15 December 2017

News Flash

गावागावांत १०० क्विंटलपेक्षा अधिक तूर पडून

गतवर्षी तुरीला विक्रमी भाव मिळाला होता.

बिपीन देशपांडे,औरंगाबाद | Updated: April 20, 2017 1:17 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

जालन्यातील तीर्थपुरी येथील नाफेडच्या केंद्रावर शंभर ते सव्वाशे मालमोटारी, ट्रॅक्टरची रांग दिसते. १५ ते २० दिवस रांगेत थांबल्यानंतर नंबर आला तर आला नाही तर निवांत बसून राहायचे उन्हा-तान्हात. यामुळे कामे खोळंबून राहतात. याला शेतकरी वैतागले आहेत. शिवाय तुरीला भावही मिळत नाही. घनसावंगी तालुक्यातील खापर देवहिवरा या अठराशे लोकवस्तीच्या गावचे प्रकाश परदेशी सांगत होते, ‘घरातील दोनपैकी एका खोलीत तब्बल सहा क्विंटल तुरीच्या पोत्यांची थप्पी पडून आहे. गावात माझ्यासारखे अनेक आहेत. कोणाची दहा, कोणाची पंधरा क्विंटल तूर घरात पडून आहे. कीड, घूस, उंदीर लागून खराब होईल, याची भीती असली तरी बाहेरही विकण्यासारखी परिस्थिती नाही.’ ही एकटय़ा प्रकाश परदेशी यांचीच अडचण नाही तर तूर पेरणाऱ्या गावोगावच्या शेतकऱ्यांच्या घरातील स्थितीच त्यांनी मांडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात घरोघरी तुरी, अशी स्थिती आहे.

गतवर्षी तुरीला विक्रमी भाव मिळाला होता. दहा हजार रुपयांपेक्षा अधिकचा तुरीला भाव होता. किरकोळ बाजारात तुरीची प्रतिकिलो १८० रुपयांपेक्षा अधिक रक्कम देऊन खरेदी करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली. कधी नव्हे एवढा भाव तुरीला मिळू लागल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांनी तुरीचेच उत्पादन घेतले. त्यातच ऊस नको म्हणून तूर पेरा, असा आग्रह प्रशासनानेही धरला.  २०१६-१७ या हंगामाच्या पेरणी अहवालात मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ात मिळून ५ लाख ९४ हजार ६९५ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती. एकरी ४ ते ५ क्विंटलचा अंदाज बांधला तर जवळपास १ कोटी क्विंटल उत्पादन एका मराठवाडा विभागातून निघाले आहे. यातील नाफेडच्या केंद्रांवर झालेली तूर खरेदीची आकडेवारी ही काही हजार क्विंटल आहे. हिंगोलीतील नाफेडच्या केंद्रांवर अवघी २७ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. तुरीचा भावही गडगडला आहे. गतवर्षी दहा हजारांवर असलेला तुरीचा भाव या वर्षी नाफेडच्या केंद्रांवर ५ हजार ५० रुपये मिळाला. त्यातही बारदान्याअभावी नाफेडने तूर खरेदी बंद ठेवली आहे. जालन्यातील तीर्थपुरी, अंबड येथील नाफेडच्या केंद्रावर तुरीच्या वाहनांची मोठी रांग अजूनही आहेच.

हस्तपोखरीतील घुगे म्हणाले, गावात यंदा तुरीचे अफाट उत्पादन निघाले आहे. मुबलक पाऊस झाल्यामुळे एका-एका शेतकऱ्याला ५०-८० क्विंटल तुरीचे उत्पादन झाले आहे. काहींनी व्यापाऱ्यांना तर काहींनी अंबड येथील नाफेडच्या केंद्रावर विक्री केली आहे. परंतु गावात १०० ते २०० क्विंटल तूर घरातच साठवून ठेवली आहे. पुढे भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटते. बदनापूरजवळील पाडळी येथील काकासाहेब सिरसाट यांनीही, काही गावांमध्ये शेतकऱ्ऱ्यांनी तूर घरातच ठेवली असल्याचे सांगितले. आता भाव नसल्याने विकून आलेला पैसा हातात राहणार नाही. पेरणीच्या वेळी तूर विक्री करून आलेला पैसा खत-बियाणांच्या खरेदीसाठी उपयोगात येईल, असा विचार करूनच अनेकांनी तूर घरात साठवून ठेवली आहे.

First Published on April 20, 2017 1:17 am

Web Title: 100 quintals tur dal wasting at village