औरंगाबादमधील ३२ हजार रिक्षाचालकांची कोंडी

औरंगाबाद : जळगाव रोडवरील आंबेडकरनगरातील एक दहा-बाय-दहाची खोली. त्यात विलास केदारे हे तीन मोठय़ा मुली, एक मुलगा आणि पत्नीसह राहतात. त्यांचा हा कुटुंबकबिला चालतो तो ऑटो चालवून आलेल्या कमाईतून. पण मागील २२ दिवसांपासून ऑटो चालवणे बंद झाले. केदारे सांगतात, ‘घरात आता खायचेही वांदे झालेले आहेत. खाणारी तोंडे सहा आणि कमाईचे चाक रुतलेले.’

औरंगाबादमधील ऑटोचालकांची जगण्यासाठी कशी कसरत सुरू आहे, त्याचे उदाहरण म्हणून केदारे हे आपलीच परिस्थिती मांडतात. ऑटो युनियनचे नेते निसार अहमद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद शहरात ३५ हजार नोंदणीकृत ऑटो असून त्यावर ६० ते ६५ हजार चालकांचे पोट आहे. कुटुंबीयांचाच विचार केला तर सव्वा ते दीड लाख लोक प्रत्यक्ष ऑटोच्या कमाईवर जगणारे आहेत. याशिवाय रिक्षा दुरुस्तीचा उद्योगही ऑटोवर अवलंबून असून, गॅरेज आणि तंत्रज्ञ मिळून दीड ते पावणेदोन लाख लोकांचा चरितार्थ ऑटो चालवण्याच्या व्यवसायावरच अवलंबून आहे. काहींनी ऑटो विकत घेतला असून व्यवसाय ठप्प झाल्यामुळे हप्ते भरण्याचा मोठा प्रश्न तयार झाला आहे. हप्त्यासाठी बँका, पतसंस्था काही काळ सूट देतीलही. परंतु आता कुटुंबाला जगवण्याचा प्रश्न तयार झाला असून जे भाडय़ाने घेऊन ऑटो चालवतात, त्यांची पोटा-पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

विलास केदारे सांगत होते, ‘आता महिना होत आला. घरात बसून आहे. कमाईचा एक छदामही नाही. पत्नी काही घरांमध्ये काम करायची. मात्र, तिच्याही हाताला काम नाही. घरात तीन मुलींसह एक लहान मुलगा आहे. आम्ही दोघे नवरा-बायको, अशी सहा तोंडे खाणारी आहेत. प्रत्येक दिवस कठीण जात आहे. कशातच मन लागत नाही. चिंतेने हृदयाचे ठोके वाढत जातात.’  केदारे यांनी ऑटोही भाडय़ावर घेऊन चालवत असल्याचे सांगितले.