जालन्यात ४१९ टँकर

निसर्गाचा लहरीपणा, तसेच पावसाच्या अनियमितपणामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असून जनतेला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने ४४९ गावे व ७४ वाडय़ांवरील जनतेला ४१९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आठही तालुक्यांत २६६ कामांवर २९ हजार ४९५ मजुरांची उपस्थिती आहे.

जालना तालुक्यात ९० गावे १४ वाडय़ांना ७१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बदनापूर तालुक्यातील ४४ गावे १८ वाडय़ांना ५३ टँकर, भोकरदन ६६ गावे ६ वाडय़ांना ८३ टँकर, जाफ्राबाद ४७ गावे ४ वाडय़ांना ५२ टँकर, परतूर ३० गावे ६ वाडय़ांना ३१ टँकर, मंठा ५५ गावे ५ वाडय़ांना ५८ टँकर, अंबड तालुक्यातील ६४ गावे १५ वाडय़ांना ८२ टँकर, तर घनसावंगी तालुक्यातील ५३ गावे ६ वाडय़ांना ६१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या बरोबरच जनतेला पाणीपुरवठा करता यावा, या साठी पाणीसाठे असलेल्या ६३९ गावांमधील ८२१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आठही तालुक्यांत २६६ कामांवर २९ हजार ४९५ मजुरांची उपस्थिती आहे. मजुरांनी मागणी करताच त्यांना तातडीने काम देता यावे, या साठी ग्रामपंचायत व यंत्राणानिहाय ५ लाख ४६ हजार २८० मजूर क्षमतेची २३ हजार ५०४ कामे मंजूर करून ठेवण्यात आली आहेत.