21 October 2018

News Flash

मलूल व्यवसाय, उत्साही जत्रा

‘न्यू दिल्ली वर्ल्ड बुक फेअर’ ही वाचक, ग्रंथप्रेमी आणि एकूणच प्रकाशन व्यवहारासाठी एक पर्वणी असते.

प्रतिनिधिक छायाचित्र

दिल्लीत १४ जानेवारीपर्यंत सुरू असलेल्या ‘वर्ल्ड बुक फेअर’ या वार्षिक ग्रंथमेळ्यात वाचकांचा निखळ उत्साह दिसतो तसेच प्रकाशनव्यवहाराचे प्रतिबिंबही दिसते. यंदाच्या ग्रंथमेळ्यातील निरीक्षणो काय सांगतात?

‘न्यू दिल्ली वर्ल्ड बुक फेअर’ ही वाचक, ग्रंथप्रेमी आणि एकूणच प्रकाशन व्यवहारासाठी एक पर्वणी असते. देशविदेशांतील तसेच इंग्रजी, हिंदीसह विविध प्रादेशिक भाषांमधील प्रकाशक व वितरकांचे स्टॉल्स येथे नऊ दिवस सज्ज असतात. दिल्लीतील विस्तिर्ण प्रगती मैदानावर भरणारा हा ‘बुकफेअर’ म्हणजे खऱ्या अर्थाने एक भव्य जत्राच. जत्रेत अनुभवतो तसे उत्साही वातावरण आपण इथेही अनुभवू शकतो. यंदाचा बुकफेअर ‘पर्यावरण आणि हवामान बदल’ या सूत्राभोवती गुंफला गेला आहे.

नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) ही या पुस्तक जत्रेची आयोजक संस्था. अत्यंत सुनियोजित पद्धतीने या पुस्तक जत्रेचे आयोजन केले जाते. कोलकाता बुक फेअरनंतर हा भारतातील दुसरा सर्वात मोठा ‘बुकफेअर’. वर्षांगणिक अधिकाधिक समृद्ध होत गेलेली ही जत्रा २०१२ पर्यंत एक वर्षांआड भरे, ती आता दरवर्षी भरते. प्रगती मैदानावर भव्यदिव्य विभागनिहाय हॉलमध्ये प्रकाशक-वितरक त्यांच्याकडील ग्रंथखजिना विशेष सवलतींसह मांडत असतात. त्यामुळे ग्रंथप्रेमी व्यक्तींसह शिक्षण संस्था, ग्रंथालय वितरक यांची पुस्तक खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडत असते. नऊ दिवसांच्या कालावधीत दोन रविवार येतील अशा पद्धतीने तारखांचे बुकफेअरचे नियोजन केले जाते. यंदा ६ जानेवारीला सुरू झालेल्या बुकफेअरची १४ रोजी सांगता होणार आहे. मागच्या रविवारी (७ जानेवारी) एक लाखाहून अधिक ग्रंथप्रेमींनी येथे भेट दिल्याचे सांगितले जाते.

पुस्तक खरेदीबरोबरच विविध ठिकाणी सुरू असलेल्या साहित्यिक कार्यक्रम व चर्चानाही दर्दी वाचक हजेरी लावताना दिसतात. प्रगती मैदानात थीम पॅव्हेलियन, युरोपियन युनियन पॅव्हेलियन, चिल्ड्रन्स पॅव्हेलियन, सेमिनार हॉल, लेखक मंच, साहित्य मंच अशा ठिकाणी दिवसभर कार्यक्रम सुरू असतात. या कार्यक्रमांना दररोज प्रकाशित होणाऱ्या ‘मेला वार्ता’ या अंकातून प्रसिद्धी देण्यात येते. शिवाय आवडत्या लेखकांशी चर्चा, भेटीगाठी, पुस्तकावर लेखकाची स्वाक्षरी घेण्यासाठीदेखील हौशी पुस्तकप्रेमी गर्दी करताना दिसतात. ललित-ललितेतर, वैचारिक, विज्ञान-तंत्रज्ञान, आंतरविद्याशाखीय, पाठय़पुस्तके, आध्यात्मिक व धार्मिक अशा विविध विषयांतील पुस्तकांचे प्रकाशक व विविध संस्थादेखील आवर्जून येथे सहभागी होत असतात.

भारतात दिल्ली व कोलकाता या दोन शहरांचा अपवाद वगळता एवढय़ा भव्य पद्धतीचे ‘बुक फेअर’ अन्यत्र होत नसल्याने देशविदेशांतील सर्व महत्त्वाच्या प्रकाशन संस्था येथे आवर्जून हजेरी लावतात. ग्रंथप्रेमीसुद्धा देशभरातून आणि शेजारी देशांमधूनही येथे भेट देत असतात.

