाऱ्या ‘वेगळेपणाच्या समजुती’स वहाब यांनी हात घातला आहे. त्यांची एक नातेवाईक महिला म्हणते की, भारतात राहून माझ्या इस्लाम पाळण्यावर मर्यादा येतात. हा प्रश्न वहाब यांना अस्वस्थ करतो, कारण त्यांना स्वत:ला कधी आपल्या दोन वेगळ्या ओळखी आहेत असे वाटलेच नव्हते. भारतात मुस्लीम असण्याचा अर्थ काय? किंबहुना भारतीयांना- मुस्लीम व मुस्लिमेतर दोघांनाही- इस्लाम कसा भासतो? मुस्लीम प्रतिनिधी सांगतात तसा इस्लाम हा शांतता, सहिष्णुता आणि सहअस्तित्व मानणारा धर्म आहे की हा एक अपवादात्मक, जुनाट व ताठर मान्यता धरून बसलेला धर्म आहे?- या प्रश्नांना भिडत वहाब यांनी पुस्तकात या विषयाची शोधपूर्ण आणि मुळापासून मांडणी केली आहे. म्हणूनच हे पुस्तक प्रामाणिक आणि वस्तुनिष्ठ झाले आहे.

देशाची फाळणी, दहशतवाद यांविषयी जनमानसात असलेल्या समजुतींमुळे मुस्लिमांबाबत असलेल्या पूर्वग्रहांना खतपाणी मिळाले आहे. ‘इस्लामिक स्टेट’विषयी वर्णने वाचून पूर्वग्रह आणखी दृढ होण्यास मदत झाली आहे. त्यात मुस्लीम समाजाची गेली काही दशके आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे जे उठावदार प्रयत्न झाले आहेत, त्याची भर पडली आहे. हे वेगळेपण ठामपणे दाखवायचा प्रयत्न का होत आहे, यावर वहाब यांनी भाष्य केले आहे. इस्लामिक स्टेट, जिहाद व मुख्य म्हणजे मुस्लिमांचे ‘इतरेकरण’ हे विषय त्यांनी पुस्तकात कळकळीने हाताळले आहेत. त्याबाबत त्यांनी भारतीय मुस्लीम बुद्धिवंत, धर्म-संप्रदायांचे नेते, मुस्लीम नोकरशहा, राजकारणी व व्यावसायिक, इतर नामवंत व्यक्ती यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. एकुणात, हा विषय त्यांनी सर्व बाजूंनी चाचपून पाहिला आहे.

‘स्टोरी ऑफ इंडियन इस्लाम’ या प्रकरणात वहाब यांनी भारतातील इस्लामिक विचारसरणीची घडण, विशेषत: सूफी विचारसरणीचा प्रभाव आणि प्रसार याचे वर्णन केले आहे. मुस्लीम धर्माची ओळख नसलेल्या वाचकांसाठी सर्वात उपयुक्त ठरणारे प्रकरण म्हणजे पैगंबर मोहम्मद यांचे जीवन व त्यानंतर घडलेला मुस्लीम समाज, त्यातील धर्म-परंपरा यांचा आलेख. मुस्लीम धर्माचा प्रसार व इस्लामी विचारसरणीची उत्क्रांती यांवरील वहाब यांचे भाष्य वस्तुनिष्ठ आहे. मुस्लीम समाजावर धर्मगुरूंचा प्रभाव यावरही त्यांनी विस्तृत विश्लेषण केले आहे. भारतातील मुस्लीम धर्मपीठांना भेटी देऊन, तेथील पुढाऱ्यांशी विस्तृत चर्चा केल्यानंतर जाणवलेल्या त्यांच्यातील वैचारिक व व्यावहारिक विसंगती मांडायला त्या मागे-पुढे पाहात नाहीत.

मुस्लीम धर्म वरून एकसंध वाटला तरी, धर्माअंतर्गत मतमतांतरे व भिन्न विचारप्रवाह- ज्यांची मुस्लिमेतरांना जुजबी माहितीच असते- हे सारे वहाब यांनी सोप्या भाषेत उलगडून सांगितले आहे. शिया व सुन्नी यांच्यातील विवाद कसे व कधी सुरू झाले आणि आजच्या घडीला त्याची किती व्याप्ती आहे हे त्यांनी स्पष्ट केले आहे. वहाब नमूद करतात की, हे दोन्ही पंथप्रवाह भारतीय उपखंडात असले तरी भारतातील बहुसंख्य मुस्लीम स्वत:ला या दोन्ही पंथांशी जोडून घेत नाहीत.

फाळणीपूर्वीच्या आणि त्यानंतरच्या परिस्थितीचाही वहाब यांनी आढावा घेतला आहे. फाळणीपूर्वी भारतातील मुस्लीम समाज प्रामुख्याने शहरांत होता व गावांत असलेले त्यांचे प्रतिनिधी जमीनदार वर्गातील होते. फाळणीची मागणी व ती उचलून धरणारा वर्ग हा मुख्यत्वे उच्चवर्गीय जमीनदारांचा होता आणि सामान्य मुस्लीम माणूस त्यांच्या चिथावणीला बळी पडला. फाळणीच्या वेळी मोठ्या प्रमाणात सुशिक्षित/उच्चवर्गीय मुस्लीम पाकिस्तानला गेले; भारतात राहिलेल्या मुस्लीम समाजास त्यांच्यातील सुशिक्षित लोकांचे स्थलांतर फार महागात पडले, असे निरीक्षण वहाब यांनी नोंदवले आहे. भारतातील इस्लाम धर्म आणि भारतीय मुसलमान यांनी आधुनिकता स्वीकारली पाहिजे, असे त्या म्हणतात. पण हे तेव्हाच होऊ शकेल जेव्हा मुसलमान समाजाला सुरक्षितता जाणवेल आणि ते शांततेत राहू शकतील याची खात्री असेल, हेही अधोरेखित करण्यास त्या विसरलेल्या नाहीत.

