तूर खरेदीबाबत उच्च न्यायालयात उत्तरे द्यावी लागत असतानाच मराठवाडय़ात बुधवापर्यंत ३ लाख ३५ हजार २२० क्विंटल तूर अजूनही खरेदी करणे बाकी होते. नव्याने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असले तरी तुरीसाठी आवश्यक असणारा बारदान्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. तसेच काही जिल्हय़ांमध्ये तूर ठेवण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. गोदामांची संख्या आणि क्षमता लक्षात घेता औरंगाबाद विभागातील गोदामे साठवणुकीसाठी पुरतील, मात्र लातूर विभागात गोदामांची क्षमता कमी पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, तुरीच्या प्रश्नाची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेतील नेतेमंडळी ६ आणि ७ मे रोजी मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर येणार आहेत.

औरंगाबाद जिल्हय़ात पैठण आणि गंगापूर या दोन तालुक्यांत १० हजार ५०० क्विंटल तूर पडून आहे. बुधवापर्यंत २८९० क्विंटल तूर खरेदी झाली होती. अद्यापही ७ हजार ६०९ क्विंटल तूर खरेदी करणे बाकी आहे. जालन्यात १४ हजार ७४, तर परभणीमध्ये ३८ हजार ४३२ क्विंटल तूर खरेदी होणे बाकी आहे. सर्वाधिक तूर खरेदी बीड जिल्हय़ात बाकी असून, १ लाख १७ हजार ९५९ क्विंटल तूर खरेदी होऊ शकली नाही.

राज्य सरकारने तूर खरेदीचा निर्णय घेतला असला तरी तूर ठेवण्यासाठी पोते आणि गोदामांची क्षमतेची वारंवार चाचपणी केली जात आहे. नाफेड आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या तुरीपैकी  ५२ लाख २४ हजार ८११ एवढी शेतकऱ्याची रक्कम मिळणे बाकी आहे. तसेच नाफेडकडूनही ३ कोटी ११ लाख २६७ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून जमा झालेले नाही. राज्य सरकारने तूर खरेदी केल्यानंतर कशा पद्धतीने रक्कम द्यायची या बाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान, खरेदी केलेली तूर गोदामापर्यंत नेण्यासाठी २०० किलोमीटपर्यंत मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे गोदामाचा प्रश्न फारसा भेडसावणार नाही, असे अधिकारी सांगत आहेत. २७ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने केलेल्या पंचनाम्यानुसार ३ लाख ३५ हजार २२० क्विंटल तूर खरेदी होणे बाकी आहे. गेल्या दोन दिवसांत १६२७ शेतकऱ्यांची २५ हजार ६६६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.