27 September 2020

News Flash

‘लातुरात रस्ते विकासासाठी अडीच हजार कोटींची तरतूद’

जिल्हय़ाच्या रस्ते विकासासाठी भाजप सरकारने वर्षभरात अडीच हजार कोटींची, तसेच पिण्याच्या पाण्यासह आरोग्य, सिंचन, कृषी या साठी मोठी तरतूद केली.

जिल्हय़ाच्या रस्ते विकासासाठी भाजप सरकारने वर्षभरात अडीच हजार कोटींची, तसेच पिण्याच्या पाण्यासह आरोग्य, सिंचन, कृषी या साठी मोठी तरतूद केली. जिल्हय़ाच्या इतिहासात प्रथमच अशी मोठी तरतूद केल्याचा दावा भाजपचे महामंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर व प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.
निलंगेकर म्हणाले की, लातूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर असून उजनी धरणातील उस्मानाबाद शहरापर्यंत आलेले पाणी धनेगाव धरणातून लातूर शहराला येत असणाऱ्या जलवाहिनीला जोडण्यासाठी २७० कोटींची तरतूद केली आहे. ३० किलोमीटर जलवाहिनी अंथरण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने लातूर शहरात अत्याधुनिक आरोग्य सुविधा देण्यासाठी १५० कोटींचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय मंजूर करण्यात आले. त्यासाठीचा निधीही उपलब्ध झाला आहे. औसा तालुक्यातील टेंभी येथे १०० मेगावॅट क्षमतेचा सोलार ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. लातूर-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गास मंजुरी देण्यात आली. त्याला तांत्रिक मान्यता मिळाली.
रत्नागिरी-बुटीबोरी महामार्गाच्या कामात लातूर जिल्हय़ातील कामासाठीचा निधीही उपलब्ध करण्यात आला. उमरगा, किल्लारी, लामजना, औसा, लातूर, परळी, परभणी हा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. बीदर-भालकी-औराद शहाजनी-निलंगा-निटूर-बाभळगाव या राष्ट्रीय महामार्गासही मान्यता देण्यात आली. सर्व रस्ते चारपदरी होणार असून ते पूर्ण करण्यास ३ वर्षांचा कालावधी लागणार आहे. पहिल्या वर्षांसाठी अडीच हजार कोटींची तरतूद करण्यात आली. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हय़ात अतिशय वेगाने काम सुरू आहे. जिल्हय़ाच्या इतिहासात एका वर्षांत इतकी प्रचंड आíथक तरतूद प्रथमच करण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला.
प्रदेश प्रवक्ते हाके यांनी राज्य सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या कामाची उपलब्धी सांगितली. गेल्या १५ वर्षांत आघाडी सरकारने आपत्ती निवारणासाठी १५ हजार कोटी खर्च केले. सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागले. गेल्या वर्षभरात ८ हजार कोटी रुपये आपत्ती निवारणासाठी खर्च करण्यात आले. जलयुक्त शिवार योजना अतिशय कल्पकतेने राबवली. राज्यभरात २४ टीएमसी पाणी या योजनेंतर्गत केलेल्या कामामुळे जमा झाले. यातून ६ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. एवढे पाणी उपलब्ध करण्यासाठी धरणे बांधावी लागली, तर त्यासाठी किमान १५ हजार कोटी रुपये खर्च झाले असते. हे काम अवघे १६०० कोटी खर्च करून झाले. यातील ३०० कोटी लोकसहभागातून जमा झाले, असेही त्यांनी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, शैलेश गोजमगुंडे, सुधीर धुत्तेकर उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2015 1:30 am

Web Title: 2500 cr for road development in latur
टॅग Fund
Next Stories
1 मराठवाडय़ात भूजल पातळी खालावली, परभणी धोक्याच्या पातळीवर
2 ‘सरकारच्या धोरणावर असमाधानी, सरकार प्रतिमा जपण्यातच मश्गूल’ -राजू शेट्टी
3 तुळजापूर येथे पाच लाख भाविक दाखल
Just Now!
X