जिल्ह्यात शेतकरी-शेतमजुरांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. काम नसल्याने कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा, या विवंचनेतून उस्मानाबाद तालुक्यातील खेड येथील शेतमजुराने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. जानेवारीपासून सुरू झालेले आत्महत्यांचे लोण अधिकच गंभीर झाले आहे. गेल्या ९ महिन्यांत जिल्ह्यात १०९जणांचा कर्जबळी दुष्काळ, नापिकी आणि हाताला काम न मिळाल्यामुळे गेला.
जिल्ह्यात दुष्काळ शेतकऱ्यांची पाठ सोडेनासा झाला आहे. दुष्काळ, नापिकी व हाताला काम मिळत नसल्याने शेतकरी पुरता वैतागला आहे. पत्नी, ३ मुले, सुना, नातवंडे असे १०जणांचे कुटुंब दुष्काळात चालवायचे कसे, या विचाराने त्रस्त उस्मानाबाद तालुक्यातील खेड येथील गणपती काशिनाथ भुसारे या शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवले. शेती नाही. राहते घर, दुसऱ्याच्या शेतात किंवा इतरत्र मिळेल ते काम करून मोलमजुरी करून भुसारे चरितार्थ चालवत. मात्र, दुष्काळ असल्याने हाताला काम मिळत नाही. यातून घरात असलेली दोन जनावरे त्यांनी विकली. जगणेच अवघड झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. भुसारे यांनी गावात काम मिळावे, म्हणून रोहयो कामासाठी ग्रामपंचायतीकडे नावनोंदणी केली होती. मात्र, त्यांना काम मिळाले नाही. खेड गावात रोहयोची दोन कामे मंजूर आहेत. मात्र, रिमझिम पाऊस पडत असल्याने ती बंद आहेत. त्यामुळे गावात मजुरांसमोर मोठय़ा अडचणी आहेत. गेल्या १५ दिवसांपूर्वी भूम तालुक्यातील अंभी गावात महिलेने उपासमारीला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेनंतरही प्रशासन जागे झाले नसून, काम मिळत नसल्याने शेतमजुरांच्या आत्महत्या सुरूच आहेत. जानेवारी ते १४ सप्टेंबपर्यंत जिल्ह्यात १०९ शेतकऱ्यांचा कर्जबळी गेला. जानेवारीत ९, फेब्रुवारी १५, मार्च १६, एप्रिल ९, मे १६, जून १०, जुलै १०, ऑगस्ट १५ व सप्टेंबरमध्ये ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.