News Flash

अविस्मरणीय, मध्यमवर्गीय डिकन्स

ब्रिटिश कादंबरीकार चार्ल्स डिकन्सचा आज स्मृतिदिन...

डिकन्सच्या लिखाणाची चिकित्सा करणारे

|| डॉ. मनोज पाथरकर

ब्रिटिश कादंबरीकार चार्ल्स डिकन्सचा आज स्मृतिदिन. त्याच्या विविधरंगी साहित्याची आठवण करून देणारा जॉर्ज ऑर्वेलकृत समीक्षात्मक निबंधाचा हा सारांशानुवाद..

डिकन्ससारखा लेखक सर्वानाच ‘आपल्यापैकी’ वाटतो- मग ते क्रांतिकारक असोत, कॅथलिक धर्माचे पाईक असोत किंवा कामगारांचे कैवारी असोत. पक्का मध्यमवर्गीय (बूज्र्वा) असूनही डिकन्स प्रतिप्रश्न करणारा, परिवर्तनवादी आणि बंडखोर लेखक होता. ‘ऑलिवर ट्वीस्ट’, ‘हार्ड टाइम्स’, ‘ब्लीक हाऊस’, ‘लिट्लि डॉरिट’ यांसारख्या कादंबऱ्यांतून त्याने इंग्लंडमधील वेगवेगळ्या संस्था-व्यवस्थांवर ज्या तीव्रतेने हल्ला चढविलेला आहे, तसे नंतर कुणालाही साध्य झालेले नाही. मात्र त्याच्या टीका करण्याच्या विलक्षण पद्धतीमुळे त्या टीकेचे लक्ष्य असणाऱ्यांनीच त्याला असे स्वीकारलेले आहे, की तो स्वत:च एक संस्था झालाय!

डिकन्स ‘काय आहे?’ हे समजून घेण्यासाठी, तो ‘काय नाही?’ इथून सुरुवात करणे योग्य ठरेल. डिकन्स ‘कामगारवर्गा’चा लेखक नाही. त्याच्या कथानकांमधील मुख्य पात्रे लंडनच्या व्यापारी मध्यमवर्गाशी संबंधित असतात. उदा. वकील, कारकून, कारागीर, खाणावळींचे मालक, विक्रेते आणि नोकर. त्याने चितारलेल्या शेतमजुरांच्या किंवा कारखान्यातील कामगारांच्या व्यक्तिरेखांना श्रमिकवर्गाचे प्रतिनिधी म्हणण्यात अर्थ नाही. डिकन्स ‘क्रांतिकारी’ लेखकही नाही; ‘काय बदल घडला पाहिजे’ याचा तो फारसा विचार करीत नाही. प्रचलित न्यायव्यवस्था, संसदीय लोकशाही, शिक्षणव्यवस्था, इत्यादींवर टीका करताना तो त्या जागी कशा प्रकारची व्यवस्था असावी हे सुचविण्याच्या फंदात पडत नाही. त्याची समाजावरील टीका ‘नैतिक’ भूमिकेतून असल्याने तिचा रोख मानवी ‘स्वभावा’कडे आहे. अर्थात, साहित्यकृतींमधून तो जुलमी व्यवस्थेलाही लक्ष्य करतो. परंपरांशी बद्ध असलेल्या जुन्या व्यवस्थेतील राजे, जमीनदार, पुरोहित, राष्ट्रवादी, सैनिक, विचारवंत, इत्यादींचा डिकन्सला मनस्वी राग आहे. या वर्गाची नजर भूतकाळावरच खिळलेली असल्याने समाजाच्या ‘प्रगती’ची प्रक्रिया संथ आणि निराशाजनक होऊन जाते, असे त्याला वाटते.

