औरंगाबाद शहरातील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे पाण्याची २२ कोटी ६८ लाख ३६ हजार रुपयांची थकबाकी आहे. पाण्याचा कच्चा माल म्हणून वापर करणाऱ्या कंपन्यांच्या दरात वाढ केल्यानंतर सुरू असणाऱ्या न्यायालयीन लढय़ामुळे या कंपन्या पाण्याची थकबाकी भरत नाहीत. आता हा आकडा कोटय़वधींच्या घरात आहे. उद्योगासाठी आरक्षित ५६ दशलक्ष लिटर पाण्यापैकी ४ दशलक्ष लिटर पाणी मद्यउत्पादक कंपन्यांना दिले जाते. हा पाणीपुरवठा सुरू ठेवावा की नाही, यावरून सध्या वाद सुरू आहेत. सध्या या कंपन्यांना एक हजार लिटरसाठी ४२ रुपये ५० पैसे आकारले जातात.
दुष्काळाची दाहकता वाढत असल्याने टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अशा काळात पाण्याचा चंगळवादी वापर थांबवावा, अशी मागणी केली जात आहे. दुसरीकडे पाणी कपात केल्यास वा पुरवठा पूर्णत: बंद केल्यास त्याचा सिंचनासाठी उपयोग करता येणार नाही. कारण उपलब्धतेच्या प्रमाणात दिले जाणारे पाणी तुलनेने खूपच कमी आहे. जायकवाडीत बुधवारी २१ टीएमसी पाणी शिल्लक होते. धरणाची क्षमता अधिक असल्याने धरण शून्य टक्क्यावर जाते, तेव्हा त्यात २६ टीएमसी पाणी असू शकते. गेल्या काही वर्षांत गाळ आलेला असल्याने जेवढे पाणी असणे गृहित धरले जाते त्यापेक्षा साठा कमी असू शकेल, असे जलसंपदा विभागातील अधिकारी सांगतात. तथापि गाळ धरूनही पिण्याच्या पाण्यासह उद्योगाला सहजपणे पाणी देता येऊ शकते, असा दावा केला जातो. पाणी कपात केल्यानंतर त्याचा उपयोग फारसा होणार नसल्याने मद्य कंपन्यांकडून मिळणारा ३ हजार ६६५ कोटी रुपयांचा महसूल का बुडवावा, असा सवाल उद्योजक विचारत आहेत. पाण्याच्या या गणितात दरांचाही वेगळा वाद आहे.
सध्या एक हजार लिटरसाठी ४२ रुपये ५० पैसे दर आकारला जातो. प्रतिलिटर हा दर केवळ ०.०४२५ पैसे असा होतो. यापूर्वी पाणीदरात वाढ करण्यात आल्यानंतर काही कंपन्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यामुळे जुन्या-नव्या दरातील फरकाची रक्कम वाढत गेली. २०११ पासून काही कंपन्यांनी पाण्याची जुनी देणी भरली नाहीत. नव्याने सुरू असणारी पाणी देयके भरली जातात. मात्र, वादातील फरकाची रक्कम कोटय़वधीत आहे.
मद्य कंपन्यांचा पाणीपुरवठा बंद करावा, ही मागणी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उचलून धरल्यानंतर दारूच्या बाजूने आपण नाही, हा संदेश देण्यासाठी शिवसेनेने या वादात उडी घेतली. दारू की पाणी या वादात थकबाकीचा आकडा कोटय़वधीत अडकला असल्याचे चित्र आहे.
कंपनीचे नाव                                        थकबाकीचा आकडा
बीडीए लिमिटेड (चिकलठाणा)           ३४ लाख ८८ हजार ५४४ रुपये
महाराष्ट्र डिस्टलरी (चिकलठाणा)          ६ कोटी ४९ लाख ९४ हजार ३०२ रुपये
शेतकरी बळीराजा/रॅडिको (शेंद्रा)         २ कोटी ३७ लाख २५ हजार ८६६ रुपये
स्कॉल ब्रेव्हरीज (वाळूज)                 ३ कोटी ३० लाख २० हजार ३५९ रुपये
मिलेनियम बीअर इंडिया (वाळूज)        २ कोटी ६९ लाख ३१ हजार ११ रुपये
औरंगाबाद डिस्टलरी (वाळूज)             १ कोटी ९२ लाख २ हजार ८७९ रुपये
फोरस्टर इंडिया (वाळूज)                  २ कोटी ६४ लाख ६३ हजार १३९ रुपये
लीला सन्स (वाळूज)                       १ कोटी ८७ लाख ३७ हजार २२४ रुपये
काल्सबर्ग इंडिया (वाळूज)                 ९ लाख ५९ हजार ६३६ रुपये
इंडो-युरोपियन ब्रेव्हरीज (वाळूज)         १ कोटी १२ लाख ९३ हजार ७०८ रुपये