प्राप्तिकर विभागाचे देशभरातील ५० ठिकाणी छापे

औरंगाबाद : येथील दिशा ग्रुप ऑफ रिअल इस्टेट व मनजित प्राइड या बांधकाम, हॉटेल व जििनग प्रेसिंगसह अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योग समूहांकडे जवळपास ३०० कोटींचे अघोषित उत्पन्न असल्याचा प्राथमिक अंदाज प्राप्तिकर विभागातील सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला. विभागाने या दोन्ही उद्योग समूहाच्या देशभरातील ५० ठिकाणांवर छापे टाकले होते. २१ जानेवारी रोजी सकाळी सुरू झालेली ही कारवाई २३ जानेवारी रोजी सायंकाळी पूर्ण झाल्यानंतर उपरोक्त माहिती प्राप्तिकर विभागातील सूत्रांकडून शुक्रवारी मिळाली.

तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, छत्तीसगढसह नऊ राज्यांमधील दोन्ही उद्योग समूहाशी संबंधित कार्यालये, निवासस्थाने, हॉटेलांवर २१ जानेवारी रोजी एकाच वेळी छापे मारण्यात आले होते. यामध्ये सुमारे ३०० अधिकारी, १२५ च्या आसपास पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. याशिवाय औरंगाबादसह महाराष्ट्रातील मुंबई, बंगळुरु, कोलकता येथील काही कंपन्यांशीही संबंधित कागदपत्रे तपासणीत पुढे आली असून त्यांच्याशी नेमका कोणता व्यवहार झाला, याची माहिती आता कागदपत्रांच्या छाननीतून समोर येणार आहे. यातील कागदपत्रांच्या छाननीतून जवळपास ३०० कोटींचे अघोषित उत्पन्न निघत असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे प्राप्तिकर विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. करचुकवेगिरीचा काही प्रकार आहे का, याचीही माहिती पुढे येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.