डिकन्स अर्थव्यवस्थेवर एक व्यवस्था म्हणून कधीच टीका करीत नाही; वाचक मात्र तसा निष्कर्ष काढू शकतात. उलट त्याच्या कादंबऱ्यांमध्ये वारंवार येणारे पात्र म्हणजे भला श्रीमंत माणूस- व्यापाराशी संबंधित, दयाळू आणि जाईल तिथे सढळ हस्ते लोकांना मदत करणारा. राजकारण आणि संसदीय व्यवस्थेवरही डिकन्सचा विश्वास नाही. कामगार संघटनांना तर त्याचा विरोधच आहे. कामगारांना चांगली वागणूक मिळायला हवी, असे त्यालाही वाटते. पण त्यांनी आपले भवितव्य हिंसक मार्गानी आपल्या हातात घेणे त्याला मान्य नाही. ‘अ टेल ऑफ टू सिटीज्’ वाचल्यावर लक्षात राहते ते गिलोटिनच्या खडखडाटातील ‘दहशतीचे राज्य’! फ्रेंच राज्यक्रांतीची अपरिहार्यता डिकन्सच्या लक्षात येते; परंतु कोणतीही ‘क्रांती’ हे त्याला आपल्याच साधनांना गिळंकृत करणारे जुलमाचे अपत्य वाटते. एकोणिसाव्या शतकातील बालमजुरीच्या सामाजिक कलंकाबद्दलही डिकन्स फारसे लिहीत नाही. त्याच्या कादंबऱ्यांमधील मुलांचा खडतर अनुभव खाणी किंवा सूतगिरण्या यांच्यातील श्रमांच्या ओझ्याशी नव्हे, तर शाळेशी संबंधित असतो. गुणी अथवा हुशार मुले बाटल्यांना लेबले लावताना दिसणे त्याला मान्य नाही. पण ‘कुणाही’ मुलाच्या वाटय़ाला अशी शिक्षा येऊ  नये, असे तो कुठेच म्हणत नाही. हिंसा आणि राजकारण यांच्याशिवाय समाजपरिवर्तन फक्त शिक्षणाच्या मार्गाने होऊ  शकते. शिक्षणाचे हे महत्त्व लक्षात घेऊन डिकन्स प्रचलित शिक्षणसंस्थांवर कोरडे ओढताना दिसतो. एकीकडे, ग्रीक शब्दसंपत्ती आणि छडी यांच्यावर भर देणाऱ्या व्यवस्थेतला फोलपणा त्याला जाणवतो. तर दुसरीकडे, ‘वास्तवा’वर काटेकोरपणे बेतलेले आधुनिक शिक्षणही त्याला कुचकामी वाटते.

शहरी मध्यमवर्गीय माणसाचा डिकन्स एक दुर्मीळ आणि उत्तम नमुना आहे. या वर्गाचा सगळ्यात मोठा दोष (आणि गुणसुद्धा!) म्हणजे त्यांचा मर्यादित दृष्टिकोन. लंडनसारख्या महानगरातील मध्यमवर्गीयांकडे पाहिल्यास हे लगेच लक्षात येते. मध्यमवर्गीय जगाबाहेरच्या गोष्टी त्यांच्यासाठी हास्यास्पद नाही तर काहीशा वाईटच ठरतात. त्यांचा ना मातीशी संबंध असतो ना यंत्रांशी. नखशिखान्त सभ्य असलेला हा वर्ग खरीखुरी निर्मितीक्षम कामे करणारा नसतो. ग्राहक म्हणून उपभोग घेणे त्यांना व्यवस्थित जमते. शासकवर्गाच्याही ते फारसे निकट नसतात. त्यांच्या दृष्टीने ‘सरकार’ म्हणजे आयुष्यात लुडबुड करणारे काही तरी असते. प्रत्येक गोष्टीकडे वैयक्तिक यशापयशाच्या मोजपट्टीने पाहणाऱ्या या वर्गाला समाजाच्या अस्तित्वाचीदेखील फारशी जाणीव नसते. तसा डिकन्सला गरिबीचा अनुभव होता, परंतु समाजव्यवस्थेमुळे पिचलेल्या बहुजनांशी त्याचा कधीच संबंध आला नाही. गुन्हेगारीपासून दूर राहून जगणाऱ्या कष्टकऱ्यांचे तो मनापासून कौतुकच करतो. मात्र त्यांना तो बरोबरीचे स्थान देताना दिसत नाही. स्त्री-पुरुष संबंधाचे चित्रणही तो मध्यमवर्गीय दृष्टिकोनातूनच करतो.

