मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

दुष्काळावर मात करण्यासाठी मराठवाडय़ातील ११ मोठी धरणे जलवाहिन्यांद्वारे जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार असून दोन महिन्यांत त्याच्या निविदा काढण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

धरणे जोडण्याचे काम लगेच होणारे नाही, त्याला चार वर्षे लागू शकतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. गंगापूर तालुक्यातील लासूर येथील चारा छावणीला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.

शेती आणि शेतीसंलग्न व्यवसायात सरकारने दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. दुष्काळग्रस्त भागाला न्याय देण्यासाठी जलसंधारणाच्या कामाची व्याप्ती वाढवली जाईल आणि गुंतवणूकही वाढवली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून विम्याबाबतच्या तक्रारी येत आहेत. सलग पडलेल्या दुष्काळामुळे उंबरठा उत्पादन घटले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत, त्यांचे निरसन केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. बजाज फाऊंडेशन आणि भारतीय जैन संघटनेने उभारलेल्या चारा छावणीच्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. वर्धा आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्य़ांत त्यांनी केलेले काम चांगले असल्याचे ते म्हणाले. वर्धा जिल्ह्य़ात नदीचे ७०० कि.मी.चे पुनरुज्जीवन केले आहे. औरंगाबादमध्येही अशा प्रकारची कामे सुरू आहेत. या सरकारने २०१४ ते २०१९ या कालावधीत शेती आणि संलग्न व्यवसायात केलेली गुंतवणूक मागील सरकारच्या तुलनेत चारपट अधिक असल्याचा दावाही फडणवीस यांनी केला.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मराठवाडय़ात चारा पीक घेण्यावर भर द्यायला हवा, अशी सूचना केली होती. त्यावर, चारा संवर्धनाचा कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या वेळी आमदार प्रशांत बंब, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, आदींची उपस्थिती होती. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

पीकहानीला ‘जलयुक्त’मुळे अटकाव!

‘जलयुक्त शिवार’च्या कामावर काहींनी टीका केली. मात्र, ही कामे झाली नसती तर दुष्काळाची तीव्रता आणखी वाढली असती. ही कामे झाल्यामुळे विहिरी आणि ओढय़ांना पाणी राहिले. त्यामुळे पावसाचा मोठा खंड पडूनही पिके करपली नाहीत. नुकसान झाले हे खरे असले तरी या ‘जलयुक्त शिवार’मुळे संभाव्य हानीला काही प्रमाणात अटकाव झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.