|| डॉ. मनोज पाथरकर

लेखकाची राजकीय-वैचारिक भूमिका महत्त्वाची असते याबद्दल वाद नाही. मात्र, त्यापलीकडे जाणारी साहित्यातील ‘कला’ देशोदेशींच्या वाचकांना दीर्घकाळ भुरळ पाडते. टॉलस्टॉयच्या शेक्सपीअरवरील टीकेविषयी भाष्य करताना जॉर्ज ऑर्वेल हेच लक्षात आणून देतो..

the new york times book review
बुकमार्क : ग्रंथ परिचयाच्या विश्वात..
freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

कलेच्या मूल्यमापनावर राजकीय, नैतिक आणि धार्मिक मूल्यांचा परिणाम होणे क्रमप्राप्त आहे. याचा अर्थ असा नव्हे की, ‘सौंदर्यात्मक आकलन’ अशी काही चीजच नसते. कलाकृतीकडे राजकीय-वैचारिक दृष्टिकोनातून पाहू गेल्यास वाचकाला उघडपणे जाणवणाऱ्या गोष्टी अनाकलनीय होऊन जातील. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रशियन कादंबरीकार लिओ टॉलस्टॉयने केलेली शेक्सपीअरच्या साहित्याची समीक्षा! आयुष्याच्या उत्तरार्धात लिहिलेल्या एका लेखात टॉलस्टॉयने शेक्सपीअरवर सडकून टीका केलेली आहे.

टॉलस्टॉयचे म्हणणे असे की : ‘शेक्सपीअरला उगाच मोठे केले गेले आहे. खरे तर तो कसलेही कलागुण नसलेला, जागतिक पातळीवर तुच्छ म्हणावा असा लेखक आहे.’ टॉलस्टॉयच्या या लेखाबद्दल इंग्लंडमध्ये संताप व्यक्त झाला. मात्र, त्याचा समाधानकारक प्रतिवाद करायला कुणीही पुढे आले नाही. हा लेख परिपूर्ण होता असेही नाही. परभाषेतील साहित्याचे विश्लेषण करीत असल्याने टॉलस्टॉयचा बऱ्याचदा गैरसमज होतो. त्याच्या प्रतिपादनात विरोधाभास येऊ  लागतात. शेक्सपीअरविषयीचा तिरस्कार त्याला महत्त्वाच्या गोष्टी दिसू देत नाही. परंतु हे सगळे गौण मुद्दे झाले. टॉलस्टॉयने मांडलेला मुख्य मुद्दा एकाअर्थी बरोबरच आहे. शेक्सपीअरच्या खुळचट अतिप्रशंसेचा फुगा फोडण्यासाठी हा लेख आवश्यकच होता. टॉलस्टॉयने घेतलेले आक्षेप चुकीचे नव्हते.

टॉलस्टॉयच्या मते, शेक्सपीअर एक उथळ लेखक आहे. विचार करण्याचे कष्ट घ्यावेत अशा कोणत्याही कल्पना त्याच्या लेखनात नाहीत. सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांमध्ये त्याला फारसा रस नाही. त्याची पात्रनिर्मिती चोख नाही. कथानक रचताना तो शक्याशक्यतेचे तत्त्व अजिबात पाळत नाही. त्याच्या साहित्यातून प्रतित होणारा दृष्टिकोन ऐहिक, तुच्छतावादी आणि नीती-अनीतीची चाड नसलेला आहे. विश्वासार्हता धाब्यावर बसवून अशक्यप्राय घटना व कल्पनारम्य आख्यायिकांची जुळवाजुळव करत शेक्सपीअर आपल्या नाटकांची गोधडी शिवतो. कथानकाशी संबंध नसलेली स्वगते, लोकगीतांची कडवी, चर्चा आणि असभ्य विनोद यांचा त्याच्या नाटकांत फुकाचा भरणा असतो. नीतिमूल्ये पायदळी तुडविणारे सोळाव्या शतकातील राजकारण आणि अन्याय्य सामाजिक भेदाभेद यांबद्दल तो कसलेही प्रश्न उपस्थित करीत नाही. थोडक्यात, लेखक म्हणून बेफिकीर असलेला शेक्सपीअर नैतिक मूल्यांच्या चौकटीअभावी विचारवंताच्या पातळीवर जाऊच शकत नाही.

