कृष्णा खोऱ्यातील न्याय्य हक्काच्या पाण्यासाठी सातत्याने झगडणाऱ्या उस्मानाबादकरांची तहान सध्या टँकरच्या पाण्यावर विसंबून आहे. जिल्ह्यातील ७३१ गावांपकी तब्बल ४४२ गावांची दारोमदार टँकर आणि अधिग्रहित करण्यात आलेल्या िवधन विहिरींवर आहे. ग्रामीण भागाबरोबरच उस्मानाबादसह कळंब, तेर, शिराढोण, ढोकी या मोठय़ा गावांना पाणीटंचाईने विळखा घातला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र पाण्यासाठी दारोदार भटकण्याची वेळ उस्मानाबादकरांवर येऊन ठेपली आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभीच जिल्ह्यातील १२७ प्रकल्पांमध्ये केवळ ०.७२ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.
मागील चार वर्षांपासून पावसाच्या प्रमाणात झपाटय़ाने बदल झाला आहे. कधी अतिवृष्टी, कधी गारपीट तर कधी जेमतेम पाऊस असे चित्र मागील चार वर्षांपासून असल्याने जिल्ह्यातील पाणीपातळी झपाटय़ाने घटली आहे. जिल्ह्यातील साठवण तलावात पाणी कमी आणि गाळ जास्त असल्यामुळे सध्या अनेकांच्या वाटय़ाला गाळयुक्त पाणी येत आहे. सर्वच साठवण तलावातील पाणीसाठे मृत पाणीपातळीच्या खाली गेल्याने आगामी १५ दिवसांत सर्व साठवण तलाव कोरडेठाक पडण्याची शक्यता पाटबंधारे विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मागील वर्षी साठवण तलावात शिल्लक असलेल्या थोडय़ाबहुत पाण्याचे बाष्पीभवन थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले गेले. यंदा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पाण्याचा सगळीकडेच ठणठण गोपाळ सुरू आहे.
मागील वर्षी मार्चच्या सुरुवातीला जिल्ह्यातील १०२ प्रकल्पांमध्ये सुमारे १० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. भविष्यातील गांभीर्य लक्षात घेऊन १० प्रकल्पांमधील बाष्पीभवन थांबविण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या गेल्या. त्यासाठी ३० लाख रुपये खर्च करून नळदुर्ग येथील कुरनूर (बोरी), खंडाळा, अचलेर, कोळसूर, तामलवाडी, नंदगाव, चोराखळी, बेन्नीतुरा, हरणी या प्रकल्पातील पाणी संरक्षण करण्यात आले. त्यातून ३६ लाख हजार लिटर पाणीबचत झाल्यामुळे परिसरातील गावांची तहान भागली होती. यंदा पावसाने चक्क पाठ फिरवली. भूम व तुळजापूर तालुक्यांतील काही प्रकल्प वगळता जिल्ह्यातील जवळपास पाणीसाठा जोत्याखाली आहे.
अपुरा पाऊस, भविष्यातील पाणीटंचाई या अनुषंगाने पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी यंदा अजिबात प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे शिल्लक असलेल्या पाणीसाठय़ाची पातळी बाष्पीभवनामुळे झपाटय़ाने तळ गाठू लागली आहे. १२७ प्रकल्पांत सुमारे ०.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ८४ प्रकल्पांनी सध्या तळ गाठला आहे. ३५ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली तर केवळ सात प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. पुढील पंधरा दिवसानंतर जिल्हावासीयांना प्रशासनाच्या नियोजनशून्य भूमिकेमुळे अभूतपूर्व पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार, हे निश्चित आहे.
आता मदार टँकरवर
हजारो कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना वापराविना धूळ खात पडून आहेत. साठवण तलाव कोरडेठाक पडले. अशा काळात केवळ टॅंकरवरच मदार आहे. सध्या जिल्ह्यातील ४४२ गावांत टँकर आणि अधिग्रहित करण्यात आलेल्या िवधन विहिरींवर पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी आजवर १२ कोटी रुपये खर्च करण्यात आला.