औरंगाबाद : मराठवाडय़ातील १३ तालुका स्तरावरील शहरांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सिल्लोड, फुलंब्री, भोकरदन, बदनापूर, सेनगाव यांसह बीड जिल्ह्य़ातील पाच शहरांच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. मात्र, पाणीच संपल्यामुळे या शहरांना आता टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. भोकरदन शहरातील २५ हजार लोकसंख्येला सध्या सहा दिवसाला एकदा पाणी दिले जात आहे. २४ शहरांमध्ये तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई आहे.

औरंगाबाद शहराला दर चार दिवसाला पाणीपुरवठा होतो, असा प्रशासनाचा दावा असला तरी काही भागांमध्ये आठ दिवसालाही पाणी मिळत नाही. सिल्लोड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली होती. तेथे आता तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. भोकरदनला पाणीपुरवठा करणारा जुई मध्यम प्रकल्प पूर्णत: कोरडा झाल्याने नवीन विहीर खोदण्यात आली. २०० मीटरची तात्पुरती जलवाहिनी टाकण्यात आली. अगदी आडवे बोअरही घेण्यात आले. मात्र, आताही या शहराला सहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. बदनापूर येथे टँकरने पाणीपुरवठा होत असून अनेक शहरे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. परभणीसारख्या मोठय़ा शहराला ११ दिवसाला एकदा पाणीपुरवठा होत आहे. गंगाखेड, सोनपेठ या शहरांना १२ दिवसाला, तर पालम शहराला सहा दिवसाने पाणीपुरवठा होत आहे. नांदेडमधील सर्व तालुक्यांमध्ये एक ते तीन दिवसाने पाणीपुरवठा होत आहे. बीड जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांमध्ये आठ दिवसाला एकदा कसाबसा पाणीपुरवठा होतो. अप्पर कुंडलिका धरण कोरडे पडल्याने वडवणी शहराला टँकरने पाणीपुरवठा होत आहे. आष्टीची स्थितीही अशीच आहे.

अशा आहेत अपूर्ण योजना

सिल्लोड, भोकरदन संयुक्त पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागा मिळत नसल्याने योजना रखडली आहे. ती पूर्ण होण्यास साधारण तीन महिने लागू शकतील. खुलताबाद पाणीपुरवठा योजनेसाठी वीज वितरणाचे देयक कारणीभूत आहे. येथील जलवाहिनीची दुरुस्ती झाली असली तरी योजना अजूनही सुरू झालेली नाही. हिंगोली जिल्ह्य़ातील सेनगाव नगरपरिषदेने मंजूर केलेल्या पाणीपुरवठा योजनेला कार्यारंभ आदेश दिला असला तरी जुलै अखेपर्यंत ही योजना सुरू होईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. अहमदपूर पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे काम संथगतीने असल्यामुळे त्याला नोटीसही देण्यात आली आहे. १२ हजार ७९० रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे. या प्रशासकीय कारवाया सुरू असल्या तरी पाणी नसल्यामुळे शहरे तहानलेलीच आहेत.