रशियाच्या कंपनीकडून २०० कोटींची गुंतवणूक

औरंगाबाद : औरंगाबादसह मराठवाडय़ातील बीड आणि जालना येथील औद्योगिक वसाहतीमध्ये रशियातील ‘एनएलएमके’ या कंपनीबरोबर २०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून औरंगाबाद सिटी इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशनमध्ये वैद्यकीय उपकरणाच्या कारखान्यासाठी इंडोनेशियाच्या कंपनीबरोबर चर्चा सुरू आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

हे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पालकमंत्री म्हणून सुरू असणाऱ्या विविध कामांचा आढावा सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला. ते म्हणाले, ‘बिडकीन येथील फूडपार्कची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचे बांधकाम सुरू आहे. लवकरच ते काम होईल.’ औरंगाबाद शहरातील कचरा प्रकल्पाची कामे मार्गी लागली असून येत्या काळात कांचनवाडी, पडेगाव तसेच अन्य कचरा प्रक्रिया केंद्रे सुरू केली जाणार आहेत. याचे उद्घाटन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. केवळ उद्योगाबरोबरच शहरातील विकासकामांसाठी सुरू असणाऱ्या प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. औरंगाबादसह मराठवाडय़ातील विकासावर अधिक लक्ष केंद्रित केले असल्याचे देसाई यांनी सांगितले.

विकासचित्र..

मराठवाडय़ात स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनअंतर्गत अनेक प्रकल्प सुरू असून कोविडकाळात मेल्ट्रॉनच्या पडून असलेल्या इमारतीमध्ये रुग्णालय सुरू झाले. साथरोगासाठी कायमस्वरूपी हे रुग्णालय सुरू असेल. करोनाकाळात आरोग्य सुविधा बळकटीकरणाचा भाग म्हणून हे रुग्णालय सुरू करण्यात आले. त्याचबरोबर शहरात तीन एजन्सीमार्फत १५२ कोटी रुपयांची रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.

होणार काय?

मराठवाडय़ातीला बेरोजगारी दूर करण्यासाठी उद्योग विभागाकडून विविध प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून बीड, जालना येथे रशिया मोठी गुंतवणूक करणार आहे. पूर्वेकडील देशातील कंपन्यांबरोबरही उद्योगांबाबत चाचपणी सुरू आहे. त्याचबरोबर टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमधील अधिकाऱ्यांनी ‘ऑरिक सिटी’ची पाहणी केली असून माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रकल्प उभे राहण्याची तयारी करण्यात येत आहे, असे उद्योगमंत्र्यांनी सांगितले.