‘साहित्य संमेलन म्हणजे ग्रंथविक्री-प्रदर्शन आणि परिसंवाद- मुलाखती- कविसंमेलन यांची मेजवानीच’ असं मराठीप्रेमींना वाटत असेल तर छानच. पण मराठीचा गंधही नसणारे लोक महाराष्ट्राबाहेरच्या शहरांमध्ये हाच आनंद मोठय़ा प्रमाणावर घेत असतात.  यंदाचा ‘नवी दिल्ली विश्व पुस्तक मेळा’ येत्या मंगळवारी- १९ जानेवारी रोजी संपेल, तोवर तिथल्या अडीच हजारांहून अधिक स्टॉलना किमान पाच लाख पुस्तकप्रेमींनी भेट दिलेली असेल. तीन वर्षांपूर्वीपासून पुस्तकांचा हा आंतरराष्ट्रीय व्यापारमेळा दरवर्षीच भरतो, त्याआधी तो दर दोन वर्षांनी भरत असे. मेळा दरवर्षी केल्यानं त्याचा प्रतिसाद थंडावेल, अशा शंका घेणाऱ्यांना आकडय़ांमधूनच परस्पर प्रत्युत्तर मिळेल. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’तर्फे भरवल्या जाणाऱ्या या मेळय़ात भारतीय भाषांतल्या साहित्यिकांशी चर्चासाठी एक खास मंच राखीव असतो (त्यावर हिंदीचंच अस्तित्व अधिक दिसतं) आणि आणखी एका मंचावर, छोटय़ाबडय़ा इंग्रजी प्रकाशकांतर्फे पुस्तक-विमोचन किंवा गाजवलं जात असलेल्या पुस्तकाच्या लेखकाशी गप्पा आदी कार्यक्रम होत असतात. तरीही, या चर्चा वा गप्पांसाठी कुणी दिल्ली पुस्तकमेळ्याला जात नाही. डोळे फाटेपर्यंत पुस्तकंच पुस्तकं पाहात, नव्या पुस्तकांची माहिती मिळवत आणि कुठे आपल्याला आवश्यक वा आवडीच्या विषयाचं पुस्तक सवलतीत मिळेल का यावरही डोळा ठेवत इथे आबालवृद्ध तिकीट काढून येतात. प्रकाशक आणि विक्रेते मंडळी व्यवसायवृद्धी आणि ‘नेटवर्किंग’च्या संधी शोधतात. मराठी प्रकाशक इंग्रजी पुस्तकांचे भाषांतर हक्क मिळवतात.. आणि या प्रत्येकाला ‘ग्रंथांच्या गावात’ असल्याचं खरंखुरं समाधान मिळत असतं! इथल्या सात प्रचंड दालनांपैकी एक निव्वळ ज्योतिष, योग, धर्म आदींविषयीच्या पुस्तकांसाठी, दुसरं फक्त बच्चे कंपनीसाठी.. असा विस्तार डोळे विस्फारणाराच असतो.

साहित्यिकांशी चर्चा घडवून आणणं, पुस्तकांच्या विषयांबद्दल मंथन करणं, आणि त्या विषयांचा वास्तवाशी जो संबंध आहे त्याबद्दल इतरांनाही बोलतं करणं हे काम गेल्या दहा वर्षांत ठिकठिकाणचे ‘लिटफेस्ट’ (लिटरेचर फेस्टिव्हल) करू लागले आहेत. यापैकी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल साधेपणानं २००६ पासून सुरू झाला होता, तर हिंदू या दैनिकाचा ‘लिट फॉर लाइफ’ हा साहित्योत्सव २०१० पासून दर जानेवारीत भरतो. जयपूरनं या उत्सवांचं रूप आकर्षक केलं. खरोखरच लोकादरास पात्र ठरलेले आणि ‘नुसतेच सेलेब्रिटी’ अशा दोन्ही प्रकारच्या लोकप्रिय मंडळींचा समावेश, एकाच विषयावरली किंवा प्रकारातली पुस्तकं लिहिणाऱ्यांच्या चर्चा आणि मान्यवर लेखकांच्या प्रकट मुलाखती यांसोबत चित्रकार, गायक आणि अभ्यासू राजकारणी यांनाही या उत्सवात स्थान दिलं. कमीअधिक प्रमाणात हाच ढांचा मुंबईच्या टाटा लिटरेचर लाइव्ह फेस्टिव्हलनं ठेवला (हा मुंबईतला उत्सव ऑक्टोबरात भरतो). जानेवारी हा महिना ‘लिटफेस्ट’चा हे जयपूरच्या उत्सवानं ठरवलं आणि चेन्नईत भरणाऱ्या ‘हिंदू लिट फॉर लाइफ’नं पाळलं.

