मनपा आयुक्त मुगळीकर यांची कबुली

औरंगाबाद शहर व मनपाच्या हद्दीत येत असलेले ३० ते ३५ हजार मालमत्ताधारक महापालिकेकडे कर भरतच नाहीत, अशी कबुली आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत दिली. मुगळीकर म्हणाले, औरंगाबाद महानगरात एकूण मालमत्ताधारकांपैकी १ लाख ८३ हजार जण कर भरणारे आहेत. देवळाई-सातारा परिसर मनपाच्या हद्दीत येत असतानाही तेथील ५ हजार मालमत्ताधारक कर भरत नाहीत. कर वसुलीसाठी शासन स्तरावर एक एजन्सी नियुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. औरंगाबाद शहर येत्या वर्षांअखेपर्यंत स्मार्ट सिटीच्या दृष्टीने तयार होईल. त्यात वॉर्डातील कचरा त्याच भागात प्रक्रिया करून त्याच्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे.

मुकुंदवाडीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प राबवण्यात येणार आहे. भुयारी मार्गाचा ४६४ कोटींच्या प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. त्या अनुषंगाने ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन रोड स्मार्ट होणार असून, त्यावर सायकल ट्रॅक असेल. अशाच प्रकारचा रस्ता हर्सूल रोडही असेल. शहर वाहतूक सेवेसाठी १५० बस खरेदी केल्या जातील. त्यात पाच बस या इलेक्ट्रिक पद्धतीच्या असतील. स्मार्ट लाइटिंगअंतर्गत ५५ हजार एलईडी बल्ब बसवण्यात येणार आहेत. स्मार्ट बस स्टॉप असतील. शहरात दोन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, असे मुगळीकर यांनी सांगितले.

मात्र शहरात सध्या चार ते पाच दिवसांआड पाणी मिळत असून अनेक ठिकाणी पाइपलाइन असतानाही शहरवासीयांना निर्जळी राहावे लागत असेल तर अशा स्मार्ट सिटीचा काय उपयोग, या प्रश्नावर मात्र मनपा आयुक्त मुगळीकर यांना उत्तर देण्यासाठी बराच विचार करावा लागला. दिलेले उत्तरही मोघमच होते

ठाकरे स्मृतिवन व संत एकनाथ नाटय़गृहासाठी निधी

संत एकनाथ नाटय़गृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून, जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातून एक कोटी व पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडून एक कोटी, अशा दोन कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. याशिवाय बाळासाहेब ठाकरे स्मृती वनासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध झाल्याचे मुगळीकर यांनी सांगितले.