यातील बहुतेक गोष्टींचा प्रतिवाद केला जाऊ  शकतो. ज्या अर्थाने टॉलस्टॉय शेक्सपीअरला नीती-अनीतीची चाड नसलेला लेखक म्हणतो, तसा तो खचितच नाही. त्याची नैतिक चौकट टॉलस्टॉयपेक्षा वेगळी असेल, परंतु त्याच्या साहित्यात सर्वत्र तिचे अस्तित्व जाणवते. आधीच्या शतकांतील चॉसर (इंग्लंड) आणि बोकॅशिओ (इटली) यांच्यासारख्या लेखकांशी तुलना केल्यास हे लगेच लक्षात येते आणि टॉलस्टॉयला वाटतो तसा शेक्सपीअर अडाणीही नाही. उलट कधी कधी त्याच्या दृष्टीला काळाच्या पुढचे दिसते, असे म्हणायला वाव आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘टिमॉन ऑफ अथेन्स’ या नाटकाची कार्ल मार्क्‍सने केलेली समीक्षा. टॉलस्टॉयला नसले तरी मार्क्‍सला शेक्सपीअरचे कौतुक होते!

परंतु टॉलस्टॉयच्या प्रतिपादनात तथ्य आहे हेदेखील मान्य करायलाच हवे. शेक्सपीअर महान विचारवंत वा तत्त्ववेत्ता वगैरे नाही. त्याचे विचार एखाद्या पोतडीतला गडबडगुंडा आहेत. सर्वसामान्य इंग्रज गृहस्थाप्रमाणे त्याची आचारविचारांची एक चौकट आहे; परंतु जगाकडे पाहण्याचा सुसंगत दृष्टिकोन अथवा तत्त्वज्ञान त्याच्याकडे नाही. नाटक रचताना शेक्सपीअर संभवनीयता आणि पात्रांची एकसंधता यांची फारशी पर्वा करीत नाही. त्याची बहुतेक कथानके इतरांकडून ‘उचललेली’ आहेत आणि फुटकळ बदल करून घिसाडघाईने नाटकात गुंफलेली आहेत. त्यांत त्याने मूळ कथानकात नसलेल्या अनेक विसंगतींची यथेच्छ भर घातलेली आहे. व्यवस्थित साचा जमलेल्या नाटकातील घटनाही अचाट असतात. त्याची काही नाटके तर परीकथांइतकीसुद्धा विश्वसनीय नाहीत. (तसाही तो आपल्या नाटकांना ‘उदरनिर्वाहाचे साधन’ यापेक्षा जास्त गंभीरपणे घेत असल्याचा कोणताही पुरावा नाही. त्याच्या प्रसिद्ध ‘सुनीतां’मध्ये आपली साहित्यिक कामगिरी म्हणून त्याने नाटकांचा साधा उल्लेखही केलेला नाही.) शेक्सपीअरबद्दलचे काही समज हास्यास्पद आहेत हे मान्य करायलाच हवे. जसे की, त्याच्या नाटकांमध्ये सुसंगत तात्त्विक भूमिका सापडतात, त्याची नाटके तांत्रिकदृष्टय़ा परिपूर्ण आहेत, त्यांच्यात मानवी मनाचा ठाव घेणारी निरीक्षणे ठासून भरलेली आहेत, इत्यादी.

टॉलस्टॉयच्या भडिमाराने खरे तर शेक्सपीअरची कीर्ती काळवंडायला हवी होती. त्याला डोक्यावर घेणाऱ्यांना आपण एका पोकळ प्रतिमेची पूजा करीत आहोत हे लक्षात यायला हवे होते. त्याच्या साहित्यात विशेष कलागुण नाहीत हे ध्यानात येऊन त्यात डुंबण्याच्या आनंदावर विरजण पडायला हवे होते; परंतु प्रत्यक्षात असे काहीही घडलेले नाही. टीकेने शेक्सपीअरच्या लोकप्रियतेवर तसूभरही परिणाम झालेला नाही; उलट ती टीकाच विस्मरणात गेली आहे. टॉलस्टॉयच्या लेखाची भाषांतरित आवृत्ती मला सारे लंडन पालथे घातल्यावर कशीबशी एका म्युझियममध्ये सापडली!

