६ कोटी २ लाखांची वसुली; १६६ जणांवर गुन्हे

औरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागातील औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडलात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली. गेल्या वर्षभरात १९ हजार ८४४ वीजचोरी पकडून १६६ वीज चोरांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ६ कोटी २ लाख ३८ हजारांची दंडात्मक महसूल वसूल करण्यात आला.

महावितरण औरंगाबाद प्रादेशिक विभागातील औरंगाबाद, जालना, जळगाव, धुळे, नंदूरबार, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या ११ जिल्ह्य़ांत वर्षभरात म्हणजे एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत वीजचोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली. यात औरंगाबाद परिमंडलात ९ हजार ६६८ वीजचोऱ्या पकडून २ कोटी २५ लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. १२९ जणांवर गुन्हे दाखल केले.

जळगाव परिमंडलात ५ हजार ४४ वीजचोर पकडून २ कोटी ३४ लाख ८८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर २० जणांवर गुन्हे दाखल आहेत. लातूर परिमंडलात ३,५१२ वीजचोर पकडून ९४ लाख ८९ हजारांचा दंड  वसूल करण्यात आला. १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. नांदेड परिमंडलात एक हजार ६२० वीजचोरी पकडून ४७ लाख ४३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. चार जणांवर गुन्हे दाखल केले.

महावितरणकडून वीजचोरी पकडण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार असून ती अधिक तीव्र करण्यात आली आहे. वीज ग्राहकांनी आकडे टाकून विजेचा वापर करू नये, अधिकृत वीज जोडणी करावी, असे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे.