दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाडय़ातील शेतकरी हवालदिल

मराठवाडय़ात गेल्या ४० दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पैठण तालुक्यातील ३ हजार ५०० हेक्टरवरील पिके मोडून काढण्यात आली असून गेल्या सात दिवसांमध्ये तब्बल ३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाडय़ातील तब्बल १३२ महसूल मंडळामध्ये कमी पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीन या पिकांच्या वाढीवर कमालीचा परिणाम झाला असून उत्पन्न ४० ते ५० टक्के घटेल, असा अंदाज आहे. दरम्यान नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. मात्र, तसे लेखी आदेश राज्य सरकारकडून मिळालेले नाहीत. ‘दरवर्षीप्रमाणे पाऊस, पीक आणि पाण्याच्या स्थितीबाबतचे अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहेत,’ असे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.

गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे हिंगोलीमध्ये पिकांची स्थिती सुधारेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. नांदेड जिल्हय़ातील देगलूर व मूखेड तालुक्यातील  जमिनीवरील पिके वाया गेली आहेत. जायकवाडीला आलेल्या पाण्यामुळे ९७ हजार हेक्टरवरील पिकांना पाणी मिळेल. परभणी जालना जिल्हय़ातील काही पिके त्यामुळे वाचतील, असा अंदाज आहे. दरम्यान मराठवाडय़ातील ३५ लाख ३३ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. ही आकडेवारी १०१ टक्के आहे. किमान विम्याचे पैसे जरी मिळाले तरी जगता येईल, असा विचार शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.

१३ ऑगस्टपर्यंत ५८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता ४०० शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवनयात्रा संपविली आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर झालेल्या या आत्महत्या चिंतनीय आहेत. त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकरी हैराण आहेत. १९ ऑगस्ट रोजी मराठवाडय़ात अतिवृष्टी होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.  येत्या दोन-तीन दिवसात चांगला पाऊस झाला तर चांगल्या जमिनीवरील पिके वाचतील, असे सांगितले जात आहे.

मरणाचा मार्ग

मराठवाडय़ात १ जानेवारी ते ६ ऑगस्ट दरम्यान ५४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. त्यामधील ३८० शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जबाजारीपणातून झाल्याचे प्रशासनाचे अहवाल आहेत. हा आकडा पात्र श्रेणीमधील आहे. गेल्या आठवडय़ात आत्महत्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ दिसून आली आहे

भीषण पीकस्थिती

यंदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पैठण तालुक्यात सर्वाधिक नुकसान असून आता पाऊस आला तरी उपयोग होणार नाही, असे वाटल्याने शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन ही पिके रानातून काढून टाकली आहेत. मराठवाडय़ात झालेल्या एकूण पेरणीपैकी ३६ टक्के क्षेत्रावर सोयाबीन तर ३४ टक्के क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे.

१ जानेवारी ते ६ ऑगस्ट दरम्यान ५४६ प्रकरणे दाखल झाली होती. त्यात वाढ झाली आहे. एकूण प्रकरणांमध्ये दिसणारी वाढ पात्रश्रेणीत मोडते की नाही, याची छाननी नंतर होते. ती केली जाईल. या आठवडय़ात आत्महत्येची एकूण प्रकरणे १३ ऑगस्टपर्यंत ५८० एवढी आहेत.          – प्रल्हाद कचरे, उपायुक्त महसूल

सरासरी ७७९ मिमी पाऊस

  • पडलेला पाऊस ३४.७५ टक्के
  • १ जून ते आत्तापर्यंत केवळ २९ दिवस पाऊस. ४८ दिवस कोरडे
  • १३२ महसूल मंडळामध्ये ५० टक्के पेक्षा कमी पाऊस