मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

औरंगाबाद : मराठवाडय़ातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर गोदावरीच्या खोऱ्यात पश्चिम नद्यांतील १६७ टीएमसी पाणी वळविण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. त्याचबरोबर कृष्णा मराठवाडय़ासह अन्य सिंचन योजनाही पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.

महाजनादेश यात्रेनिमित्त येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. औरंगाबाद शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी १६०० कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकार मंजूर करेल, असेही ते म्हणाले. अपेक्षेप्रमाणे मराठवाडय़ातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सिंचन आणि पाणी योजनांवर आपल्या भाषणात अधिक जोर दिला. मराठवाडय़ासाठी प्रस्तावित वॉटरग्रीड योजनेतून ६४ हजार किमीची जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार असून त्यामाध्यमातून धरणे जोडली जातील आणि शहरामध्ये शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल, असेही ते म्हणाले. समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद आणि जालना हे दोन जिल्हे उद्योगाचे मोठे केंद्र असतील. त्यासाठी डीएमआयसीवर लक्ष केंद्रित करून ऑरिकमधील पहिली स्मार्टसिटी उभारली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व अन्य योजनांसाठी दिलेल्या निधींचा उल्लेख करून भविष्यात महायुतीचाच झेंडा राज्यात फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सभेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यमंत्री अतुल सावे यांनी केले.