मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांसाठी यापूर्वी १२० कोटी रुपये दिले आहेत. त्या रस्त्यांचे काम काहीसे उशिरा सुरू झाले. मात्र देर आये, दुरुस्त आये, मुख्यमंत्र्यांनी भविष्यात शहरातील रस्त्यांसाठी आणखी १२५ कोटी रुपये दिले जातील, असे आश्वासन गुरुवारी दिले.

औरंगाबाद येथे सिडको येथील सभेत ते बोलत होते. त्यांच्या हस्ते शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाची सुरुवात आज करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार चंद्रकांत खैरे होते. समांतरसह विकास कामे न्यायालयात नेली जातात. त्यात राजकारण आणले जाते.

समांतर पाणीप्रश्नी राजकारण न आणता प्रस्ताव दिला तर राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल, असेही ते म्हणाले. मराठवाडय़ाच्या राजधानीच्या या शहराला सर्वतोपरी आर्थिक निधी दिला जाईल, असे ते म्हणाले. कार्यक्रमास महापौर नंदकुमार घोडेले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड, एमआयएमचे इम्तियाज जलील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह भाजप-शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार इम्तियाज जलील आणि आमदार सुभाष झांबड यांनी महापालिकेच्या कार्यशैलीची टोपी उडवली. खासदार चंद्रकांत खैरे यांनाही कानपिचक्य दिल्या. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचे सभापती चांगले काम करीत आहेत. खैरे साहेब त्यांना जरा मोकळ्या हातांनी काम करू द्या. समांतर जलवाहिनीसाठी मदत केली जावी, तसेच सातारा देवळाई या भागासाठी निधी देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार जलील यांनी मुख्यमंत्र्यांची प्रतिमा स्वच्छ आणि पारदर्शी असल्याचे सांगत महापालिकेच्या कारभाऱ्यांना चिमटे काढले. ते म्हणाले, रस्त्यांची कामे दर्जेदार होतील की नाही  याविषयी शंका आहे. पण तुम्ही लक्ष घालत असल्यामुळे चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदारांना कारागृहात पाठवाल. पहिल्यांदा हिंदीत भाषण करणाऱ्या जलील यांनी मराठीत बोलावे, असा आग्रह झाल्यामुळे त्यांनी त्यांचे भाषण मराठीत केले आणि मनपाच्या कारभाराचे मुख्यमंत्र्यांसमोर वाभाडे काढले.

खासदार खैरे यांना काढलेल्या चिमटय़ांनंतर त्यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी ते म्हणाले, मी शिवसेनेचा राष्ट्रीय नेता असल्यामुळे काय बोलावे, हे मला कळते. टिंगलटवाळी करण्यात काही अर्थ नसतो. शहराच्या विकासासाठी अधिक निधी मिळावा, असा माझा नेहमीच प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. सिडको भागातील घरांना विनाअट फ्रिहोल्ड केले जावे, तसेच औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे, अशी मागणीही खा. खैरे यांनी केली.