डिकन्सच्या कादंबऱ्यांत ‘श्रम’ हे काही तरी पडद्यामागे घडणारे असते. दैनंदिन व्यवसायांभोवती त्याला कथानक गुंफता येत नाही. म्हणूनच शब्दकोडय़ांसारखे उभे-आडवे योगायोग, कट-कारस्थाने, खून, वेषांतर, पुरलेली मृत्युपत्रे, जत्रेत हरवलेला भाऊ  अशा गोष्टींचे जंजाळ त्यांत दिसते. ‘पुरोगामी आणि परिवर्तनवादी’ डिकन्सची यंत्रांबद्दलची उदासीनताही थक्क करून सोडणारी आहे. तितकीच आश्चर्यकारक (चांगल्या अर्थाने) गोष्ट म्हणजे सवंग राष्ट्रवादाची भावना त्याच्यात अजिबात दिसत नाही. सैनिकी परंपरा आणि साम्राज्यवाद यांचेही त्याला फारसे आकर्षण नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल त्याचा स्वत:चा असा कोणताही दृष्टिकोन नाही. खरे सांगायचे तर, डिकन्समध्ये भविष्याच्या जाणिवेचाच अभाव आहे. शास्त्रीय बैठकच नसल्याने त्याला कोणत्याही प्रकारच्या रचनात्मक नवनिर्मितीचा दृष्टिकोन स्वीकारणे कठीण जाते. सरंजामी शेतीवर आधारित भूतकाळाला विरोध करताना औद्योगिक वर्तमानाचे पुरेसे भान त्याला नाही. त्याच्याकडे अचूक नैतिक जाण आहे हे खरे; परंतु वैचारिक कुतूहलाचा अभाव आहे.

डिकन्सचे बहुतांश लेखन वास्तववादी असते. शब्दांच्या वापरातून डोळ्यांसमोर दृश्य प्रतिमा उभी करण्यात कुणीच त्याची बरोबरी करू शकलेले नाही. डिकन्सने केलेले एखाद्या गोष्टीचे वर्णन वाचल्यानंतर तुम्ही ते आयुष्यभर विसरू शकत नाही. पण वस्तूंच्या बाह्य रूपांबद्दलचे त्याच्या प्रतिमांमधले बारकावेच एका न्यूनाकडे निर्देश करतात. कारण शेवटी हे वर्णन एका निरुद्देश ‘बघ्या’सारखे असते- बाह्य तपशील विलक्षणरीत्या टिपलेले असले तरी त्यामागची प्रक्रिया हातून निसटलेली असते. बऱ्याचदा कृत्रिम लेखन करणारा डिकन्स मनाच्या अनेक कप्प्यांना स्पर्शही करीत नाही. काव्यात्म जाणिवेचा अभाव असल्याने खरीखुरी शोकांतिका त्याच्या कुवतीबाहेर असल्याचे दिसते.

