जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील ई चलनाची रक्कम बँकेत भरण्यासाठी निघालेल्या व्यक्तीस बंदुकीचा धाक दाखवून १२ लाखांची रोकड लुटल्याचा प्रकार बीडमध्ये गुरूवारी भरदुपारी रहदारीच्या ठिकाणी घडला. चोरटय़ांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक व शहर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास रमेश वैजीनाथ मस्के हे मोटारसायकलच्या (एमएच २३७६५) डिक्कीमध्ये १२ लाखांची रोकड घेऊन हैदराबाद बँकेच्या मुख्य शाखेत भरणा करण्यास निघाले होते. राजुरीवेशीजवळ आल्यानंतर दोन चोरटय़ांनी मस्के यांची गाडी थांबवून त्यांच्या कानाला बंदूक लावली. डिकीतील रकमेसह त्यांची मोटारसायकल पळवून नेली. माहिती कळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कुलबुम्रे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनीही शहर पोलीस ठाण्यात येऊन चौकशी केली. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक व शहर पोलिसांचे पथक तपासासाठी रवाना केले. रमेश मस्के हे श्री साई मल्टीसव्‍‌र्हिसच्या माध्यमातून नोंदणी व मुद्रांक कार्यालयात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील ई चलनाची रक्कम बँकेत भरण्यास जात असताना हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या विविध शुल्कांपोटी जमा झालेली रक्कम बँकेमध्ये भरणा करण्यास घेऊन जात असताना दोन वेळा लुटण्यात आली होती. त्यानंतर बस स्थानकासमोरील आयसीआयसीआय बँकेतही भरदुपारी १७ लाख रुपयांची लूट करण्यात आली होती. या दोन्ही घटनांतील तपासाचे धागेदोरे अजून हाती लागले नाहीत, तोच पुन्हा तशीच घटना घडल्याने आरोपींना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.