शेक्सपीअरविषयीचे बहुतेक समज निराधार असल्याचे सिद्ध करण्यात टॉलस्टॉय यशस्वी झाला खरा; पण शेक्सपीअरच्या लोकप्रियतेला धक्का पोहोचवणे त्याला साधले नाही. उलट, या लोकप्रियतेने त्याला बुचकळ्यात टाकले. त्याला प्रश्न पडला की- ‘या सुमार, खुळचट आणि नीती-अनीतीची चाड नसलेल्या लेखकाचे सदैव सगळीकडे कौतुक का होत असते?’ बराच वेळ डोके खाजवल्यावर तो या निष्कर्षांप्रत आला, की सत्याचा अपलाप करण्याचे हे एक जागतिक षड्यंत्र असले पाहिजे. अन्यथा, हा एक प्रकारचा सामूहिक भ्रम वा संमोहन असावे. या सगळ्याचा उगम त्याला एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील काही जर्मन समीक्षकांच्या ‘कारस्थानां’त सापडला. (त्याच्या मते) या मंडळींनी शेक्सपीअर श्रेष्ठ लेखक असल्याचे धादांत खोटे सांगायला सुरुवात केली आणि पुढील काळात कुणालाही या प्रकाराला विरोध करण्याचे धैर्य दाखवता आले नाही.

आता या पठडीतल्या सिद्धांताबद्दल डोक्याला त्रास करून घेण्याची गरज नाही. त्याचा निर्थकपणा उघड आहे. खरे तर टॉलस्टॉयच्या आक्षेपांची उत्तरे त्याच्या स्वत:च्याच मांडणीत दडलेली आहेत. शेक्सपीअरची लोकप्रियता एक धडधडीत वास्तव आहे. ती केवळ पुस्तकी विद्वानांपुरती मर्यादित नसून सर्वसामान्यांनाही कवेत घेणारी आहे. शेक्सपीअरची नाटके आवडीने पाहणाऱ्या बहुसंख्य प्रेक्षकांनी कोणत्याही जर्मन समीक्षकाचे नावदेखील ऐकलेले नाही. त्याच्या जीवनकालापासून शेक्सपीअरची नाटके इंग्लंडमधील रंगमंच गाजवत आहेत. केवळ इंग्रजी जाणणारेच नव्हे, तर युरोप व आशियातील असंख्य रसिक त्याचे चाहते आहेत. या सगळ्यातून एकच निष्कर्ष निघतो- शेक्सपीअरच्या साहित्यात काही तरी चांगले, शाश्वत असले पाहिजे. म्हणूनच जगभरातील लाखो लोक त्याच्या साहित्यकृतींचा पुन:पुन्हा आस्वाद घेऊ  शकले आहेत. विचारवंत म्हणून शेक्सपीअर गोंधळलेला आहे आणि त्याची नाटके अशक्यकोटीतील घटनांनी खच्चून भरलेली आहेत, हे खरेच; परंतु हे मान्य केल्यानंतरही त्याच्या कलाकृतींत काहीतरी शिल्लक राहते.

या सगळ्यातून कला आणि प्रचार यांच्यातील महत्त्वाचा फरक तर स्पष्ट होतोच, शिवाय साहित्याच्या केवळ आशय-विषयाला समोर ठेवून केलेल्या समीक्षेच्या मर्यादाही दिसू लागतात. विचारवंत आणि उपदेशक म्हणून शेक्सपीअर कुठे कमी पडतो, हे टॉलस्टॉय बरोबर ओळखतो. या बाबतीत शेक्सपीअरला कमअस्सल ठरवणे फारसे कठीण नाही; परंतु कवी म्हणून शेक्सपीअरकडे पाहिल्यास हे सगळे अप्रस्तुत ठरते. त्याच्या साहित्यातील उणिवा जाणवल्यानंतरही त्याची कला आपल्याला आनंद देत राहते.

कवी हा विचारवंत आणि उपदेशक यांपलीकडेही काही तरी असतो. प्रत्येक साहित्यकृतीला प्रचाराची बाजू (विशिष्ट विचार, मते, दृष्टिकोन आदी योग्य ठरवण्याचा प्रयत्न) ही असतेच; परंतु दीर्घकाळ रसिकांना मोहवीत राहणाऱ्या कलाकृतींमध्ये असे काही तरी असते, ज्याचा आशय आणि तात्पर्य यांच्याशी संबंध नसतो. आशय-विषयापलीकडे हे जे ‘काही तरी’ असते, त्यालाच आपण ‘कला’ म्हणतो. गहन विचार आणि उच्च नीतिमूल्ये नसतानाही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत साहित्य ‘कला’ म्हणून उत्तम असू शकते. लेखक व व्यक्ती म्हणून महान असलेल्या टॉलस्टॉयलाही शेक्सपीअरच्या बाबतीत हे खोटे ठरवता आलेले नाही, तर आणखी कोणाला ते जमेल असे वाटत नाही!

manojrm074@gmail.com