आम्ही काही सहकारी मागील सहा-सात वर्षांपासून या पुस्तक जत्रेला जातो आहोत. त्यामुळे काही प्रकाशकांशी संवाद हा ठरलेलाच.  त्यातून प्रकाशनविश्वातील अंतर्गत घडामोडी, अडचणी व खदखदही समजते. ‘मनोहर प्रकाशन’चे अजय जैन यांची प्रतिक्रिया प्रातिनिधिक होती. त्यांच्या वडिलांनी वयाच्या २५ व्या वर्षी व्यवसाय सुरू केला. आज ते ७५ वर्षांचे आहेत. पन्नास वर्षे प्रकाशन व्यवसाय केल्यानंतर आता हा व्यवसाय बंद करून दुसरे काही करण्याच्या विचारापर्यंत ते आले आहेत. प्रकाशन खर्च वाढल्याने पुस्तकांच्या किमतीही वाढल्या; परिणामी पुस्तक खरेदीही घटली. कमीअधिक फरकाने लहान व मध्यम आकाराच्या सर्वच प्रकाशनांची हीच गत आहे. नोटबंदीच्या तडाख्यापासून ग्रंथबाजारात मंदी आहे. शिवाय वस्तू व सेवा कराचाही (जीएसटी) फटका गतवर्षी प्रकाशकांना बसला. थेटपणे पुस्तकांवर जीएसटी नसला, तरी पुस्तक प्रकाशन प्रक्रियेतील प्रत्येक घटकावर हा कर लागू आहे. शिवाय जीएसटीच्या अंमलबजावणीतील गोंधळामुळे, अनेक बाबतींत स्पष्टता नसल्याने २०१७ सालात प्रकाशित पुस्तकांची संख्या कमालीची घटल्याचे जाणवले. परिणामी नियमित पुस्तक जत्रेला भेट देणाऱ्यांची खरेदीही कमी झाली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. नोटाबंदी व जीएसटीने प्रकाशन व्यवसायाचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) शिक्षण संस्था व ग्रंथालयांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात कमालीची कपात झाल्यानेही संस्थात्मक खरेदी खालावल्याची तक्रार सर्वच प्रकाशक करतात. यंदा तर ‘सेज’, ‘ऑक्सफर्ड’, ‘पेंग्विन’ यांसारख्या मोठय़ा प्रकाशनांचे स्टॉलदेखील मागील वर्षांच्या तुलनेने लहान होते.  ‘केंब्रिज’ व ‘रूपा’ यांसारख्या प्रकाशकांची अनुपस्थितीदेखील या वर्षी जाणवली. लहान व मध्यम प्रादेशिक प्रकाशनांना प्रगती मैदानात स्टॉल लावण्याचा खर्च व नऊ  दिवसांत होणारी विक्री यांचा अंदाज बांधून किमान काही नफा हातात राहील की नाही याची चिंता असते. मराठीतील एकाही प्रकाशनाचा स्वतंत्र स्टॉल या पुस्तक जत्रेत नसतो, यावरून आपल्याला मराठी प्रकाशकांच्या अडचणी ध्यानात येऊ शकतील. एनबीटी प्रत्येक प्रादेशिक भाषेतील प्रकाशक संघाला एक स्टॉल मोफत पुरवीत असते. त्यात अ. भा. मराठी प्रकाशक संघाचा एक लहान स्टॉल होता. त्यात काही आघाडीच्या मराठी प्रकाशनांची मोजकीच पुस्तकं होती. इंटरनेटचा वाढता वापर, ई-बुक्स, किंडल यांसारख्या नव्या पर्यायांमुळे प्रकाशन व्यवसायासमोरच्या अडचणींमध्ये भर पडत आहे. या सर्व घटकांचा परिणाम यंदाच्या बुक फेअरवर जाणवत होता.

असे असले तरी लेखकांशी केले जाणारे करार, विविध भाषांमधून अनुवादासाठीचे करार, नव्या लेखकांच्या भेटीगाठी अशा सकारात्मक बाबीही घडत असतातच. नवे वाचक, नवे लेखक घडविणे आणि वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्याच्या प्रक्रियेला ग्रंथजत्रांतून नवसंजीवनी मिळत असते, हे वास्तव डोळेझाक करून चालणार नाही. आगामी काळात प्रकाशन व्यवसायासमोरील अडचणी कमी होऊन वाचनव्यवहार अधिक समृद्ध झाला, तरच ‘बुक फेअर’ ही प्रक्रिया व संकल्पना वर्धिष्णु राहील.

भारत अमृतराव पाटील bharatua@gmail.com

First Published on January 13, 2018 1:35 am

Web Title: world book fair 2018 continue till january 14 in new delhi