कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात ३ महिन्यांमध्ये १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ६ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुदान मिळाले. एक अपात्र, एकाची फेरचौकशी, ७ प्रकरणे प्रलंबित तर दोनची अजून दप्तरी नोंद झाली नाही. शेतकरी आत्महत्या प्रकरणी लवकरच बठक घेऊन यामध्ये काही प्रकरणे निकाली निघण्याची शक्यता आहे.
गेल्या ३ वर्षांपासून कमी पावसामुळे पिके हातची गेल्याने शेतकरी आíथक संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या अंगावर बँकेचे पीककर्ज आहे. काही शेतकरी आíथक संकटात सापडल्यामुळे संसाराचा गाडा वर्षभर कसा हाकलावा, असा प्रश्न असल्याने त्यांचे अवसान गळाले आहे. जानेवारी ते मार्चअखेर ३ महिन्यांत १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील इसापूर, वापटी, सोमठाणा, चिंचोली, अनखळी, कुरुंदवाडी येथील ६ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने अनुदान वाटप केले, तर सेनगाव तालुक्यातील धानोरा येथील रामराव नारायण गडदे या शेतकऱ्याचे प्रकरण अपात्र ठरले. कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील संजय भानुदास साखरे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या प्रकरणाची फेरचौकशी सुरू आहे. आसेगाव येथील मारोती घेडके, कोंढूर डिग्रस येथील श्यामराव पतंगे, बरडा येथील बबन डोळे, घोरदरी येथील गदडूजी पुंजाजी सातपुते, खंडाळा येथील उत्तम गायकवाड, अकोली येथील भगवान कदम, गिरगाव येथील रावसाहेब जठनकराव कऱ्हाळे या ७ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे नव्याने दाखल झाल्यामुळे प्रलंबित आहेत, तर वसमत तालुक्यातील तुळशीराम दत्तराव सवंडकर व अनिल विश्वासराव गलांडे या दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी जिल्हा प्रशासनापर्यंत अहवाल पोहोचला नाही. आता दोन दिवसांनंतर जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी आत्महत्या प्रकरणी बठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.