17 February 2020

News Flash

प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर पाणी.. तेही पाचऐवजी आता दहा दिवसांनीच!

तीव्र पाणीटंचाईमुळे शहराला पाच दिवसांनी प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर पाणी असे लातूर महापालिकेने ठरविलेले सूत्र आता पूर्णत: बिघडले आहे. आता १० दिवसांनी एकदा २०० लिटर

पाणी

तीव्र पाणीटंचाईमुळे शहराला पाच दिवसांनी प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर पाणी असे लातूर महापालिकेने ठरविलेले सूत्र आता पूर्णत: बिघडले आहे. आता १० दिवसांनी एकदा २०० लिटर पाणी असे नवे सूत्र आखण्यात आल्याने प्रत्येक कुटुंबाला प्रतिदिन केवळ २० लिटर पाणी मिळण्याची शक्यता आहे. नव्या सूत्रानुसारही पाणी वितरण व्यवस्थित होण्याची शक्यता नाही. कारण वितरणात कमालीची अनागोंदी आहे. या अनागोंदीस कमी मनुष्यबळ हेही महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महापालिकेकडून वितरणाची जबाबदारी काढून घ्यावी आणि ती थेट विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणात द्यावी, अशी मागणीही होत आहे.
शहरात तीन दिवसांपूर्वी यापुढे नियमित टँकरने पाणी दिले जाईल असे प्रशासनाने जाहीर केले. मात्र, पाणी वितरणाची यंत्रणा अतिशय अकार्यक्षम असल्यामुळे ‘बळी तो कान पिळी’ असे प्रकार वाढत आहेत. लातूर शहराला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दररोज किमान ४५ लाख लिटर पाणी उपलब्ध असले पाहिजे. भंडारवाडी, डोंगरगाव, माळकोंडजी, साई येथून उचलले जाणारे पाणी जेमतेम ३० लाख लिटर आहे. टँकरची संख्या व फेऱ्या वाढणार नाहीत, तसेच त्यावर योग्य नियंत्रण केले जाणार नाही तोपर्यंत पाणी वितरणातील दोष दूर होणार नाहीत. प्रत्येक ठिकाणी रोज नव्याने समस्या उद्भवत आहेत. एकाच व्यक्तीला सतत २४ तास देखरेख करावी लागत असल्याने त्याचीही अडचण निर्माण होत आहे. अपुरे मनुष्यबळ व तोकडी यंत्रणा यामुळे पाण्याचे त्रांगडे निर्माण झाले आहे.
पाण्याचे उपलब्ध असणारे टँकर कार्यक्षमतेने काम करीत आहेत की नाहीत? याची देखभाल करण्याची यंत्रणाही अद्ययावत नाही. शहरात वितरीत केले जाणारे पाणी समन्यायी पद्धतीने वितरीत करण्याचा दावा पालिका करीत असली, तरी वस्तुस्थिती मात्र भिन्न आहे. शहराच्या पूर्व भागातील नागरिकांना योग्य पद्धतीने पाणी वितरीत होत नसल्याच्या तक्रारीच नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत केल्या आहेत.
या अनुषंगाने भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी म्हणाले की, महापालिकेकडील पाणी वितरण व्यवस्था काढून घेऊन विभागीय आयुक्त किंवा पाणीपुरवठय़ाचे सचिव यांनीच लातूरच्या पाणी प्रश्नावर लक्ष द्यावे. केवळ पाणी वितरणासाठी स्वतंत्र प्रशासक नेमून व सर्व पाण्याच्या टाक्यावर पोलीस यंत्रणा उभी करून जूनपर्यंत पाणी द्यावे, अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांनी, पालिकेकडे अपुरे मनुष्यबळ व मनापासून काम करण्याची वृत्ती असणाऱ्या मंडळींचा तुटवडा त्यामुळे पाणी वितरणात नवे प्रश्न निर्माण होत आहेत. मनुष्यबळ वाढवून पाणी वितरणासाठी स्वतंत्र प्रशासक देण्याची गरज व्यक्त केली.
कोण काय म्हणाले?
पाणी व पसे उपलब्ध असूनही केवळ नियोजन नाही म्हणून लातूरकरांची पाण्याची गरसोय होत आहे. जिल्हा प्रशासन अथवा विभागीय आयुक्तांनी पाणी वितरणाच्या यंत्रणेत लक्ष घालून आवश्यक असल्यास स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याची गरज आहे.
– खासदार डॉ. सुनील गायकवाड
राज्य सरकारने लातूर शहर पाणीपुरवठय़ासाठी पुरेसे पसे दिले. मात्र, तोकडय़ा मनुष्यबळामुळे अडचणी निर्माण होत असून तातडीने मनुष्यबळ वाढवून द्यावेत.
– काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख
पाणी वितरणातील आयुक्तांचे अधिकार काढून घेऊन त्यांच्याऐवजी उपविभागीय अधिकाऱ्याचा दर्जा असणारा स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा. त्यांच्यामार्फत केवळ पाणी वितरणाची यंत्रणा राबवावी.
– शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. नागेश माने
शहरातील ९ पाण्याच्या टाक्यांपकी केवळ एकाच टाकीत पाणी आहे. तेथून संपूर्ण शहरभर पाणी वितरण करणे अशक्य आहे. काही ठिकाणी पाणी असून मिळत नाही तर काही ठिकाणी पाणी नसल्यामुळे देता येत नाही.
राष्ट्रवादीचे नगरसेवक शैलेश स्वामी

First Published on March 18, 2016 1:30 am

Web Title: 200 litres water for every family after five days
टॅग Drought,Latur
Next Stories
1 तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी, पत्रकारांसह सातजणांवर गुन्हा
2 जाचक कायद्याविरोधात सराफ-सुवर्णकारांचा मोर्चा
3 दुष्काळाशी लढणाऱ्यांसाठी ‘जलमित्र’ उपक्रमास प्रारंभ
Just Now!
X