बीडमधील सय्यद साजेदअली हत्या प्रकरण

औरंगाबाद : खंडणीवरून तलवार, खंजीर, कुकरीने हल्ला करून एकाचा निर्घृण खून केल्याप्रकरणात मोक्काअंतर्गत गुन्हा नोंद झालेल्या १४ आरोपींना न्यायालयीन कोठडीतून अटक करण्यात आली. १४ आरोपींना न्यायालयाने बुधवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. डी. साळुंके यांनी दिले. खुनाची घटना १९ सप्टेंबर २०१९ रोजी बीडमधील सना फंक्शन हॉलच्या बाजूला घडली होती.

या प्रकरणी बीडमधील मृत सय्यद साजेदअली मीर अन्सारीअली यांचा भाऊ सय्यद जावेदअली अन्सारअली यांनी फिर्याद दिली होती.  या प्रकरणात खुनाच्या गुन्ह्यसह इतरही गुन्हे दाखल होऊन टोळीप्रमुख अन्वरखान याच्यासह सर्फराज आयाजुद्दीन काझी, फैज मोहम्मद खान उर्फ पापाभाई नजीर मोहम्मद खान, सय्यद नूर उर्फ मिनाज उर्फ मीना सय्यद मुबारक, मुजीबखान मिर्झाखान पठाण, सय्यद नासेर सय्यद नूर, सय्यद शाहरुख सय्यद नूर, शेख उबेद शेख बाबू, शेख शाहबाज शेख कलीम, शेख अमर शेख अकबर, आवेज काझी मुखीद काझी, शेख इम्रान उर्फ काला शेख रशीद, बबरखान गुलमोहम्मद खान पठाण, शेख वसीम शेख बुरहानोद्दीन (सर्व रा. बीड) यांना अटक करून त्यांची रवानगी आधी पोलीस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. याच प्रकरणातील शेख सर्फराज उर्फ सरू डॉन, इम्रान पठाण उर्फ चड्डा, शेख बबर शेख युसूफ व शेख मझहर उर्फ काल्या उर्फ हाफमर्डर शेख रहीम हे आरोपी अजूनही फरार आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना मोक्का कोठडी देण्याची विनंती विशेष सरकारी वकील राजू पहाडिया यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने सर्व १४ आरोपींना बुधवापर्यंत मोक्का कोठडी सुनावली.