आंतरराष्ट्रीय कथात्म साहित्यात रस असणाऱ्या वाचनवर्तुळात गेले अख्खे वर्ष घुसळण झाली ती ख्रिस्टिन रुपेनियन या अमेरिकी लेखिकेच्या ‘कॅट पर्सन’ या कथेची! विषय, आशय आणि लेखनाचा घाट या सर्वच पातळ्यांवर अफाट रिपोर्ताजसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिकात ही कथा प्रसिद्ध होईपर्यंत रुपेनियन अनेकांच्या खिजगणतीतही नव्हती. कथाप्रसिद्धीनंतर मात्र या साप्ताहिकाच्या शतकी परंपरेत बुकर, पुलित्झर ते नोबेल पुरस्कारापर्यंत गवसणी घातलेल्या कुणाही लेखकाच्या कथेला मिळाली नाही, इतकी लोकप्रियता या लेखिकेकडे आपसूक चालून आली. हार्वे वाइन्स्टिनच्या कुकर्माना उघड करणाऱ्या ज्या लेखामुळे हॉलीवूडमध्ये ‘मी टू’ चळवळ उग्र झाली, त्या लेखानंतर दुसऱ्या क्रमांकाची वाचकसंख्या ‘न्यू यॉर्कर’मध्ये या कथेला लाभली. रुपेनियनच्या या कथेसह तिच्या इतर कथांचा संग्रह ‘यू नो यू वॉन्ट्स धिस’ या आठवडय़ात प्रकाशित झाला.

जस्टिन बिबर किंवा ‘गंगनम स्टाईल’ गाण्याने एका रात्रीत सुपरस्टार झालेल्या कोरियन गायक साय यांच्यासारखी ख्रिस्टिन रुपेनियन जागतिक साहित्याच्या क्षेत्रात ‘व्हायरल’ व्यक्ती झाली अन् वाचन या वेळ आणि बुद्धी वापरावी लागणाऱ्या क्षेत्रातही व्हायरल स्टार होऊ शकतात, हे तिच्या निमित्ताने समोर आले. समाजमाध्यमांतून वाचक आणि अवाचक अशा साऱ्यांनी या कथेला लोकप्रिय बनवण्याचा विडाच उचलला होता.

समाजमाध्यमांतून ओळखीचे रूपांतर एका रात्रीच्या ‘बेडशीप’पर्यंत गेलेल्या तरुणीची उघडीवाघडी कथा त्यातील प्रणय दृश्यांसाठी गाजलीच; पण त्या साऱ्या प्रकाराकडे पाहणाऱ्या स्त्री-पुरुषी वृत्तींच्या आदिम ते आधुनिकपणाचा समाचार घेणारी म्हणूनही ती ओळखली गेली. समाजमाध्यमांवर सुरुवातीला ही कथा पसरवणारे सामान्य वाचकच अधिक होते. मात्र, या कथाप्रसारी संप्रदायाची व्याप्ती इतकी वाढली, की महिन्याभराच्या आतच ‘कॅट पर्सन’ची दखल अमेरिकी राष्ट्रीय माध्यमांना घ्यावी लागली. त्यानंतर देशोदेशीची साहित्यवर्तुळे आणि चिकित्सकांसह फुटकळ कथारसिकांपर्यंत या कथेचा गवगवा वणव्यासारखा पसरत गेला.

मुद्दा एका विशिष्ट कथेच्या लोकप्रियतेचा नाही, तर एकूण वाचनाभिसरणच कमी झालेल्या आणि ‘कथनसाहित्य हल्ली फार कुणी वाचतच नाही’ हा गजर वाजत असणाऱ्या काळात काही महिने ‘कॅट पर्सन’ या कथेचा अव्याहत प्रसार होत राहण्याचा आहे. (अगदी या महिन्यातही या कथेच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन नव्या वाचकांची संख्या वाढतच चालली आहे.) या कथेनंतर प्रकाशकांशी कैक लाख डॉलर्सचा करार करून रुपेनियन श्रीमंत लेखकांच्या पंगतीत जाऊन बसली. हा आर्थिक भाग आणि त्यातल्या सुरस गोष्टींपलीकडे अमेरिकी साहित्यव्यवहारात कथावाचनाकडे (आधी होते त्याहूनही) अधिक लोक आकर्षित झाले, हे महत्त्वाचे!

केवळ या कथेवर कित्येक ऑनलाइन संकेतस्थळांनी चर्चा घडवल्या. या कथेच्या अभिवाचनापासून रसग्रहण शिबिरांपर्यंत उपक्रम राबवले गेले आणि कथात्म साहित्यावर पदवी घेणाऱ्या अभ्यासकांपासून या साहित्य प्रकारावर प्रेम करणाऱ्या पत्रकार-लेखकांपर्यंत अनेकांनी आपापल्या आवडीच्या कथालेखकांच्या सर्वोत्तम कथांची उजळणी करणारे लेख विविध ठिकाणी लिहिले. स्त्रीवादी लेखिकांनी या कथेच्या ताकदीच्या आणि या कथेसारखीच वळणे असलेल्या इतर लेखिकांच्या कथांच्या आठवणी काढल्या आणि गेल्या शतकभरातील बंडखोर अमेरिकी लेखिकांच्या लिखाणाची घाऊक पातळीवर चिकित्सा झाली. दरएक अमेरिकी संकेतस्थळे, स्त्री-मासिके/साप्ताहिके ‘कथा’ या साहित्य प्रकाराची नव्याने पडताळणी करीत होते. प्रकाशकांचा कथासंग्रह काढण्याचा उत्साह वाढला होता व ग्रंथगृहांपासून ते अमेझॉनपर्यंत कथासंग्रह मागणीत वाचकटक्का वाढला होता.

हे सगळे झाले, कथालेखनाची आणि प्रकाशनाची परंपरा अबाधित असणाऱ्या अमेरिकेमध्ये, जिथून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचणारी डझनभर नियतकालिके आहेत. ‘न्यू यॉर्कर’ ते ‘प्लेबॉय’पर्यंत दर अंकातून कथा छापली, वाचली आणि वाचकपत्रांसह चर्चिली जाते. तसेच त्यांच्या जोडीला विविध राज्यांची, विद्यापीठांची मासिके कथाव्यवहार जपत आणि विकसित करत आहेत. दर वर्षी ‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरीज्’ आणि ‘ओ हेन्री प्राइज स्टोरीज्’चे खंड छोटय़ा मासिकांमध्ये छापून आलेल्या शेकडो कथांमधून निवडून एकत्रित होत आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘क्रिएटिव्ह रायटिंग’ हा स्वतंत्र विषय उपलब्ध आहे. ग्रंथालये कथासंग्रहांच्या मुद्रित आणि तांत्रिक आवृत्त्यांनी (डिजिटलायज्ड्) समृद्ध आहेत. वाचकांची मंडळेही आहेत अन् तिथे तावातावाने वाद घालणारी कथाचूषक मंडळीही आहेत!

इतक्या साऱ्या कथाप्रसारास पूरक वातावरणात आणि भारताहून अंमळ अधिक टेक्नोसॅव्ही व समाजमाध्यमव्याप्त वाचकांच्या गराडय़ात ‘कॅट पर्सन’चे अभिसरण व त्यावरच्या चर्चाचर्वणाकडे पाहताना खंत वाटते, ती आपल्याकडे असलेली समृद्ध कथासाहित्याची परंपरा नव्वदोत्तर काळात उत्तरोत्तर आटत गेल्याची!