बारावीच्या उत्तरपत्रिकेतील गुण वाढविण्यासंदर्भात येथे उघडकीस आलेल्या रॅकेटप्रकरणी जालना पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी २२ मार्चपर्यंत ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाच्या तपासासाठी जालना पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे.
शहरातील अंबड रस्त्यावरील संस्कार निवासी वसतिगृहात शुक्रवारी टाकलेल्या छाप्यात पोलिसांना बारावीच्या तब्बल साडेसात हजार उत्तरपत्रिका सापडल्या. यापैकी अडीच हजार उत्तरपत्रिका लिहिलेल्या, तर पाच हजार कोऱ्या आहेत. या उत्तरपत्रिकांसह होलोक्रॉफ स्टीकर, लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला. छापा घातला त्यावेळी काही मुले-मुली उत्तरपत्रिका लिहीत असल्याचे पोलिसांना आढळले. बारावीच्या उत्तरपत्रिका विभागीय परीक्षा मंडळाकडे जमा झाल्यावर तपासणीसाठी विविध महाविद्यालयांत पाठविल्या जातात. या उत्तरपत्रिका जालना येथे पाठविण्यात आल्या का आणि त्यांच्यावर सांकेतिक क्रमांक कशासाठी होता, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मंडळाने प्रमाणित केलेल्या कोऱ्या उत्तरपत्रिका वसतिगृहात पोहोचण्याचे कारण काय, या मागे बारावीचे गुण वाढवून देण्याचे रॅकेट कशा पद्धतीने कार्यरत होते? त्यात कोणाकोणाचा सहभाग आहे, या दृष्टीने पोलिसांचे पथक तपास करणार असल्याचे सांगण्यात येते. वसतिगृहाचा व्यवस्थापक श्रीमंत वाघ व अंकुश पालवे या दोघांना तालुका जालना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, औरंगाबाद विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे अध्यक्ष सुखदेव ढेरे यांनी शनिवारी जालना येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली आणि तपासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.