मुस्लीम स्त्रियांच्या स्थितीबाबत पुस्तकात एक स्वतंत्र प्रकरण आहे. बुरखा, तिहेरी तलाक आदींवर वहाब यांनी भाष्य केले आहे. तसेच मुस्लीम लीग, महंमद अली जिना, मौलाना आझाद यांच्यापासून आताच्या ओवेसी बंधूंपर्यंत मुस्लीम राजकारणात झालेल्या चढ-उतारांचा वेधही वहाब यांनी घेतला आहे. वहाब लिहितात की, अगदी अलीकडेपर्यंत धर्म हा सामाजिक संबंधांच्या आड येत नसे. बऱ्याच मुस्लीम विचारवंतांचे उदाहरण देत त्या म्हणतात की, भारतातील सौम्य इस्लाम सुफी पंथाच्या प्रभावामुळे होता, ज्याला आपण भारतीय पद्धतीचा इस्लाम म्हणू शकतो. हा इस्लाम कट्टरवादाकडे वळण्याचे कारण सौदी अरबमधून झालेला वहाबी प्रसार. भारतीय उपखंडातील सूफी पंथाकडे पश्चिम आशियामधील इस्लामी धर्मगुरूंनी एक आव्हान म्हणून पाहिले आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले.

वहाब यांचे शोधकार्य विस्तृत आहे आणि या पुस्तकात प्रत्येक पानावर त्याची प्रचीती येते. भारतातील मुस्लिमांमधील असुरक्षिततेची भावना याबाबत लिहिताना वहाब यांनी देशात घडलेल्या दंगलींचाही मागोवा घेतला आहे आणि त्यातील काही ठळक प्रकरणांवर विस्तृत माहिती दिली आहे. कुराण आणि इतर इस्लामी धर्मग्रंथांतील उतारे संदर्भासहित दिलेले आहेत. तसेच बाबरी मशीद प्रकरणात पूर्ण घटनाक्रमाचा आढावा घेताना कुठेही मुस्लिमांना झुकते माप दिल्याचे वाटत नाही. हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य ठरावे. भारतातील इस्लाम आणि मुस्लीम धर्मीयांविषयी प्रचलित धारणा वहाब यांनी निर्भीडपणे वाचकांसमोर मांडल्या आहेत आणि त्या कितपत तथ्यावर आधारित आहेत याचे परिशिलन केले आहे. हे पुस्तक हिंदू-मुस्लीम संबंधांशी निगडित असलेल्या समजुतींचा वस्तुनिष्ठ शोध घेताना, दोन्ही पक्षांची सहानुभूतीपूर्वक दखल घेत असल्याचे जाणवते.

लक्षात घेण्याचा मुद्दा हा की, हिंदू-मुस्लीम तिढा गेली काही वर्षे उफाळून वर आलेला आहे तो देशाला विघटनाच्या वाटेवर घेऊन जाऊ शकतो. जगातल्या कुठल्याही समाजात एका मोठ्या वर्गाला आपण दुय्यम दर्जाचे नागरिक आहोत असे वाटणे दुर्दैवी आहे. गेली काही वर्षे देशातील राजकारणाने याबाबतीत जे धोक्याचे वळण घेतलेले आहे, त्याचा परिणाम जनमानसात ठळकपणे दिसून येतो आणि समाजमाध्यमांतून त्याचे घातक प्रतिबिंब पडत असते. या विषयावर दीर्घकालीन विचार करणे जरुरी आहे, अन्यथा भारत नेहमी समस्याग्रस्त राहील; परिणामी देश आणि समाज यांची प्रगती खुंटेल. भारतीय मुस्लीम समाज हा जगासाठी मार्गदर्शक ठरू शकतो आणि त्यासाठी राज्यकर्त्यांनी व विचारवंतांनी प्रामाणिक प्रयत्न करून सामान्य माणसाच्या मनातील तेढ दूर करणे निकडीचे आहे. हिंदू-मुस्लीम संबंध हा देशासमोरील कळीचा प्रश्न आहे आणि त्यावर दोन्ही पक्षांतील विचारवंतांनी समज-गैरसमज यांचा आढावा घेऊन मतभेद दूर होण्यासाठी प्रयत्न करायची गरज आहे. त्या दिशेने हे पुस्तक निश्चितच एक प्रशंसनीय पाऊल आहे.

svs@cogentpro.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2021 12:02 am

Web Title: what it means to be a muslim in india to indians muslims the muslim religion of the indians akp 94
Next Stories
1 बुकबातमी : नंतरचे सावरकर…
2 अव-काळाचे आर्त : चंगळवादाचे थैमान…
3 परिचय : पॅलेस्टाइन संघर्षावर ‘भांडवली’ उत्तर?
Just Now!
X