चेन्नई : १५ ते १७ जानेवारी

यंदाचा ‘हिंदू लिट फॉर लाइफ’ १५ जानेवारीपासून सुरू झाला. यंदा या सोहळ्यावर चेन्नईतल्या पुराचं सावट आहेच, ते सावटच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनाच उद्घाटनानंतरच्या प्रमुख भाषणासाठी बोलावून साजरं झालं.. श्रीनगरच्या पुराचा संदर्भ ओमर अब्दुल्लांना पाचारण करण्यामागे होता. अब्दुल्ला पुराबद्दल फार बोलले नाहीत. पण या भाषणानंतर ‘शहरांमधले पूर : श्रीनगर व चेन्नईचे धडे’ या परिसंवादानं ‘पाणथळ सुकून गेलेल्या सखल जागांमध्ये वस्ती’ हा प्रश्न जोरकसपणे मांडला. हा उत्सव गोपाळकृष्ण गांधी, सदानंद मेनन, रघु राय, लेखक-पत्रकार लायनेल श्रीव्हर अशा महनीय व्यक्तींच्या कार्यक्रमांनी पुढल्या दोन दिवसांत रंगत जाईल आणि १७ जानेवारीच्या रात्री ‘लिट फॉर लाइफ पुरस्कारा’च्या सोहळ्यानं संपेल.

जयपूर : २१ ते २५ जानेवारी

जयपूरचा लिटफेस्ट दरवर्षी गर्दीचे विक्रम ओलांडतो.. यंदा तो २१ जानेवारीपासून सुरू होतो आहे. रस्किन बाँड यांची मुलाखत हे यंदाच्या उत्सवाचं एक वैशिष्टय़. पण त्याखेरीज अफगाणिस्तानात पत्रकार म्हणून कारकीर्द केल्यावर पुस्तक लिहिणाऱ्या ख्रिस्टीना लँब, वैद्यकीय व्यवसायावर लिहिणारे डॉ. अतुल गवांदे, इंडियन एक्स्प्रेसच्या कूमी कपूर, याखेरीज सी. राजा मोहन, प्रताप भानू मेहता, विवेक देबरॉय यांसारखे विश्लेषक, गाजलेल्या ब्रिटिश कादंबरीकार मार्गारेट अ‍ॅटवूड, ‘हिंदू लिटलाइव्ह’साठीही येणारच असलेले अलेक्झांडर मॅक्कॉल स्मिथसारखे भारतप्रेमी विदेशी लेखक, किंवा अमिश, देवदत्त पटनाईक यांच्यासारखे लोकप्रिय चेहरे, अशांचा समावेश यंदा असेल. गुलजार, बशारत पीर, पवन वर्मा, अलका पांडे यांची उपस्थिती दर जयपूर लिटफेस्टला असतेच, ती यंदाही असेल.

परिसंवादांचे विषय पुस्तकांची प्रसिद्धी होईल असेच ठेवायचे, ही या सर्वच लिटफेस्टमधील खेळी असते. मात्र त्यावर फार टीका करण्यातही अर्थ नसतो, कारण विषय मुळात चर्चा करण्याजोगे आहेत म्हणूनच तर त्यावर पुस्तके लिहिली गेलेली असतात! या सर्वच लिटफेस्टांतून ललितेतर गद्य या प्रकाराला मिळणारे महत्त्व मात्र, वादातीत असते.

कोलकाता : २५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी

दिल्लीच्या पुस्तक मेळ्याचा इतिहास १९७२ सालापासूनचा, तर कोलकात्याचा ‘बोईमेला’ (बोई म्हणजे बंगालीत पुस्तक!) १९७४ साली सुरू झाला. दोन्ही मेळे तुल्यबळच. पण कोलकात्याच्या मेळय़ात ग्रंथविक्री आणि साहित्यप्रेम या दोहोंना भरतं आलेलं असायचं. ‘ते दिवस आता गेले’ असं अनेक बंगालीजन म्हणतात. कुणीही यावं, मेळ्यात मोक्याची जागा धरून उभं राहावं, काव्यगान सुरू करावं आणि लोकांनी त्याला दाद द्यावी, असा माहौल इथं १९८०च्या दशकापर्यंत असायचा. १९९७ साली मोठी आग लागली म्हणून, नाहीतर इथेच चहाकॉफी, विडय़ासिगारेटी यांच्या साथीनं बौद्धिक अड्डे रंगत. ते सारं आता इतिहासजमा झालं, पण ‘बोईमेला’ आकारानं वाढला आणि खऱ्या अर्थानं ‘आंतरराष्ट्रीय’सुद्धा झाला.

नुसती ग्रंथविक्री आणि व्यापार यांच्यासाठी हा मेळा नाही, हे कोलकात्यानं जणू आधीपासूनच ठरवलं होतं. पण व्यापारी बाजूच अधिक भक्कम होत गेली. ते लक्षात आल्यावर अखेर, २०१४ पासून हा मेळादेखील ‘लिटफेस्ट’ पद्धतीला शरण गेल्याचं दिसतं. मेळ्याला जोडूनच ‘लिटरेचर फेस्टिव्हल’सुद्धा सुरू झाला. त्याच्या यंदाच्या तिसऱ्या वर्षी अमर्त्य सेन, सुधा मूर्ती, प्रकाश बेलवडी, आदी मानकरी आहेत.