डिकन्सला नेहमीच खुणावणारी गोष्ट म्हणजे बालपण! इंग्रजी साहित्यात कुणीही लहान मुलांच्या अनुभवांबद्दल त्याच्याइतके सुंदर लिहिलेले नाही. नऊ  वर्षांचा असताना मी त्याची ‘डेव्हिड कॉपरफील्ड’ वाचली तेव्हा छोटय़ा डेव्हिडच्या मनातले वातावरण मला अगदी जवळचे वाटले. ती प्रकरणे लहान मुलानेच लिहिलेली असल्याची माझी खात्री पटली. शाळेपासून पुन:पुन्हा भेटत राहिलेल्या लेखकांपैकी एक असल्याने डिकन्स लहानपणीच्या आठवणींचा भाग होऊन जातो. कोणत्या ना कोणत्या संदर्भात त्याचे शब्द आणि पात्रे आठवत राहतात. त्याची तपशीलवार वर्णने आणि शब्दरचनेच्या लकबी कधीही विसरणे शक्य नाही. विशेषत: त्यातला ‘अनावश्यक तपशील’! काही तरी शिकविण्याचा प्रयत्नच डिकन्सला नावीन्यपूर्ण दृष्टी देतो. कारण उत्तम निर्मितीमागे ‘चिंता करितो विश्वाची’ ही भावना असते. डिकन्स-शैलीतला सुदृढ प्रस्थापितविरोध कामगारवर्गाच्या समाजवादी चळवळी आणि साम्राज्यवादविरोधी आंदोलने यांचा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे. डिकन्स आपल्याला १९व्या शतकातील उदारमतवाद, मुक्त बुद्धिमत्ता आणि प्रतिभा यांची आठवण करून देतो. त्याच्यासारख्या इंग्रजी कादंबरीकारांकडे पाहिल्यावर प्रकर्षांने जाणवते, की त्यांना भोवतालचे जग आपले वाटत होते. मात्र आजचा लेखक आपल्या भवतालापासून इतका तुटलेला आहे, की आधुनिक कादंबरी ही केवळ कादंबरीकाराबद्दलची कादंबरी ठरते.

समाजाची ‘रचना’ बदलली की सगळे प्रश्न सुटतील, असा बहुसंख्य क्रांतिकारकांचा सरळसोट दृष्टिकोन डिकन्सकडे नसल्याने तो संदिग्ध लिहितो. पण हीच संदिग्धता त्याला सार्वकालिक बनविते. नेहमीच दबलेल्यांची बाजू घेण्याचे ठरविल्याने दबलेला जेव्हा सत्ता गाजवू पाहतो तेव्हा डिकन्स त्याच्याही विरोधात जातो. कधी कधी वाटते की, एक कादंबरीकार म्हणून डिकन्सची उपजत निर्मितीक्षमताच त्याला अडथळा ठरतेय. कारण विडंबन करण्याच्या उपजत वृत्तीला मुरड न घालता आल्याने तो गंभीर प्रसंगांचा विचका करतो. परंतु दुसरीकडे, आपल्या मर्यादा ओलांडण्याचा तो सतत प्रयत्न करतोय हेही जाणवते. आणि तरीही तो आपल्याला व्यंगचित्रकारच वाटत राहतो. यातच त्याची ‘दैवी प्रतिभा’ सामावलेली आहे, असे मला कधी कधी वाटते. टॉलस्टॉयसारखा लेखक आपल्याला माणसाबद्दल इतके काही सांगून जातो, की त्याची जीवनाची समज आश्चर्यकारक वाटते. स्वत:ला घडविण्यासाठी सतत संघर्ष करणारी त्याची पात्रे त्या संघर्षांतूनच परिपक्व होत जातात. याउलट डिकन्सची पात्रे आधीच पूर्णपणे ‘तयार’ असतात. पण म्हणून टॉलस्टॉय डिकन्सपेक्षा श्रेष्ठ कादंबरीकार ठरत नाही.. अर्थात, अशी तुलनाच मुळात निर्थक आहे; दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. टॉलस्टॉयच्या साहित्यकृती प्रदीर्घ काळानंतरही व्यापक स्तरावर लक्षवेधक ठरतात. तर डिकन्स सहजगत्या अतिसामान्यांपर्यंत पोहोचू शकतो, जे टॉलस्टॉयला कधीही साध्य होत नाही!

manojrm074@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 2:05 am

Web Title: writer charles dickens
Next Stories
1 बिल क्लिंटन यांचे नवे रहस्य
2 राष्ट्राच्या अस्मितेतले अंतर्विरोध..
3 कातळातील कामाविष्कार..
Just Now!
X