नयनतारा सहगल या स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर देशघडणीचा काळ पाहिलेल्या लेखिका. वय वर्षे ९०. त्यांच्या नावावर दहा कादंबऱ्या आणि दहा ललितेतर पुस्तकं आहेत. ‘व्हेन द मून शाइन्स बाय डे’ ही त्यांची अकरावी कादंबरी. ‘भरदिवसा डोळ्यासमोर तारे चमकायला लागणे’ अशा आशयाची म्हण मराठीत आहे. या म्हणीत जो अर्थ अभिप्रेत आहे तोच लेखिकेला या शीर्षकातून अपेक्षित आहे. रात्री चमकणारा चंद्र दिवसाही चमकायला लागला आहे. कुठेतरी काहीतरी गडबड आहे आणि तिचा गांभीर्याने विचार करायला हवा आहे, असं त्यांचं कळकळीने सांगणं आहे आणि ते साहित्यिक पद्धतीने त्यांनी सांगितले आहे.

बुद्धीप्रामाण्यवादी लेखक-विचारकांच्या हत्या आणि देशातील वातावरण कलुषित करणाऱ्या घटनांच्या  पाश्र्वभूमीवर साहित्य अकादमीसारखे सरकारी पुरस्कार परत करण्याची मोहीमच काही मंडळींनी २०१५ साली उघडली होती. त्यात नयनतारा सहगल या आद्य होत्या. साहित्य अकादमी पुरस्कार परत करून नयनतारा यांनी इथल्या बुद्धिमंतांना आपली अस्वस्थता व्यक्त करण्यासाठीचं एक प्रतीकात्मक हत्यार मिळवून दिलं होतं. त्यांच्या त्या कृतीनंतर देशभरातील काही बुद्धीजिवी मंडळींनीही पुरस्कार परत केले. धर्मनिरपेक्षतेचं वस्त्र विस्कटणं हे देशासाठी घातक ठरेल, हे कलावंत बजावून सांगू लागले.

पुरस्कार परत करणं ही एक भूमिका होती. पण नयनतारा यांच्यातील अस्वस्थ लेखिकेचं तेवढय़ाच कृतीने समाधान झालं नसावं. त्यांच्या त्या अस्वस्थतेतूनच ही छोटेखानी कादंबरी लिहिली गेली आहे. कादंबरी कशी आहे, हा भाग अलाहिदा, परंतु वयाच्या नव्वदीतही अस्वस्थ होण्याची आणि व्यक्त होण्याची त्यांची ऊर्मी किती तीव्र आहे, हेच त्यांच्या या लिखाणातून जाणवते. आजच्या परिस्थितीवरचं दाहक, बोचरं भाष्य म्हणून या कादंबरीकडे पाहायला हवं.

या कादंबरीत रेहाना ‘एशियन्स अगेन्स्ट टॉर्चर’ या मानवी हक्कांसंबंधी जागरूक असणाऱ्या संघटनेबरोबर काम करते आहे. आपलं काम सुरूच ठेवण्याचं कारण स्पष्ट करून सांगताना ती म्हणते, ‘कारण चंद्र दिवसा तळपतो आणि सूर्य रात्री, याच्याशी सहमत व्हायला नकार दिला म्हणून लोकांचा छळ होतो आहे.’ पुस्तकांवर बंदी, चित्रं उद्ध्वस्त केली जाणं, गायीच्या कातडय़ापासून बनवलेली सूटकेस वापरली म्हणून लोकांचे खून होणं, ‘डायरेक्टर ऑफ कल्चरल ट्रान्स्फॉर्मेशन’ म्हणजेच डीसीटीची सगळ्यांवर नजर असणं.. अशा घडामोडी कादंबरीत घडत जातात.

रेहाना, नंदिनी, अरुणा आणि लिली यांचा बुक क्लब आहे. त्या दर आठवडय़ाला भेटून पुस्तकांवर चर्चा करतात. त्यात मुघल इतिहासात रस असलेला कमलेशसारखा सरकारी अधिकारीही आहे, त्याला शहाजहानच्या कारकीर्दीचा अभ्यास करायचा आहे. फ्रान्झ रोहनर हा जर्मन इतिहासकार आहे. बुक क्लबच्या बैठकीत  कमलेश   ताजमहालाविषयी बोलतो. त्यांच्या चर्चामधून १९३० आणि ४० च्या दशकांतल्या युरोपशी आजच्या भारताची तुलना होते.

रेहाना आणि तिच्या या मित्रमंडळींच्या गप्पांमधून दहशतीचं वातावरण जाणवत राहतं.  डीसीटी हे सरकारी खातं सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून असतं. डीसीटीच्या अधिपत्याखाली असलेल्या समाजात कुणालाही दुसऱ्याला भेटलं की ‘भारत माता की जय’ असं अभिवादन करणं सक्तीचं केलं जातं. या खात्याने अल्पसंख्याकांना घेट्टोमध्ये राहण्याची सक्ती केलेली असते. मध्ययुगीन इतिहासावरचे रेहानाच्या वडिलांचे पुस्तक दुकानांतून नाहीसं केलं जातं. प्रियकर झमीरच्या लिखाणामुळे त्याच्या वाटय़ाला आलेलं दुर्दैव रेहाना पाहते आहे.

रोजच्या जगण्यात रेहानाच्या अवतीभवती असं क्रौर्य असलं तरीही ती भवतालाविषयी कुतूहल राखून आहे. त्यातून तिला समजतं, की तिचा नोकर अब्दुल्लाला घराबाहेर पडलं की मुरारीलाल या नावाने वावरणं सुरक्षित वाटतं. पण त्याचाच मित्र असलेल्या सूरज नावाच्या दलित तरुणाला मात्र असं कोणतंच सुरक्षाकवच मिळत नाही. आर्ट शोच्या उद्घाटनाच्या दिवशीच सायरस बाटलीवालाच्या गॅलरीत बॉम्ब फुटतो. तर युद्धविरोधी विचारांसाठी कमलेशला विरोध सहन करावा लागतो. हे सगळं ‘हिंदू’ या वंशाचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी चाललेलं असतं. बुक क्लबमधल्या चर्चेत इतिहासकार रोहनर सगळ्यांना बजावतो की, सगळ्या क्रांती शेवटी एकाच मार्गावरून जातात हे लक्षात ठेवा! जर्मनवंशीय रोहनरच्या मते जर्मनांचा ‘भूतकाळ’ हा भारतीयांचा ‘भविष्यकाळ’ आहे.

एकूणच लेखिकेने या कादंबरीतून उपहासात्मकरीत्या सध्याच्या परिस्थितीबद्दलची आपली राजकीय असहमती मांडली आहे. त्यातून ‘आज’च्या भारताचं चित्र वाचकांसमोर उभं राहिलं तर नवल वाटायला नको!

  • ‘व्हेन द मून शाइन्स बाय डे’
  • लेखक : नयनतारा सहगल
  • प्रकाशक : स्पीकिंग टायगर
  • पृष्ठे : १६८, किंमत : ३९९ रुपये

वैशाली चिटणीस

vaishali.chitnis@expressindia.com